दक्षिण गोव्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

0
4

दक्षिण गोव्यातील केपे, मडगाव, सांगे, कुडचडे या भागांना मान्सूनपूर्व पावसाने काल सकाळी झोडपून काढले. दक्षिण गोव्यातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पणजीसह उत्तर गोव्यातील अनेक भागात ढगाळ, पावसाळी वातावरण होते; मात्र तुरळक सरी बरसल्या. मान्सूनपूर्व सरींनी उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा दिला. चोवीस तासांत केपे येथे सर्वाधिक 9 सेंटिमीटर, मडगाव येथे 7 सेमी. पावसाची नोंद झाली. सांगे येथे 2 सेमी., दाबोळी आणि काणकोण येथे प्रत्येकी 1 सेमी. पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
दक्षिण गोव्यातील मुरगाव, सासष्टी, केपे, सांगे, धारबांदोडा या तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

4 व 5 जूनला मेघगर्जनेसह पाऊस
अरबी समुद्रातील मान्सून केरळच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात आगामी पाच दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 4 व 5 जूनला राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुरगाव तालुक्यात झाडांची पडझड

मुरगाव तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे एकूण सहा झाडे घरावर व इतर ठिकाणी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. तसेच वेळसाव येथील वृद्ध जोडप्याच्या चारचाकी वाहनावर माड पडल्याने वृद्ध महिला जखमी झाली. अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

मुरगाव तालुक्यात गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे 1 तास पाऊस, वादळी वारे वाहिल्यानंतर पावसाने उसंत घेतली. सकाळी पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
या पावसामुळे वास्को, बायणा, मांगोरहील व वेळसाव येथे झाडे पडली. वास्को गांधीनगर कंटेश्वर मंदिराजवळ एका घरावर फणसाचे झाड पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगोरहील गणपती मंदिरामागे कडूलिंबाचे झाड घरावर पडल्याने त्यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. बायणा मोगा बाय, काटे बायणा येथे माड पडल्याने अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. वास्को अग्निशमन दलाच्या सहकार्याने सर्व झाडे कापून बाजूला करण्यात आली.

कुठ्ठाळी-वेळसाव येथील अवर लेडी एक्सम्पसन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या वृद्ध जोडप्याच्या चारचाकी माड पडल्याने वृद्ध महिला मारिया मार्किस हिच्या खांद्याला दुखापत झाली. यावेळी वाहनात तिचे पती पेद्रू अँथोनियो हेही होते. यावेळी माड वृद्ध जोडप्याच्या वाहनावर पडण्यापूर्वी दुसऱ्या एका माडावर पडला, नंतर चर्चच्या कुंपणावरून वाहनावर पडला. वृद्ध महिलेला मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात उपचार करून नंतर घरी पाठविण्यात आले.