तिसर्‍या जिल्ह्याचा खासगी ठराव फेटाळला

0
201

>> विधानसभेत सरकारची विरोधकांकडून कोंडी

विधानसभेत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचा तिसरा जिल्हा निर्मितीच्या खासगी ठरावावरून सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तथापि, आमदार नाईक यांचा तिसर्‍या जिल्ह्याचा खासगी ठराव २३ विरुद्ध ८ मतांनी काल ङ्गेटाळण्यात आला.

आमदार रवी नाईक यांनी फोंडा, सत्तरी, धारबांदोडा तालुक्यातील लोकांच्या सोयीसाठी तिसर्‍या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा खासगी ठराव मांडला. फोंडा, सत्तरी, धारबांदोडा या भागातील नागरिकांना सरकारी कामासाठी मडगाव, पणजी येथे जावे लागत आहे. राज्य सरकार प्रशासन जनतेच्या दारी नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसरा जिल्हा फोंड्यात सुरू केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यात तिसरा जिल्हा निर्मितीवर विचार करण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या आश्‍वासनाचे पालन करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.

तिसर्‍या जिल्ह्याबाबत सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली. आमदार लुईझीन फलेरो यांनी तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीचे समर्थन केले.
यावेळी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना प्रश्‍न, प्रतिप्रश्‍न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याची निर्मिती तूर्त शक्य नाही. आगामी काळात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीवर विचार केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात फक्त पोलीस खात्यासाठी चार जिल्ह्याची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय निकषानुसार राज्यात अतिरिक्त जिल्ह्याची गरज नाही. आमदार रवी नाईक यांनी आपला खासगी ठराव मागे घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.

राज्यात तिसरा जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक मतदार व लोकसंख्या नाही. महसूल खात्याचा कारभार नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. तसेच तालुका पातळीवर उपजिल्हाधिकारी कार्यालये आहेत, अशी माहिती महसूलमंत्री जेनिङ्गर मोन्सेरात यांनी दिली. आमदार नाईक यांनी खासगी ठराव मागे न घेतल्याने सभागृहात मतदान घेऊन खासगी ठराव ङ्गेटाळण्यात आला.