डिस्लेक्सिया ः वाचनातील अक्षमता

0
264

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

एक नॉर्मल मूल केजी किंवा बालवाडीमध्ये अक्षरं शिकतं आणि पहिलीत गेल्यावर वाचायला लागतं. पण या मुलांना बालवाडीत अक्षरओळख होत नाही. १ल्या-२र्‍या वर्गात गेल्यानंतरही त्यांना वाचता येत नाही. बरं, इतर गोष्टींमध्ये एकदम तल्लख असल्याने पालक गोंधळतात.

या मुलांच्या क्षमतेनुसार अभ्यास करण्यासाठी तसे वातावरण तयार करा. एखाद्या शांत जागी त्यांचा अभ्यास घ्यावा. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास अधिक वेळ द्यावा. घरात शांतता राखावी. मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे ते करण्यास प्रोत्साहन द्यावे.

आपल्याला मोठा कसलातरी आजार आहे, म्हणून विविध चाचण्या करणारे काही रुग्ण असतात. त्या चाचण्यांमध्ये विविध रक्ताच्या चाचण्या. एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआय… असे विविध रिपोर्ट करून घेतात. यात भर म्हणजे इंटरनेटच्या आधारे विविध रोगांची माहिती गोळा करतात व त्यानुसार स्वतःच डॉक्टरांना सांगून वेगवेगळ्या तपासण्या करतात. काही जण तर छोटी-मोठी शस्त्रक्रियादेखील करवून घेतात. अशाच रुग्णांपैकी एक माझा नेहमीचा रुग्ण आपल्या भाचीला माझ्याकडे घेऊन आला. तिची आई म्हणाली, ‘‘डॉक्टर ही आता तिसर्‍या इयत्तेत शिकते. हुशार आहे. गाते छान, कविता सगळ्या पाठ आहेत. पण तरीही शाळेतून नेहमी तक्रारी येतात. पहिली दोन वर्षे आम्ही शिक्षिकेच्या तक्रारींवर जास्त विचार केला नाही. वाटलं लहान आहे आणि एखादे वेळेला वाचायला कंटाळा येऊ शकतो. शिकवलेले समजते तेवढे पुरे. घरी आल्यावर शाळेत शिकवलेलं तिच्या चांगलं लक्षात राहतं, उत्तरं छान देते. पण वाचायला सांगितले तर घोडा अडलाच म्हणून समजा! गाडी पुढे सरकतच नाही. हातात पुस्तक देऊन वाचायला सांगितल्यावर बुद्धी कुठे गहाण ठेवते काय माहीत? अ, अ, ब, ब.. असेच काहीतरी. डॉक्टर आता मात्र काळजी वाटू लागली आहे. आम्ही जास्त शिकलो नाही. मुलीने छान शिकावं असं वाटतं. पण आता भीति वाटू लागली आहे’’.
मुलगी शांत बसली होती. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आई जे काही सांगते हे जणू तिच्याबद्दल नाही, असेच काहीसे! मला निदान करायला वेळ लागला नाही. ही केस ‘डिस्लेक्सिया’ची हे मी पटकन् ओळखलं. पण हे आता तिच्या मामाला कसे सांगायचे? पोरीच्या कितीतरी तपासण्या करून घेईल आणि तिची आई ‘डिस्लेक्सिया’ या नावानेच घाबरेल. मग त्यांना समजेल अशा शब्दात सांगणं महत्त्वाचं होतं. म्हणून म्हटलं, ‘काय हो, तुम्ही ‘तारे जमींपर’ चित्रपट पाहिला का?’ त्यांनी होकार दिल्यावर म्हटले, ‘मग चित्रपटातील ईशान अवस्थी आठवतो का? तो ‘ब’च्या जागी ‘व’ किंवा ३ च्या जागी ६ लिहायचा. अक्षरांमध्ये गोंधळच व्हायचा ना…. असेच तुमच्या मुलीचे आहे’. या चित्रपटाने आपल्याला डिस्सेक्सिया या रोगाची ओळख करून दिली. या रोगात मुलं इतर मुलांप्रमाणे लिहिणे, वाचणे करू शकत नाहीत. ही एक प्रकारची अक्षमता आहे. यामध्ये बुद्धीची बाकी अंगे व्यवस्थित असतानाही लिहिता/वाचता येत नाही. आपल्याकडे अजूनही शिक्षित पालकही ही अक्षमता स्वीकारू शकत नाहीत, हे सत्य आहे. एका अभ्यासानुसार प्रत्येक बालकांत डिस्लेक्सियाची लक्षणे असतात. पण काहींमध्ये ती तीव्र स्वरूपाची असतात.

