‘त्या’ शिक्षिकांवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

0
12

>> विद्यालय व्यवस्थापनाकडून दोन्ही शिक्षिकांचे निलंबन

कामुर्ली बार्देश येथील खासगी प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दरम्यान, विद्यालय व्यवस्थापनाने विद्यार्थी मारहाण प्रकरणी शिक्षिका सुजल गावडे आणि कनिष्का गडेकर यांना काल निलंबित केले.
राज्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिक्षण खाते आणि पोलिसांना शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षक असे कसे वागू शकतात, हेच मला समजत नाही. आता शिक्षकांना समुपदेशनाची गरज आहे. शिक्षकांनी आपला वैयक्तिक राग विद्यार्थ्यांवर काढला असावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याचा शिक्षकाला अधिकार नाही. कामुर्ली कोलवाळ येथील खासगी अनुदानित प्राथमिक विद्यालय आहे. या मारहाण प्रकरणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणामध्ये शिक्षिका दोषी आढळून आल्यास त्यांना निलंबित करण्यात येणार आहेत, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने शिक्षण खात्याच्या पर्वरी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थी मारहाणप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.