तिहेरी आत्महत्या प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे

0
108

सध्या गोव्यात गाजत असलेल्या झुआरीनगर येथील तिहेरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले नाही.

तीन दिवसांपूर्वी झुआरीनगर येथे हुलगप्पा अंबिगेर, त्यांचा भाऊ गंगप्पा आणि पत्नी देवम्मा या तिघांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. यातील देवम्मा हिच्यावर चोरीचा आळ होता.
या प्रकरणी पोलिसांनी छळ केल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या नातेवाइकांकडून सध्या केला जात आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावताना या तिघांवर कुटुंबियांकडूनच दबाव होता आणि त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केल्याचा दावा केला होता. तशा आशयाची चिठ्ठी मिळाल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

मोलकरीण म्हणून काम करणार्‍या देवम्मा हिने चोरी केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला होता. त्या आरोपानंतर पोलिसांनी तिच्यासह तिच्या कुटुंबीयांचा छळ केल्याचा कथित आरोप झाला होता. या छळाला कंटाळून तिघांनीही आत्महत्या केल्याचा आरोप असून या पार्श्‍वभूमीवर हे प्रकरण आता चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.