>> 14 वर्षीय मुलाचा मोबाईल, पेन ड्राईव्ह व अन्य सामग्री जप्त
>> झारखंडमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने केली कारवाई
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फोंडा तालुक्यातील तिस्क-उसगाव येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून 14 वर्षीय मुलाचा मोबाईल फोन, सिमकार्ड, पेन ड्राईव्हसह इलेक्ट्रॉनिक गॅझेट काल जप्त केले. झारखंडमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या मुलाला पुढील चौकशीसाठी 22 सप्टेंबर रोजी झारखंडमध्ये हजर राहण्यास बजावले आहे.
एनआयएला देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्यांचा शोध घेताना गोव्यातील एका मुलाचे कनेक्शन आढळून आल्याने एनआयएचे पथक तपासासाठी काल गोव्यात दाखल झाले. एनआयएच्या पथकाने फोंडा पोलिसांच्या सहकार्याने तिस्क-उसगाव येथील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सदर विद्यार्थ्याची चौकशी केली. या मुलाचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे असून, एक दशकापेक्षा अधिक काळापासून ते गोव्यात राहत आहेत. इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर सक्रिय असलेल्या या विद्यार्थ्याचे इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम खाते ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच, पुढील तपासासाठी विद्यार्थ्याला 22 सप्टेंबर रोजी झारखंड येथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या मुलाच्या कारनाम्यांबद्दल गोवा पोलीस अनभिज्ञ होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असून, विविध राज्यांमध्ये संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तरप्रदेश, झारखंड आदी भागांत देशविरोधी कारवाया होत असल्याचे दिसून आल्यानंतर एनआयएने शोधमोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एनआयएने लखनऊमधील एक घर ‘दहशतवादी कारवायां’चे केंद्र म्हणून घोषित करून ते जप्त केले आहे. एनआयएची झारखंडमध्येही नक्षलवाद्यांच्या विरोधात काही महिन्यांपासून शोधमोहीम सुरू आहे.