१८९६मध्ये हा दोष सर्वप्रथम लक्षात आला. १९२० पर्यंत तर सारे समजत होते की दृष्टिदोष असल्यामुळे यांना वाचता येत नसावं. पण या मुलांना अक्षरं दिसतात, मात्र त्यांना त्या अक्षराचे नावच येत नाही. असं नंतर लक्षात आलं हा भाषेचा दोष आहे, दृष्टीचा नाही. आपल्याला आश्‍चर्य वाटेल, पण हा दोष ५ ते १५ टक्के शाळकरी मुलांमध्ये असतो. कधी कधी तो आनुवंशिकही असू शकतो. या मुलांना शब्दाची फोड विविध अक्षरांमध्ये करताच येत नाही. उदा. उअढ- कॅट हा साधा शब्द. यात ‘क’, ‘अ’, ‘ट’ असे तीन उच्चार आहेत. पण ही मुलं या शब्दाचा विग्रह करूच शकत नाहीत अन् म्हणून वाचताना गडबडतात. चित्र पाहून ही मुलं स्वतःच्या बोली भाषेतील शब्द सांगतील. पण लिहिलेलं वाचू शकत नाहीत.

त्यांची एकूण हुशारी, त्यांचं ‘रिझनिंग’, शब्दभांडार हे सगळं छान असतं. एक नॉर्मल मूल केजी किंवा बालवाडीमध्ये अक्षरं शिकतं आणि पहिलीत गेल्यावर वाचायला लागतं. पण या मुलांना बालवाडीत अक्षरओळख होत नाही. १ल्या-२र्‍या वर्गात गेल्यानंतरही त्यांना वाचता येत नाही. बरं, इतर गोष्टींमध्ये एकदम तल्लख असल्याने पालक गोंधळतात.

डिस्लेक्सिया म्हणजे काय?…..

ही एक प्रकारची अक्षमता आहे ज्यामध्ये मेंदूच्या लिहिण्या-वाचण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. यालाच ‘रीडिंग डिसऑर्डर’ असे नाव देण्यात आले आहे. मुलं साधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाची असताना अक्षरे ओळखायला लागतात. पण ज्या मुलांना डिस्लेक्सिया आहे त्यांना अक्षरे ओळखता येत नाहीत. एकसारखी दिसणारी अक्षरे; आकडे जसे बी आणि डी, १३ आणि ६१ किंवा ३ आणि ६ यांचे वाचन करताना ते गडबडून जाताना दिसतात. शाळेत शिकवला जाणारा धडाही त्यांना उशीरा समजतो पण लक्षात राहात नाही. ही अक्षमता आनुवंशिकही असू शकते.
भारतीय डिस्लेक्सिया असोसिएशननुसार भारतातील १५ ते २० टक्के मुलांना डिस्लेक्सियाची समस्या भेडसावत असते. साधारणपणे १००० मुले असणार्‍या शाळेत १५० ते २०० मुले या समस्येने ग्रासलेले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डिस्लेक्सियाची लक्षणे ….

– वागणूक समस्या
– मोठी वाक्ये न कळणे
– गणितात कच्चे असणे. त्याचबरोबर फळ्यावर लिहिलेले उतरवता न येणे
– नीट उच्चार करता न येणे
– उशीरा बोलणे
– शब्द नीट न बोलणे
– रंग, अक्षरे, आकडे या अगदी साध्या गोष्टी ओळखता न येणे
– खराब हस्ताक्षर
– अक्षरे उलटसुलट लिहिणे
– उच्चारातील फरक न समजणे
– त्याचबरोबर संख्या, व्यक्तींची नावे लक्षात न राहणे
– दिशा न समजणे
– डावे-उजवे, वर-खाली यातील फरक न समजणे
– अवयवांचा ताळमेळ घालता न येणे. त्यामुळे शूजची लेस बांधणे, शर्टाची बटन्स लावणे या गोष्टी करता न येणे.
डिस्लेक्सिया हा काही आजार किंवा रोग नसून ही एक अक्षमतेची अवस्था आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेचा काहीही संबंध नाही. अभ्यासाव्यतिरिक्त कोणतीही कामे करण्यास त्यांना अडचणी येत नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात खूप चांगले काम करतात. ही अक्षमता असणार्‍या व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतात. प्रत्येक व्यक्तिगणिक या समस्येची तीव्रता कमी-अधिक होत असते. यावर वेळीच इलाज केला तर समस्या नियंत्रणात आणता येते.
डिस्लेक्सिया असेल तर काय करावे?…..
– अक्षमतेचा स्वीकार करावा.
– आपल्या मुलामध्ये ही अक्षमता आहे याचा स्वीकार न केल्यामुळे यावर उपचार होण्यास वेळ लागतो. आपल्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. काही वेळा मुलांना विशेष शिक्षण देऊन ही समस्या कमी होते.

