तिघा पोलिसांंचा ‘फास्टफूड’चालकावर हल्ला

0
7

>> माशेलातील घटना; एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद; यापूर्वी देखील 6 वेळा झाला होता वाद

माशेल येथे फास्टफूड चालक विराज माशेलकर यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, त्यात तिघा पोलिसांचाही समावेश आहे. हल्ल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. गुन्हा नोंदवलेल्या व्यक्तींमध्ये समीर फडते (फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार), आकाश नावेलकर (अमलीपदार्थ विरोधी पथक) व मितेश गाड (भारतीय राखीव दल) या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मोहित गाड (टॅक्सीचालक), सुप्रेश व अन्य 3 जणांचा समावेश आहे. मुख्य संशयित समीर फडते याने यापूर्वी 6 वेळा विराज माशेलकर यांच्याशी वाद घातला होता.

प्राप्त माहितीनुसार, विराज माशेलकर व समीर फडते यांच्या पत्नीने भागीदारीमध्ये माशेल येथे फास्टफूडचे दुकान थाटले होते; परंतु कोविडच्या काळात नुकसान होत असल्याने विराज माशेलकर यांनी स्वतः व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन समीर फडते यांच्या पत्नीला भागीदारीतून काढून टाकले होते. त्यानंतर पुन्हा व्यवसाय जोरात सुरू झाल्याने विराज माशेलकर व समीर फडते यांच्यात अनेकवेळा खटके उडाले. यापूर्वी सहा वेळा प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. रविवारी रात्री 11 वाजता अचानक समीर फडते हा आणखी 4 जणांबरोबर दुकानात घुसला आणि त्यांनी विराज माशेलकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, तर अन्य तिघेजण दुकानाबाहेर थांबले होते. गंभीर जखमी विराज माशेलकर यांना त्वरित गोमेकॉत दाखल केले; पण तेथील डॉक्टरांनी पहाटे 4 वाजता जखमी विराज यांना डिस्चार्ज दिला.

व्हायरल व्हिडिओच्या मुद्द्यावरून मारहाण
तक्रारदार विराज माशेलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य सूत्रधार असलेला समीर फडते गेल्या काही महिन्यांपासून वारंवार पैशांची मागणी करीत होता. डिसेंबरात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर प्रकरण म्हार्दोळ पोलीस स्थानकात गेले होते. रविवारी रात्री समीर फडते याने मारहाण करीत असलेला यापूर्वीचा आपला व्हिडिओ व्हायरल केल्याचे कारण देऊन विराज माशेलकर यांना मारहाण केली. त्यामुळे सोमवारी सकाळी विराज माशेलकर यांनी 8 जणांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.