>> जिल्हा पंचायतींच्या रेईश मागूश, दवर्ली, कुठ्ठाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राज्यातील जिल्हा पंचायतींच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून, २८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली आणि कुठ्ठाळी या तीन मतदारसंघांत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. रेईश मागूश जिल्हा पंचायत मतदारसंघातील जागा सदस्याने राजीनामा दिल्याने रिक्त झाली, तर दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर आणि कुठ्ठाळीचे जिल्हा पंचायत सदस्य आंतोन वाझ यांची आमदारपदी निवड झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
या पोटनिवडणुकीसाठी २ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ८ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. १६ ऑक्टोबरला सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. मतमोजणी १८ ऑक्टोबरला केली जाणार आहे.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचा रेईश मागूश मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात रेईश मागूश, पिळर्ण, नेरुल आणि सांगोल्डा या पंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ हजार ४६७ मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण २६ मतदान केंद्रे आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा दवर्ली हा मतदारसंघ सर्वसाधारण वर्गासाठी खुला असून, या मतदारसंघात रूमडामळ, दवर्ली, दिकरपाल, आके या क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण २० हजार ०१८ मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात २६ मतदान केंद्रे आहेत. कुठ्ठाळी हा मतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव आहे. या मतदारसंघात कुठ्ठाळी, कासावली, वेळसाव, बोगमाळो आदी भागांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण १७ हजार ०३४ मतदार आहेत. या मतदारसंघात २२ मतदान केंद्रे आहेत.
तीन मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता २१ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त डब्लू. व्ही. रामनमूर्ती यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.