नोंदणीकृत चिकित्सक, रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, स्पीच किंवा लँग्वेज थेरपिस्ट, विशेष शिक्षक यांच्याकडून या समस्येवर मदत मिळू शकते. भारतीय रिहॅबिलिटेशन कौन्सिलकडून या सर्वांना मान्यता दिलेली असली पाहिजे.
या मुलांच्या क्षमतेनुसार अभ्यास करण्यासाठी तसे वातावरण तयार करा. एखाद्या शांत जागी त्यांचा अभ्यास घ्यावा. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास अधिक वेळ द्यावा. घरात शांतता राखावी. मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे ते करण्यास प्रोत्साहन द्यावे.
विविध प्रकारे अभ्यास शिकवणे, त्याकरिता विशेष शिक्षकांची मदत घेणे, ऑडियो बुकच्या मदतीने अभ्यास हा या मुलांसाठी पर्याय असू शकतो.
काही वेळेला आपण अशा मुलांना ते इतर मुलांसारखे नाहीत, असे जाणवून देतो. पण त्यामुळे मुलांच्या मनावर कधी कधी परिणाम होऊन ते स्वतःला हीन किंवा कमी दर्जाचे समजू लागतात.

मुलांना काही आजार नाही हे समजावून सांगा. त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. आपल्याला जवळ असणार्‍या तज्ज्ञांची निवड करावी. विषयाचे ज्ञान, त्यांची प्रसिद्धी आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या सुविधा या सर्वाविषयी जाणून घ्या.
या मुलांच्या अवस्थेचं निदान करण्यासाठी उपचाराआधी कधी कधी त्यांच्यात काही गुणसूत्रांचे दोष तर नाहीत ना किंवा मेंदूचे आलेख व छायाचित्रे (ईईजी आणि इमेजिंग स्टडीज) ही करून बघावी लागतात. बहुतांश वेळा या सर्व चाचण्या नॉर्मल निघतात.
या मुलांसाठी तज्ज्ञ मंडळी शब्दांची फोड करून एकेक अक्षर कसं समजायचं, त्याच्यातून कोणता ध्वनी निघतो, त्याचं कोडिंग व डिकोडिंग कसं करायचं, स्मृतिभांडारात तो शब्द साठवून तो कसा वाचायचा हे शिकवतात.
शब्द किंवा अक्षरं उलटसुलट लिहिणार्‍या प्रत्येक मुलाला डिस्लेक्सिया झालेला असतो असे नाही. सामान्यपणे सर्वच मुले सुरवातीला असे करतात.
ही समस्या फक्त मुलांमध्येच असते असे नाही. मुलीसुद्धा या विकाराच्या बळी ठरतात. काही मुलांमध्ये अक्षमता असूनही ते गुणवान असतात.
कधी कधी अफाट कल्पनाशक्तीचे वरदान या मुलांना लाभलेले असते.
– तोंडी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवतात.
– संगीत, ड्रामा, पेंटिंग आदी कलेशी निगडित क्षेत्रात उत्तम चमक दाखवतात.
– गोष्टीचे सार चटकन् लक्षात घेतात.
– कोडी सोडवण्यात पटाईत असू शकतात.
अभ्यासाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात जसे कॉम्प्युटर्स, क्रीडा प्रकार, सर्जनशील कामामध्ये या मुलांना विशेष गती असते.
इतरांविषयी प्रेम, सहानुभूती या भावना प्रबळ असतात.
ज्या मुलांमधील ही अक्षमता ओळखली जात नाही त्यांची ही समस्या काळाबरोबर वाढतच जाते. ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत, त्यामुळे ही मुले पुढे अभ्यास करू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक कमीपणाची हीन भावना रुजायला लागते. त्यामुळे ते अभ्यासात मागे पडतात. सातत्याने नापास होत राहतात. तसेच इतर मुलांच्या तुलनेत ते स्वतःला कमी लेखतात. त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. अभ्यास जमत नसल्याने पालक-शिक्षक त्यांना शिक्षा करतात, रागावतात. त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. आपण बावळट किंवा वाईट आहोत, असा त्यांचा पक्का समज होतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे भविष्यात त्यांना भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही समस्या भेडसावू शकतात.

डिस्लेक्सियाचा त्रास असल्यास ‘असं कसं वाचता येत नाही रे गाढवा? मूर्ख आहेस का?’ अशा नकारात्मक विधानांनी मुलाला हिणवू नका. अशाने त्यांच्यातला आत्मविश्‍वास कमी व्हायला लागतो आणि आपल्याला काहीतरी प्रचंड दोष आहे, असे वाटायला लागते. अशा वेळी धीर द्यायचा सोडून आईवडिल स्वतःच तणावग्रस्त होतात व हे दुष्टचक्र सुरू होतं. म्हणून पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, समाज यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा मुलांमध्ये सुधारणा होईल.