काल दुपारी २.१५ वा. दक्षिण गोव्याच्या काही भागात सौम्य भूकंप झाल्याची माहिती वेधशाळेने दिली. रिक्टर मापकवर त्याची नोंद ४ असल्याचे वेधशाळेने सांगितले.
काणकोण भागात व बेतूल परिसरात व अन्य भागांत भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे सांगण्यात आले. वेध शाळेच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी वरील माहिती दिली.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पावसाचे थैमान चालू असतानाच काणकोण तालुक्यात खोला ते पैंगीण पर्यंतच्या किनारी भागात जमीन हादरल्याचा अनुभव २६ रोजी दुपारी १.२० ते १.३०च्या दरम्यान या भागातील लोकांनी अनुभवला. असा प्रकार घडल्यास सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी काही जणांनी ठेवली आहे.
खोला येथील प्रशांत खोलकर आणि गाळये पैंगीण येथील अभय कामत यांनी एकाच वेळी हा अनुभव घेतला. आपली मुलगी खाटेवर बसली असताना खाट हलत असल्याचा अनुभव तिने घेतला अशी माहिती श्री. कामत यांनी दिली तर स्वयंपाक घरात काम करीत असताना काही डबे हलत असल्याचा अनुभव आपल्या पत्नीने घेतला अशी माहिती श्री. खोलकर यांनी दिली. भाटपाल, चावडी या भागातही काही नागरिकांनी हा अनुभव घेतला असल्याची माहिती या प्रतिनिधीला काही नागरिकांनी फोनवरून दिली. काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनीही आपल्याला अशा प्रकारचा अनुभव आल्याची माहिती देऊन चिंता व्यक्त केली.