त्यांना न्याय द्या!

0
83

गरीबाला कोणी वाली नसतो म्हणतात. जुवारीनगर – सांकवाळच्या विद्यानगरातील तिहेरी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही बळी हे मोलमजुरी करून पोट भरणार्‍या गरीब कुटुंबातील आणि त्यातही परप्रांतीय. त्यामुळे ह्या भीषण मृत्युप्रकरणी आम गोमंतकीयांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत काय? एखाद्या गोमंतकीय मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा प्रकारची घटना घडली असती तर त्याच्या चौकशीसाठी कित्येक आवाज पुढे आले असते. राजकारणी आणि मंत्री-संत्रीही तत्परतेने धावले असते. परंतु जुवारीनगराच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणात कुठे तरी काही तरी पाणी मुरते आहे हे स्पष्टपणे दिसत असूनही सगळे कसे चिडीचूप बसले आहेत!
ह्या तिहेरी आत्महत्येसंदर्भात सर्वांत पहिला संशय व्यक्त झाला आहे तो आहे थेट पोलिसांवर. त्यानंतर एकाएकी मृतांच्या खोलीत कन्नडमध्ये लिहिलेली कथित चिठ्ठी सापडली, त्यात नातलगांवर संशय व्यक्त केलेला आहे. तिसरा संशय आहे तो त्यांच्याविरुद्ध चोरीची तक्रार गुदरणार्‍या चाळमालकावर. ह्या तिघांपैकी कोणीतरी निश्‍चितच या कुटुंबाला आत्महत्येसारखे अगदी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत असताना केवळ गोमेकॉतील एका शवचिकित्सेवर विसंबून ह्या तिघांचेही मृतदेह घाईघाईने कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन थेट विजापुरात त्यांच्यावरील अंत्यसंस्कार एवढ्या तातडीने उरकून घेण्यामागचे कारण काय?
मुळात वेर्णा पोलिसांचे ह्या प्रकरणातील वर्तन सर्वथा संशयास्पद आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी खरे तर ह्या प्रकरणात त्या तिघांना पोलीस स्थानकात वारंवार बोलवून घेऊन जबर मारहाण आणि छळणूक केल्याचा आरोप असलेल्या तपास अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करणे आवश्यक होते. परंतु तशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. अद्याप या प्रकरणात तपास सुरू आहे, त्यामुळे त्याआधीच कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे उतावळेपणाचे ठरेल, ह्या प्रकरणी सनसनाटी माजवण्याचा प्रयत्नही गैर आहे. परंतु प्रथमदर्शनी ज्या संशयास्पद गोष्टी दिसत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ज्या प्रतिष्ठित वस्तीमध्ये ही घटना घडली तेथे बंगल्यांच्या मध्येच ही बकाल चाळ कुठून कशी अवतरली? तो भूखंड कोणाच्या मालकीचा आहे व तेथील चाळ कायदेशीर आहे का ह्याची सर्वांत आधी चौकशी व्हायला हवी. पोलिसांचे या प्रकरणातील एकूण वर्तन अतिशय संशयास्पद आहे. त्यांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारावर ह्या कुटुंबाची छळणूक चालवली होती? तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवले गेले तेव्हाच आत्महत्येची चिठ्ठी मिळाली होती का? त्या हस्ताक्षराची तज्ज्ञाकडून जुळवणी करून घेतली गेली आहे का? आत्महत्या करणारे कुटुंबच जर निरक्षर होते, तर ही चिठ्ठी कोणी आणि लिहिली? तपासाची दिशा अन्यत्र वळवण्यासाठी तर ही चिठी पुढे आणली गेलेली नाही ना? ह्या कुटुंबावर नेमका असा कोणता दबाव होता की त्यांना थेट आपले तिघांचेही जीवन संपवावेसे वाटावे? तिघांनीही एकाचवेळी गळफास घेणे असे सहसा होत नसते. अशा प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती इतरांचे जीवन संपवून मग स्वतः आत्महत्या करीत असते. या प्रकरणात तर तिघांनीही एकाच वेळी गळफास घेतल्याचे दिसते हे अतिशय संशयास्पद आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे.
वास्तविक जेव्हा एखादे गंभीर मृत्युप्रकरण असते तेव्हा शवचिकित्सा एकाहून अधिक वेळा करण्याची आवश्यकता असते, ज्यातून नवे धागेदोरे सापडू शकतात. परंतु ह्या प्रकरणात ज्या घाईघाईने कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून अंत्यसंस्कार उरकले गेले ते पाहता पोलिसांवरील संशय बळावत जातो. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना ह्या सार्‍याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल.
या सार्‍या प्रकरणाचा एक साक्षीदार अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलाचे नाव उघड केले जाऊ नये असा दंडक आहे. तरीही त्या अल्पवयीनाचे नाव कसे काय उघड केले जाऊ शकते? ह्या प्रकरणात अनेक स्वयंसेवी संघटना उतरल्या आहेत. ह्या आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा ह्या दृष्टीनेच जर त्या उतरलेल्या असतील तर ती चांगलीच बाब आहे, परंतु आपले अजेंडे पूर्ण करण्यासाठी तर कोणी ह्या प्रकरणाचा वापर करू पाहत नाही ना हेही पाहिले गेले पाहिजे. तीन धट्टीकट्टी माणसे जिवानिशी जातात ही काही साधीसुधी बाब नव्हे. ती भले गरीब असतील, मोलमजुरी करणारी असतील, परंतु अशा अकाली त्यांचा बळी जाण्यास कोण कोण कारणीभूत ठरले हे उघड झाले पाहिजे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंदवले गेलेच पाहिजेत, मग ते पोलीस असोत नाही तर चोर!