डबुलं

0
107
  • डॉ. आरती दिनकर

हाय रे देवा! मला ते दागिन्यांचं गाठोडं कुठेच दिसेना. मग रडूच यायला लागलं. मी आणि अक्काने कालच जाऊन बँकेतून ते दागिने आणले होते. आता काय करायचं असा प्रश्‍न आमच्यापुढे उभा राहिला!

ही गोष्ट माझ्या लग्नाआधीची. आम्ही अहमदनगर सोडून पुण्याला जाणार होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझी आई. ‘अक्का’ म्हणत असू आम्ही तिला. आमची जाण्याची सगळी तयारी झाली. ट्रकमध्ये सगळं सामान भरलं. आम्ही पण दोघीजणी ट्रकमध्येच खुर्च्या टाकून बसलो. आमचा सोफा थोडासा बाजूला ठेवला होता. त्यावर आम्ही थोडेसे हलके सामान ठेवले होते. कारण जर झोप आली तर झोपण्यासाठी म्हणून ते सामान काढून बाजूला करता येईल. आमचा प्रवास सुरू झाला. सकाळी साडेदहाला घरातून निघालो.

तसे आमचे सामान फार नसले तरी संसारासाठी लागणार्‍या उपयुक्त वस्तू, तसेच इतर काही सामान होते. अहमदनगरमध्ये तशा आमच्याकडे खूप गोष्टी होत्या. पण नगर सोडण्यापूर्वी कपडे, चादरी, गाद्या, विविध वस्तू अक्कांनी गरजू लोकांना, अनाथालयाला दिल्या होत्या. संसारातील काही पितळेची व तांब्याची भांडी अक्काने विकली आणि काही या आशीर्वाद मंगल कार्यालयाला दिली. असे सगळे आम्ही व्यवस्थित नियोजन केले होते.

आमचा प्रवास सुरू झाल्यावर थोड्याच वेळात अक्काला डुलकी लागली. मी एक पुस्तक वाचत बसले होते. साधारण एका तासाने ड्रायव्हरने चहासाठी गाडी थांबवली. युसूफभाई आणि रफिकभाई (सोयीसाठी घेतलेली नावे) यांनी आम्हाला विचारले, ‘‘अक्कासाबको और आपको चाय पिना है तो हम ला के देते है|’’ मी म्हणाले, ‘‘नहीं युसूफभाई, आप दोनों चाय पिके आओ, हम गाडी में ही बैठते है|’’ अक्काला मी उठवलं आणि विचारलं, ‘‘अक्का, तुला चहा हवा आहे का?’’ तिने ‘हो’ म्हटल्यावर मी थर्मासमधून अक्काला ती डायबिटिस असल्यामुळे बिनसाखरेचा चहा दिला आणि दुसर्‍या थर्मासमधून मी साखरेचा चहा घेतला. अक्काला पुन्हा विचारले, ‘‘तुला खायला काय हवंय का?’’ कारण आम्ही आमच्याबरोबर खूप खाद्यसामग्री घेतली होती. दुधाच्या दशम्या, मेथीचे पराठे, चटणी, चिवडा वगैरे. कारण पुण्याला गेल्यावर लगेच घरी स्वयंपाक करणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन-चार दिवस राहणारे पदार्थ आम्ही बरोबर ठेवले होते. अक्का बाहेरचे खात नाही, त्यामुळेच ही सगळी काळजी घेतली होती.
थोड्याच वेळात युसूफभाई आणि रफिकभाई चहा घेऊन आले. रफिकभाईने विचारले, ‘‘गाडी शुरू करे?’’ मी म्हणाले, ‘‘हो रफिकभाई, आप शुरू करो गाडी, क्यूँकी शाम होने से पहले हमे पहुँचना है|’’ युसूफभाई म्हणाले, ‘‘बहनजी, आप फिक्र मत किजिये| अभी तो साडेबारा बजे है| साडेतीन-चार बजे तक हम पुना पहुँचही जायेंगे|’’
एवढ्या वेळात मलाही डुलकी लागली आणि साधारण दीड-दोन तासांनी परत गाडी थांबली. मी रफिकभाईला विचारले, ‘‘रफिकभाई, गाडी क्यू रूकी?’’ ‘‘टायर का कुछ प्रॉब्लेम लग रहा है| शायद टायर पंक्चर हो गया होगा, देखते है|’’ मी घड्याळात बघितले तेव्हा अडीच वाजले होते. मी अक्काला तसे सांगितले. पुण्याला पोहोचायला अजून दीड तास अवकाश होता. बापरे! मध्येचं हे काय झाले? मला तर वैताग आला. मी युसूफभाई आणि रफिकभाईला काही मेथीचे पराठे आणि दशम्या-चटणी खाण्यास दिली. मग अक्काला म्हटले, ‘‘तुला गोळ्या घ्यायच्या आहेत डायबिटीसच्या.’’ अक्का म्हणाली, ‘‘असू दे, पुण्याला गेल्यावरच बघू!’’ पण मी तिला गोळ्या घ्यायचा आग्रह केला तेव्हा तिने गोळ्या घेतल्या आणि दुधाची एक दशमी आणि चटणी खाल्ली. मीही थोडे खाऊन घेतले. युसुफभाई आणि रफिकभाई टायर बदलण्याच्या कामात मग्न होते. मग नंतर काही वेळाने गाडी सुरू झाली. पण पाच-दहा मिनिटांत परत गाडी बंद पडली तेव्हा रफिकभाई म्हणाले, ‘‘बहनजी, अभी गाडी के ब्रेक का प्रॉब्लेम हो गया है, गाडी आगे नहीं जा सकती|’’ अरे बापरे! मी आणि अक्का अगदी हवालदिल झालो.

तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजले. अन् अचानक अक्काला आठवण झाली. ‘‘अगं हरी (मला माहेरी ‘हरी’ म्हणत), आपलं ते दागिन्यांचं गाठोडं कुठं आहे? तू कुठं ठेवलंस ते?’’ मी म्हणाले, ‘‘अगं अक्का, तूच हातात घेऊन बसली होतीस ना गाडीत बसण्यापूर्वी?’’ अक्का म्हणाली, ‘‘मला आठवत नाही आता!’’ मला आश्चर्य आणि भीतीही वाटली. पण अक्काला डायबिटीस असल्यामुळे मी तिला तसं सांगू शकले नाही. मी उठून गाडीतच इकडे-तिकडे खूप शोधले, पण नाही मिळाले. ट्रकातील काही मोठं सामान बाजूला करणंही शक्य नव्हतं. हाय रे देवा! मला ते दागिन्यांचं गाठोडं कुठेच दिसेना. मग रडूच यायला लागलं. मी आणि अक्काने कालच जाऊन बँकेतून ते दागिने आणले होते. आता काय करायचं असा प्रश्‍न आमच्यापुढे उभा राहिला! तेवढ्यात अक्काची शुगर डाऊन झाली. तिच्या छातीत धडधड वाढली. मी तिला पाणी दिलं आणि दुधाची दशमी आणि गूळ-तूप खाण्यास दिलं. ती नको म्हणत असताना तिला मेथीचा पराठाही खाऊ घातला.

संध्याकाळचे साडेसात-आठ वाजले असतील. बर्‍यापैकी अंधारही झाला होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. मला तर अक्काच्या चेहर्‍यावर चक्क अंधाराचे जाळेच दिसत होते. अक्का म्हणाली, ‘‘युसुफभाईला दुसराही लाईट लावायला सांग. मीच बघते गाडीमध्ये.’’ युसूफभाई म्हणाला, ‘‘कुछ प्रॉब्लेम हो गया क्या अक्कासाब? आपकी तबीयत तो ठीक है ना? बस आधे घंटे में वो मेकॅनिक आयेगा| रफिक रास्ते में एक स्कूटरवाले को पकड के उसको लाने को गया है| बस आता ही होगा|’’ त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हतेच, आणि रस्त्यात फारसे फोन बुथही नव्हते. आम्ही जिथे थांबलो होतो ती जागा तर अगदी निर्मनुष्य होती. अक्काची पाचावर धारण बसली होती. माझेही शरीरातील त्राण नाहीसे झाले होते. मी रडले तर अक्का आणखी खचेल, त्यामुळे मला अक्काला धीर देणे भाग होते. मग आम्ही देवाचा धावा सुरू केला. प्रार्थना सुरू केली- ‘देवा, आमची गाडी लवकर सुरू होऊ दे आणि आमचं दागिन्यांचं गाठोडं सापडू दे!’
देवाने आमची हाक ऐकली आणि अंदाजे नऊ वाजता गाडी सुरू झाली. पण आता दागिन्यांचं काय? पुणे येईपर्यंत आम्हा दोघींना धीर ठेवणे भागच होते. अक्काने तिच्या पिशवीतील जपमाळ काढली व ती जप करू लागली.

