तिन्ही प्रकल्पांचे काम सुरू ठेवणार : मुख्यमंत्री

0
97

>> करमल, काकोड्यात भुयारी मार्गाचे उद्घाटन

पश्‍चिम घाटातून जाणारा महामार्ग, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व तमनार ४०० केव्ही वीज वाहिनी प्रकल्प या तिन्ही वादग्रस्त प्रकल्पांना राज्यातील जनतेचा तीव्र विरोध असला तरी हे तिन्ही प्रकल्प पुढे नेण्याचा सरकारने विचार चालवला आहे. काल सावर्डे येथे रेल्वे उड्डाण पूल तसेच करमल व काकोडा येथे भुयारी मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार वरील तिन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.

५० वर्षांपुढचा गोवा नजरेपुढे ठेवून हे प्रकल्प साकार करण्याचे सरकारने ठरवले आहे, असे सांगून जे कोण ह्या प्रकल्पांना विरोध करीत आहेत ते एक तर राजकीय हेतूने अथवा स्वत:च्या स्वार्थासाठी असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. सध्या केंद्रात तसेच गोव्यातही भाजपचे सरकार असल्याने राज्यात विकास करण्यास सुवर्णसंधी असल्याचे ते म्हणाले.

रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे ज्या लोकांची निवासी घरे अथवा अन्य बांधकामे पाडावी लागणार आहेत अशा लोकांना रेल्वे पुनर्वसन करणार असल्याचे ते म्हणाले. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण हे कोळसा वाहतुकीसाठी केले जात नसल्याचे सांगून औषधांची निर्याती आयात, पर्यटन आदींसाठी त्याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे
पंतप्रधान ऐकतील का? : कामत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कोणतेही म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐकून घेत नसून त्यांनी काल पंतप्रधानांकडे केंद्राने गोव्यावर मोठे प्रकल्प लादू नयेत अशी जी विनंती केली आहे ती मोदी कितपत ऐकून घेतील याबद्दल शंकाच असल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले.
प्रमोद सावंत यांनी मोदी यांच्याकडे गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करावा अशी वेळोवेळी मागणी करूनही मोदी यांनी त्यांच्या या मागणीला वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत.
म्हादईप्रश्‍नी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ मोदी यांच्याकडे न्यावे अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. ती मागणीही सावंत यांनी पूर्ण केली नसल्याचे सांगून मोदी प्रमोद सावंत यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप कामत यांनी केला.