त्वचारोग आणि आयुर्वेद भाग – ७

0
208
  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

सोरियासिस ह्या व्याधीला जेव्हा जीर्ण स्वरूप प्राप्त होते तेव्हा त्याचे रुपांतर सोरियाटिक आर्थ्रायटीसमध्ये होते. ह्यात व्याधी रुग्णाच्या हाडे व सांधे ह्यामध्ये प्रसार पावतो व त्यांनादेखील कमकुवत बनवतो.

व्याधी उत्पन्न होण्याची पुढची अवस्था म्हणजे ‘स्थानसंश्रय’. ह्या अवस्थेमध्ये शरीरात पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोष हे वेगवेगळ्या कमकुवत भागांमध्ये जाऊन वेगवेगळे व्याधी उत्पन्न करतात. ही अवस्था शरीरामध्ये येईपर्यंत व्याधी हा प्रत्यक्ष स्वरुपात शरीरामध्ये निर्माण झालेला असतो. ह्या स्थितीमध्येसुद्धा जर रुग्णाने योग्य काळजी घेतली नाही तर मात्र तो आजार पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

आता ह्या चौथ्या अवस्थेचा त्वचेच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर ह्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला त्वचेचे काही क्षुद्ररोग, कुष्ठ असे वेगवेगळे त्वचाविकार होऊ शकतात. ह्या अवस्थेत त्यांनी जरी प्रत्यक्ष व्याधीस्वरूप धारण केलेले असले तरीदेखील तो व्याधी शरीरात अजून खोलवर रुजलेला नसतो. तसेच त्याची दिसणारी लक्षणे ही शरीराच्या एकाच भागापुरती मर्यादित असतात.

उदा.- जर एखाद्या व्यक्तीला गजकरणाचा चट्टा शरीराच्या एकाच भागावर दिसला तर आपल्या असे लक्षात येईल की काही दिवस तो चट्टा शरीराच्या तेवढ्याच भागावर नियंत्रित असतो व तेवढ्याच भागापुरती त्या व्याधीची लक्षणे निर्माण करतो. अर्थात तो व्याधी अन्य भागात पसरत नाही. ह्या अवस्थेत रुग्णाच्या शरीरात आजाराची व्यक्त लक्षणे हळूहळू दिसू लागतात ज्याचा रुग्णाला त्रासही होतो.. जो तो सहन करू शकेल एवढाच असतो.

ह्याच्यापुढील अवस्था म्हणजे व्याधीची लक्षणे शरीरामध्ये पूर्णरूपाने व्यक्त होऊ लागतात. म्हणूनच ह्या पाचव्या अवस्थेला ‘व्यक्ती अवस्था’ असे म्हटले जाते. ह्या अवस्थेमधील लक्षणे ही स्थानसंश्रय ह्या अवस्थेपेक्षा बरीच गंभीर असतात. तसेच ही अवस्था अशासाठी देखील गम्भीर आहे कारण ह्या अवस्थेमध्ये व्याधी शरीराच्या एका भागातून दुसर्‍या भागाकडे पसरतो. त्यामुळे साहजिकच व्याधीची व त्याच्या लक्षणांची तीव्रता वाढलेली असते.

आता वरील गजकर्णाचे उदाहरण जर आपण ह्या अवस्थेत पहिले तर ह्या अवस्थेमध्ये गजकर्णाची लक्षणे गंभीर झालेली असतात. जसे ते एका भागातून दुसर्‍या भागात पसरते व भरपूर खाज येते, कधी कधी तिथली त्वचा अगदी कोरडी होते, कधी त्यातून स्त्राव होतो. ही सर्व लक्षणे बरीच तीव्र असतात ज्याचा त्या रुग्णाला बराच त्रास होत असतो. ह्या अवस्थेत जर त्याने नीट उपचार घेतले नाहीत तर मात्र तो आजार जीर्ण स्वरूप धारण करू शकतो.

रोगाची सहावी अवस्था म्हणजे ‘भेद’ होय. पाचव्या अवस्थेमध्ये योग्य औषध उपचार व पथ्य पालन झाले नाही तर रोगाची सहावी अवस्था दिसू लागते. आणि ह्या अवस्थेला गेलेला व्याधी खूप जीर्ण व गंभीर स्वरूपाचा असतो. बरेचदा व्याधी हा एका अवयवाचा असतो पण त्याची लक्षणे शरीराच्या दुसर्‍या भागात सापडतात. जसे कर्करोग जेव्हा जीर्ण होऊन गंभीर अवस्थेमध्ये असतो तेव्हा कर्करोग जरी फुफ्फुसाचा असला तरी कधी कधी आपल्याला लक्षणे रुग्णाच्या यकृतामध्ये सापडतात आणि सर्व तपासण्या केल्या असता असे निदान होते की तो फुफ्फुसाचा कर्करोग आहे जो यकृतामध्ये पसरला आहे.

आता त्वचा-विकाराच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सोरियासिस ह्या व्याधीला जेव्हा जीर्ण स्वरूप प्राप्त होते तेव्हा त्याचे रुपांतर सोरियाटिक आर्थ्रायटीसमध्ये होते. ह्यात व्याधी रुग्णाच्या हाडे व सांधे ह्यामध्ये प्रसार पावतो व त्यांनादेखील कमकुवत बनवतो. आणि वैद्याने रुग्णाचा नीट इतिहास न घेता त्यावर संधिवात असे निदान करून जर उपचार केले तर त्याला यश येणार नाही. कारण त्याचे मूळ हे त्याला झालेल्या सोरियासिस ह्या आजारामुळे आहे त्यामुळे ह्याचा विचार करून जेव्हा उपचार केले जातात तेव्हाच त्या रुग्णाला उपशय मिळतो आणि त्याचा आजार बरा होतो.

ह्या सहाव्या भेद ह्या अवस्थेतदेखील जर रुग्णावर नीट उपचार झाले नाहीत अथवा त्या रुग्णाने नीट पथ्य पालन केले नाही तर मात्र मग तो आजार अशा स्थितीमध्ये जाऊन पोहोचतो की पुढे तो उपचार करून बरा होण्यापलीकडे त्याची अवस्था जाते.
थोडक्यात काय तर आयुर्वेदाने रोग उत्पन्न होण्याच्या ज्या ६ अवस्था सांगितल्या आहेत त्यात प्रत्येक अवस्थेमध्ये अगदी पहिल्या तीन अवस्थांमध्ये जेव्हा रोग होण्याआधीची उत्तरोत्तर गंभीर लक्षणे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दिसू लागतात तेव्हापासून ते चौथ्या ते सहाव्या अवस्थेपर्यंत ज्यात खरोखरच रोगाची व्यक्त लक्षणे रुग्णाच्या शरीरात निर्माण होतात, तोपर्यंत त्यावर योग्य उपचार व पथ्यपालन झाले तर कोणताही आजार सहज बरा होऊ शकतो.
आता पुढील लेखमालेमध्ये आपण त्वचारोगांची आयुर्वेद व अर्वाचीन शास्त्राच्या दृष्टीकोनातून माहिती जाणून घेऊयात.
(क्रमशः)