थोयबा सिंग ओडिशा संघात

0
249

ओडिशा एफसीने मंगळवारी मध्यरक्षक थोयबा सिंग मोयरांगथेम याला आपल्या संघात सामावून घेतले. इंडियन सुपर लीगच्या सातव्या मोसमापूर्वी त्यांनी मणिपूरच्या या युवा खेळाडूला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. भुवनेश्‍वरस्थित या फ्रेंचायझीने सध्या नवीन खेळाडूंना आपल्या संघात घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी जॉर्ज डिसोझा, कमलप्रीत सिंग, कमलजीत सिंग, हेंड्रे अँथनी, व सौरभ मेहर यांना यापूर्वीच आपल्या संघात घेतले आहे.

‘ओडिशा एफसीकडून खेळताना आयएसएलमध्ये छाप सोडण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघातही स्थान मिळवायचे आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या ओडिशा संघात मला खूप काही शिकायला मिळेल तसेच स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधीदेखील प्राप्त होईल, असे थोयबा याने करारपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले. मणिपूरमध्ये जन्मलेल्या या मध्यरक्षकाने विविध वयोगटांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील दोन आयलीग मोसमात तो मिनर्वा पंजाब एफसी संघाचा भाग होता. एएफसी कप स्पर्धेत गोल नोंदविणारा सर्वांत युवा खेळाडू होणारा खेळाडू म्हणून १७ वर्षीय थोयबाच्या नावावर विक्रम जमा आहे. मागील वर्षी मिनर्वाकडून खेळताना त्याने नेपाळच्या मेनांग मार्शयांगदी क्लबविरुद्ध गोलजाळीचा वेध घेतला होता.

क्लबचे अध्यक्ष रोहन शर्मा म्हणाले की, थोयबाचा खेळ आकर्षक आहे. वैविध्यपूर्ण खेळामुळे त्याला करारबद्ध करण्यात आले आहे. वय कमी असले तरी आय लीगमध्ये व भारताकडून विविध वयोगटांत त्याने मैदानावर घालवलेला वेळ महत्त्वाचा आहे. विनित रायसारखा अनुभवी खेळाडू आमच्या संघात असल्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली थोयबा आमच्या क्लबच्या संस्कृतीमध्ये व वातावरणात रुळेल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.