आता आम्हाला पुणे जवळ आल्याची खूण दिसू लागली. रस्त्यांवर दिवे दिसू लागले. थोड्याच वेळात आमच्या नवीन फ्लॅटपाशी आमचा ट्रक थांबला. पण आता इतक्या रात्री हमाल कुठे मिळणार हा प्रश्न होता आणि ट्रक असाच बाहेर उभा राहणार होता. अक्काला मी म्हटलं की तू वर फ्लॅटमध्ये जाऊन झोप. अक्का म्हणाली, ‘‘नाही मी आज इथंच थांबणार. मला माझं डबुलं बघायचं आहे कुठे आहे ते…’’ मी अक्काचं वाक्य अर्धवट तोडत म्हटलं, ‘‘अक्का, आता असूदे. आधी वर घरात चल. उद्या बघू काय ते.’’ पण अक्का मला म्हणाली, ‘‘तुम्हा पोरींना काही अनुभव नसतो. तुला हवं तर तू जाऊन फ्लॅटमध्ये झोप.’’

युसूफभाई आणि रफिकभाई म्हणाले, ‘‘हम खाना खा के आते है| आपको कुछ चाहिए क्या?’’ मी म्हणाले, ‘‘नाही भाईसाब, आप खाना खा के आइए| हमारे पास खाना है|’’ मी अक्काला खाण्यासाठी पराठे, चटणी, लोणचे दिले. पण अक्का म्हणाली, मला भूक नाही. मला खायचे नाही. मला आग्रह करू नकोस. मलाही फारशी भूक नव्हती. त्यामुळे मग मीही खाल्ले नाही.

युसूफभाई आणि रफिकभाई बाहेरच कुठेतरी झोपले. शेवटी एकदाची सकाळ उजाडली. मग युसूफभाई आणि रफिकभाई चार हमाल घेऊन आले. अक्का म्हणाली, आता तो फ्लॅट उघडून सगळं सामान आतमध्ये घे. मी इथे थांबते. हळूहळू एक-एक सामान हमाल वर न्यायला लागले. अक्का तिथेच खुर्ची टाकून बसली होती. हळूहळू गाडीतील सामान रिकामे झाले आणि अक्काने एकदम एका गाठोड्यावर झेप घेतली. अक्काला दागिन्यांचे गाठोडे मिळाले होते. ते गाठोडे सामानामध्ये हळूहळू घरंगळत घरंगळत एकदम तळाशी गेले होते. पण ते तिला कुठे ठेवले हे आठवत नव्हते त्यामुळेच गोंधळ झाला होता. देवाने आमची प्रार्थना ऐकली होती.

अक्काच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मनोमन देवाला हात जोडले. ‘‘देवा, आहे तुझं अस्तित्व. माझं आतलं मन मला सांगत होतं की माझं धन कुठे जाणार नाही. पण ते मन आहे ते अस्वस्थ होणारच!’’ आयुष्यात असे प्रसंग येत असतात पण अशा प्रसंगाशी कसं तोंड द्यायचं हेही हे प्रसंग शिकवून जातात. त्यात असतं आपलं कष्टाचं सामर्थ्य, धीर-गंभीरपणा, सकारात्मक ऊर्जा आणि मनाची शक्ती!
खरंच कधीकधी वाटतं या जगामध्ये खूप चांगले लोकही आहेत, त्यांवरच हे जग चाललेलं आहे. युसूफभाई आणि रफिकभाई यांचे शतशः आभार!