तिळारी कालव्याला मणेरी येथे भगदाड

0
31

>> गोव्याचा पाणीपुरवठा बंद, नऊ महिन्यांत दुसर्‍यांदा फुटला कालवा

महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथे भगदाड पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह शेतकर्‍यांच्या शेती काजू बागायतीमध्ये शिरला. तसेच हा कालवा फुटल्याने गोवा राज्यात होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला आहे. ही घटना समजताच संबंधित अधिकारी तसेच महसूल विभाग अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली तसेच तातडीने पाणीपुरवठा बंद केला आहे. गेल्या नऊ महिन्यात दुसर्‍यांदा मणेरी धनगरवाडी येथे भगदाड पडून कालवा फुटला आहे.

गळतीमुळे भगदाड
कुडासे मणेरी दोडामार्ग केळीचेटेंब आंबेली गोवा असा हा कालवा गेला आहे. पावसाळ्यात या कालव्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. तर मणेरी धनगरवाडी येथे रविवारी पहाटे भगदाड पडले तेथे गळती सुरू झाली होती. याची माहिती स्थानिक शेतकरी व तेथील परप्रांतीयांंनी दिली होती. पण संबंधित शाखा अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि ररिवारी मोठे भगदाड पडण्यात याचे रुपांतर झाले. मणेरी धनगरवाडी येथे असलेल्या एका लहान नाल्यावर मोरी बांधून त्यावर मातीचा भराव टाकून कालवा तयार करण्यात आला आहे. याच ठिकाणी हा कालवा रविवारी पहाटे फुटला.

गोव्याच्या भूमिकेकडे लक्ष
तिळारी धरणाचे कालवे आता सतत फुटत आहेत. त्यामुळे गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद पडत आहे. गोवा सरकारने काही महिन्यांपूर्वी तिलारी येथे जलवाहिनी टाकून थेट पाणी गोवा हद्दीत नेण्यासाठी काही कोटी रुपये निधी खर्च केला जाईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता पुन्हा कालवा फुटला आहे. त्यामुळे गोवा सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गोव्याचा पाणीपुरवठा बंद
गेल्या जानेवारीत महिन्यात तिराळी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडून गोवा राज्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई संकट लक्षात घेऊन तिलारी जलसंपदा विभाग यांच्या भरवाशावर अवलंबून न राहता गोवा जलसंपदा विभाग यांनी कालवा फुटला तेथे जलवाहिनी टाकून गोवा येथील पाणीपुरवठा सुरू केला होता. पण पुन्हा अशी घटना घडली आहे त्यामुळे गोव्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. मणेरी येथे कालवा फुटला तेथे जलवाहिनी टाकणे अवघड आहे त्यामुळे येथे तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी काही महिने डिचोली तालुक्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.