त्या प्राणांची किंमत!

0
106

उरी हल्ल्यानंतर पंधरवडा उलटतो न उलटतो तोच बारामुल्लाच्या लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी रात्री हल्ला चढवला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय लष्कराने केलेल्या ‘शल्यात्मक हल्ल्यां’ (सर्जिकल स्ट्राईक्स) चा सूड उगविण्याचाच दहशतवाद्यांचा हा आटापिटा आहे हे स्पष्ट आहे. असे आणखी हल्लेही येणार्‍या काळात होऊ शकतात, कारण नियंत्रण रेषेपलीकडील कारवाईत भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला, तरी या दहशतवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने पाकिस्तानात सक्रियच आहेत. दहशतवादाची ही विद्यापीठे जोवर उद्ध्वस्त केली जाणार नाहीत आणि या हल्ल्यांच्या सूत्रधारांना जोवर नेस्तनाबूत केले जाणार नाही, तोवर असे हल्ले थांबणारे नाहीत. नियंत्रण रेषेवरील कारवाईनंतर हाफीज सईदने पाकिस्तानच्या भूमीवरून ‘सर्जिकल स्ट्राइक्स काय असतात हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ’ अशी भारताला जाहीर धमकी दिली आहे. सेनेलाच नव्हे, तर भारतीय प्रसारमाध्यमांनाही लक्ष्य करण्याची धमकी त्याने दिलेली असल्याने त्या दृष्टीने दूरचित्रवाणी वाहिन्यांची पंढरी असलेल्या नोएडासारख्या ठिकाणी अधिक दक्षता बाळगली जाणे गरजेचे आहे. लष्कराचे तळही अधिक कडेकोट करण्याच्या दिशेने प्रयत्न आवश्यक आहेत, कारण काटेरी तारांची कुंपणे सहजपणे कापून रात्रीच्या अंधारात आत शिरकाव करणे दहशतवाद्यांना ज्या सहजतेने शक्य होते, ते पाहिल्यास, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अजूनही मोठ्या त्रुटी असल्याचे जाणवते. मुख्यतः लष्करी तळांचा बाह्य परिसर रात्रीही संपूर्णरीत्या प्रकाशमान असला पाहिजे. बारामुल्लात तो तसा नसावा, कारण दहशतवाद्यांच्या शोधार्थ लष्कराला आकाशात ‘इल्युमिनेटर्स’ सोडावे लागले, तरीही ते पळून जाऊ शकले. काश्मीर खोर्‍यातील बहुतेक लष्करी तळ हे झेलम नदीच्या किनारी असल्याने त्याचाही फायदा दहशतवादी घेत असल्याचे आढळून येते. त्यामुळे पठाणकोट, उरी आणि आता बारामुल्लाच्या घटनांपासून धडा घेऊन सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन करणे गरजेचे भासते. पाकिस्तानस्थित दहशतवादाला खर्‍या अर्थाने जरब बसवायची असेल तर अमेरिकेने जसे अबोटाबादेच्या अंधारात दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनला हुडकून काढले आणि ज्या वाटेने अल्लाच्या घरी पाठवले, तीच वाट हाफीज सईदसारख्यांना दाखवावी लागेल. हे सोपे नाही हे खरे, परंतु अशक्यही नाही. जागतिक जनमत आपल्या बाजूने वळवून घेऊन पाकिस्तानला जरब बसवणार्‍या धाडसी कारवाया ‘शष्ठ्यम् प्रति शाष्ठ्यम्’ न्यायाने यापुढे हाती घ्याव्या लागतील. नियंत्रण रेषा एकदा ओलांडली ती तेवढ्यापुरती नाही, तर यापुढे जेव्हा जेव्हा भारताकडे वाकडी नजर करून पाहाल, तेव्हा तेव्हा तुमच्या घरात घुसून अद्दल घडवू हा जो कणखर संदेश पाकिस्तानला गेलेला आहे, तो खरा करून दाखवण्याचे सामर्थ्यही आपण प्राप्त केले पाहिजे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नियंत्रण रेषेपलीकडील नुकत्याच झालेल्या कारवाईकडे राजकारणविरहित नजरेतून पाहिले जायला हवे असेही प्रकर्षाने वाटते. उगाच या कारवाईची प्रौढी मिरवून तिचे राजकीय भांडवल करण्याची धडपड भारतीय जनता पक्षाने करू नये. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईनंतरच्या जाहीर कार्यक्रमांतून तिचा थेट उल्लेख करणेही कटाक्षाने टाळले हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे फाजिल देशाभिमान दाखवणारे विजयोत्सव साजरे करण्यापेक्षा सीमेपलीकडील दहशतवाद मिटवण्यासाठी अजून काय करता येईल त्यावर खल झाला तर तो अधिक हितकारक ठरेल! आपल्या जवानांच्या प्राणांची किंमत काय असते हे शत्रूला कळायलाच हवे!