डॉक्टर मारहाण प्रकरणी अखेर मिनेश नार्वेकरला सशर्त जामीन

0
50

येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल तिळवे यांना गेल्या दि. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी मिनेश नार्वेकर याला काल शुक्रवारी न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाला आहे. पर्वरी पोलिसांनी मिनेश याच्यासह तिघांना अटक केली होती. पैकी दोघांना यापूर्वीच सशर्त जामीन मिळाला आहे.

सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आणि राज्यातील खासगी डॉक्टरांनी पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन आरोपीना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. उपअधीक्षक एडविन कुलासो यांना तत्सबंधी एक निवेदनही देण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी पर्वरीतीलच रोहील साळगावकर, रोहिश साळगावकर आणि कृष्णा नाईक या तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यातील रोहील आणि रोहिश साळगावकर यांची न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली होती. तर दि. ३१ ऑगस्ट रोजी मिनेश पोलिसांना शरण आला.

काल न्यायालयाने मिनेश याला दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि पाच दिवस पर्वरी पोलीस स्थानकात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजुर केला आहे. डॉ. अमोल तिळवे यांनी बहिणीच्या नवजात बालकाची हत्या केली असून आपणाला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मिनेश याने प्रसार माध्यमांसमोर बोलताना केला होता.