‘त्या’ तिघा दरोडेखोरांचे ‘बंगळुरू कनेक्शन’ आले समोर

0
13

>> बंगळुरूतील राकेश नामक इसमाने दिली होती ‘स्टार ज्वेलर्स’ लुटण्याची सुपारी

अनमोड पोलिसांनी दोन, तर कुळे पोलिसांनी शनिवारी पिस्तुलसह अटक केलेल्या एका संशयिताचे ‘बंगळुरू कनेक्शन’ चौकशीत समोर आले आहे. मडगाव येथील ‘स्टार ज्वेलर्स’ दुकान लुटण्यासाठी बंगळुरूतील राकेश नावाच्या व्यक्तीने या राजस्थानी टोळीला सुपारी दिली होती; पण दुकानात गर्दी असल्याने दोन वेळा दुकान लुटण्याचा प्रयत्न फसल्याने संशयित माघारी बंगळुरू येथे जात होते. अनमोड पोलीस सध्या मुख्य सूत्रधार राकेश याचा शोध घेत आहेत.

अनमोड पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना सोमवारी न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर कुळे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताला 5 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. अनमोड पोलीस सध्या मुख्य सूत्रधार राकेश नामक व्यक्तीच्या शोधात आहेत.

राकेश नामक व्यक्तीने मडगाव येथील स्टार ज्वेलर्स दुकान लुटण्याचे काम या राजस्थानी टोळीवर सोपविले होते. या संशयितांनी चार दिवस मडगावात राहून स्टार ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता; पण त्या दुकानात प्रचंड गर्दी उसळत असल्याने संशयितांनी दोन वेळा केलेला लुटीचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे ते पुन्हा बंगळुरू येथे बसमधून जात होते. बंगळुरूमध्ये जाण्यापूर्वी कर्नाटकात अन्य ठिकाणी लूटमार करण्याचा डाव त्यांनी आखला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दुकान लुटण्याचा डाव फसल्याने बसमधून कर्नाटकात जात असताना अनमोड अबकारी तपासणी नाक्यावरील पोलिसांच्या जाळ्यात हे संशयित सापडले होते. कुळे पोलीस सुद्धा या प्रकरणात अधिक तपास करीत असून, फरार संशयितांचा शोध घेत आहेत.