राज्यातील डेंग्यूचे हॉटस्पॉट असलेल्या विभागामध्ये उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
आरोग्य खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आला आहे. आरोग्य खात्याच्या साथीच्या रोग विभागाकडून हॉटस्पॉटचे निरीक्षण केले जात आहे. आरोग्य आणि नगरविकास या दोन्ही सचिवांना आपापल्या विभागांमध्ये समन्वय साधून महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राज्यभरातील आरोग्य सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे.
नागरिकांना आवाहन
राज्यातील वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांमुळे घबराट पसरलेली आहे. नागरिकांनी ताप आल्यानंतर त्वरित डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या रक्ताची तपासणी करावी. तसेच, नागरिकांनी आपल्या आसपास परिसरात पाणी साचायला देऊ नये, असे आवाहन मणिपाल इस्पितळातील डॉ. विक्रम यांनी केले.
राज्यभरात तापाची साथ पसरलेली आहे. नागरिकांनी ताप आल्यानंतर खबरदारी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
फैलाव नियंत्रणात ः मुख्यमंत्री
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
राज्यातील डेंग्यूचा फैलाव नियंत्रणाखाली आहे. राज्यातील डेंग्यू फैलावप्रश्नी चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी खास बैठक घेऊन आरोग्य विभागाला उपाययोजनाबाबत आवश्यक सूचना केल्या आहेत. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
राज्यभरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने डेंग्यूबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हा इस्पितळ, सामाजिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. तर, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे प्रमाण कमी होत आहे. आरोग्य खात्याकडून राज्यभरातील डेंग्यू फैलाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून प्रयत्न केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रालयाच्या डेंग्यूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना सर्व आरोग्य विभागांना करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रमाण कमी झाल्याने डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. डेंग्यूच्या फैलाव रोखण्याच्या काम जोरात हाती घेण्यात आले आहे, असे आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले.