दमा – कफ – टॉन्सिल

0
689
  •  वैदू भरत म. नाईक

लहान मुलांना कफ थुंकता येत नाही व त्यामुळे ते तो गिळतात व तो शौचावाटे बाहेर पडतो. कफ चिकट असल्यास तो श्‍वासनलिकेत साचतो. चिकट कफामुळे श्वासोच्छ्वासात घरघर असा आवाज होतो.

दमा

सर्द हवा, आकाशात ढग येतात, त्यावेळी किंवा कधी कधी रात्री दम कोंडतो, श्वास लागतो व खोकल्याची उबळ येते. हा विकार मोठ्या माणसांत त्यातल्या त्यात पुरुषांत जास्त प्रमाणात आढळतो. हा विकार अनुवंशिक आहे. स्थलांतर, खाण्यापिण्याचा अतिरेक, गारठ्यामुळे किंवा सर्द हवेत फिरल्यामुळे हा विकार जडतो. काही पदार्थांचा वास सहन न झाल्यामुळे किंवा भितीनेही हा विकार होण्याची शक्यता असते. रात्री एकाएकी दम कोंडल्याप्रमाणे होते, त्याला जास्त हवेची गरज भासते. उच्छ्वास दीर्घकाळ असतो. ‘सुं-सुं’ अगर घुघुर असा आवाज होतो व तो आजुबाजूच्या माणसांनाही ऐकू येतो. कधी थोडा ताप असतो. नीट खोकला येत नाही. त्यामुळे कफ सुटत नाही. उबळ जोरदार येते, छाती भरलेली वाटते पण कष्टाने हलते.
औषधे
१) मिरी चूर्ण, पिंपळी चूर्ण व टांकणखार चूर्ण प्रत्येकी १००/१०० मिग्रॅ. घेऊन त्यात मध घालून चाटण्यास द्यावे. त्वरित आराम मिळतो.
२) जवखार चूर्ण मधातून घ्यावे.
३) बेहडेहळद, मनुका, बालहिरे, नागरमोथा, काकडशिंगी, धमासा याचे समभाग व वस्त्रगाळ चूर्ण करून मधातून घ्यावे.
……………………

कफ
हा निराळा असा रोग नाही. न्युमोनिया, फ्ल्यू, टायफॉइड, सर्दीचा खोकला, दमा वगैरे आजारात छातीत कफ तयार होतो. तो खोकल्याबरोबर बाहेर पडतो. लहान मुलांना कफ थुंकता येत नाही व त्यामुळे ते तो गिळतात व तो शौचावाटे बाहेर पडतो. कफ चिकट असल्यास तो श्‍वासनलिकेत साचतो. चिकट कफामुळे श्वासोच्छ्वासात घरघर असा आवाज होतो. कफ पातळ झाल्यास तो लवकर बाहेर पडतो. छाती मोकळी होते. श्‍वासोच्छ्वासातील त्रास कमी होतो. बरगड्या दुखायच्या थांबतात.
औषधे ः-
१. अडुळशाच्या पानांचा रस काढून त्यात मध घालून तो घ्यावा.
२. कोरफडीचा रस, हळदीची पूड, खडीसाखर मधात टाकून चाटावी.
३. टांकणखारचे चूर्ण मधातून चाटावे.
४. अडुळशाच्या पानाचा रस, चांकणखारीची लाही व मध यांचे मिश्रण करून चाटण्यास द्यावे.
……………………….

टॉन्सिल
मनुष्याच्या घशात डाव्या व उजव्या बाजूला एकेक गाठ असते, तिला टॉन्सिल असे म्हणतात.
जन्मतःच काहींचे टॉन्सिल वाढलेले असतात व थंडीने त्यात बिघाड निर्माण होतो. काहींचे टॉन्सिल ताप आला की वाढतात. तीव्र आमवात झाल्यानंतर हा विकार जडलेला आढळतो. तरुण माणसात हा विकार जास्त प्रमाणात आढळून येतो.
हा विकार एकदम होतो. घशाला कोरड पडते व घसा गरम झाला आहे असे वाटते. ताप १०२ ते १०३ डिग्रीपर्यंत चढतो. जिभेवर घाण साचते. तोंडाच्या खालची गाठी सुजून त्यामुळे गिळताना वेदना होतात. टॉन्सिल सुजलेल्या व लालभडक दिसतात. टॉन्सिल थोड्या मोठ्या होतात व त्यातून पिवळा चिकट स्त्राव स्त्रवू लागतो व तो त्याच्यावरच चिकटून बसतो. तो ओल्या पण स्वच्छ वस्त्राने पुसून काढावा.
औषधे ः
१. गवती चहा व पदिना पाण्यात उकळून त्याचा वाफारा घशाला द्यावा.
२. सुंठ, मनुका, गवती चहा, दालचिनी, तुळशीची पाने यांचा काढा करून त्यात थोडी खडीसाखर घालून गरम गरम पिण्यास द्यावा. त्याने ताप कमी होतो व घसा शेकला जातो.
प्रथम रेचक देणे आवश्यक. तेलकट पदार्थ खायला देऊ नयेत. पाणी उकळून थंड करून पिण्यास द्यावे. रोग्यास साबुदाण्याची खीर किंवा पातळ भातच फक्त द्यावा.