ड्रग्सप्रकरणी शाहरुखपुत्र आर्यनला कोठडी

0
34

>> आज पुन्हा न्यायालयात हजर करणार; व्हॉट्सऍप चॅटमधून महत्त्वाचे पुरावे हाती

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कोर्डेलिया या जहाजावरील ड्रग्स आणि रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांची काल एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली. या तिघांनाही किला न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली असून, सोमवारी दुपारी २.३० वाजता त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, उर्वरित ५ जणांनाही काल रात्री उशिरा अटक करण्यात आली.

मुंबईजवळ समुद्रात कोर्डेलिया जहाजावर शनिवारी रात्री ड्रग्स पार्टी सुरू असतानाच अमली पदार्थविरोधी पथका (एनसीबी)ने छापा टाकला होता. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी आर्यन खानसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यात अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश होता. यावेळी आठ संशयितांकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आले होते. या सर्वांची एनसीबीने १६ तास सखोल चौकशी केली. चौकशीनंतर आर्यन, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना काल अटक केली. अटकेनंतर तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले.

काल सायंकाळी एनसीबीने किला न्यायालयासमोर तिघांना हजर केले. यावेळी एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांची अधिक चौकशी करायची असल्याने ५ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली. संशयित हे ड्रग्स पुरवठादारांशी व्हॉट्सऍप चॅटच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. तसेच मोबाईल फोनमधूनही त्याचे पुरावे मिळाले आहेत, असेही एनसीबीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर ऍड. सतीष मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आर्यन व अन्य दोघांना ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. त्यामुळे आर्यन खानसह तिघांना एक रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे.
आता ही कोठडी वाढणार की यांची सुटका होणार, याचा निर्णय ४ ऑक्टोबरच्या सुनावणीतच होणार आहे. एनसीबीकडून एका दिवसात अधिक चौकशी करून आर्यन खानसह इतर संशयितांची कोठडी वाढवण्यासाठी प्रयत्न असेल. दरम्यान, अन्य ५ संशयितांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली, त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, एनसीबीने पार्टी आयोजकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एफटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कासिफ खानदेखील रडारवर असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उरी सेक्टरमध्ये २५ कोटींचे ड्रग्स जप्त
मुंबईत अमली विरोधी पथकाच्या (एनसीबी) कारवाईनंतर देशाच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने काल मोठी कारवाई केली. लष्कराने नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत २५ कोटींपेक्षा जास्त आहे. हे सर्व ड्रग्स पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बारामुल्ला पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.