ठंडा ठंडाऽऽ कूल कूऽऽल…

0
248

– डॉ. अनुजा जोशी

 

‘चोच देई पाखरांना, तोच चारा देतसे…’ असं विश्‍वासानं म्हटलं जातं. विश्‍वात्म्याने- निसर्गाने- प्रत्येक चोचीला दाणा मिळेल, प्रत्येक जिवाला जगता येईल अशी सोय करून ठेवली आहे. निसर्गाला जगणार्‍या प्रत्येकाची काळजी आहे. पण आपण मात्र बेसुमार वृक्षतोड, प्रदूषणं व तांत्रिक-यांत्रिकीकरणाच्या रेट्याने पर्यावरणाचा नाश करून विविध आपत्ती ओढवून घेतल्या आहेत. महापूर, ओला-सुका दुष्काळ, भूकंप, वादळं, ढगफुटी, गारपीट आणि दिवसेंदिवस कडक होत जाणारा उन्हाळा ही सगळी आपल्याच कुकर्मांची फळं आहेत. तरीही निसर्ग क्षमाशील हृदयाने आपल्यासाठी ऋतुचक्रे चालवतो आहे. आपण सगळे पायंडे बदलले तरी निसर्ग आपली कर्तव्ये चोख पार पाडतो आहे. वाढता उन्हाळा सोसण्यासाठी रंगीबेरंगी फुलांची पखरण आणि रसदार फळांच्या राशी निसर्ग पिकवतो आहे. हे झालं निसर्गाच्या दानतीचं एक छोटंसं उदाहरण!
अशा निसर्गातील आपलं एक जीवनचक्र- आपलं स्थान व आपल्या शरीरातील नैसर्गिक गोष्टी- प्रत्येक ऋतूमध्ये बदलत असणार्‍या- त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक ऋतूमध्ये आपण काय खातो-पितो, कसे वागतो, कसा विचार करतो यावर आपले स्वास्थ्य अवलंबून असते. वाढत्या उन्हाळ्याचाही आपण आधी आहार, मग विहार व त्यानंतर औषध अशा टप्प्यांमध्ये विचार करायला हवा.
आहार
उन्हाळ्यामध्ये जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ अतिप्रमाणात रोज खाणे आवर्जून टाळावे लागते. आगीत तेल ओतले तर आग भडकते हा साधा नियम आपल्याला ठाऊक असतो, पण तो आचरणात येत नाही व तिथेच स्वास्थ्य बिघडते. आणि त्याचे खापर मात्र बिचार्‍या उन्हाळ्यावर फोडले जाते!
अर्थात अगदी सपक, गुळमुळीत खाणे-जेवणेही आपल्याला शक्य होत नाही. आपण उष्णकटिबंधात राहतो. सूर्याचं तेज आपल्या जेवणाखाणात, वागण्या-बोलण्यात, वृत्तीत, व्यवहारात सर्वत्र ठासून भरलेलं आहे. त्यामुळे खूप झणझणीत व खूप सपक यातला सुवर्णमध्य काढून तसा ‘समंजस’ आहार घेणं उचित ठरतं. म्हणून मसाल्याच्या पदार्थांपैकी मिरची, मिरी, लवंग व लसूण माफक प्रमाणात वापरून धने, खोबरे, जिरे, कांदा, खसखस, दालचिनी, तमालपत्री, बडिशेप असं बाकीचं सगळं व्यवस्थित वापरून चवीला खमंग, झणझणीत तरीही उष्णता न वाढवणारं ‘सामारं’ आपण बनवू शकतो. जिभेवरचा तळपता सूर्य पोटाला सौम्य मावळतीचा वाटला पाहिजे! युक्तीने आपण हे करू शकतो. तळलेले मासे रोज खाण्यापेक्षा माशांची ‘कढी’ आणि त्यातूनही दोन्हीही खायचंच तर खूप माफक प्रमाणात खाऊन नंतर वर सोलकढी पिऊन पोटाला गारवा देऊ शकतो. नारळाचं पाणी, नारळाचा रस, जिरं, कोथिंबीर, हिंग लावून केलेली सोलकढी मांसाहारावरही खूप थंडावा देते.
शाकाहारी जेवणात ‘ताक’ आवर्जून घ्यावे. दही पूर्ण वर्ज्य करावे. ‘तक्रम् शक्रस्य दुर्लभम्‌|’- इंद्रालाही दुर्लभ असणारं ‘ताक’ हे पृथ्वीवरचं ‘अमृत’ आहे अशा शब्दांत आयुर्वेदाने ताकाचा गौरव केला आहे. तो संपूर्ण उचित आहे. ताकाबरोबरच दूध, तूप, लोणीही आहारात असावं. रुक्ष, कोरडे अन्न, चीप्स, कुकीज, केक, बिस्किट्‌स, स्नॅक्स, फास्टफूड हेही फार कमी खावे. गोड पक्वान्ने जपून खावीत. पाणी खूप पिऊन मंदावल्या पचनशक्तीला ती पचवणं कठीण असतं. पचनाच्या तक्रारी त्यामुळे उद्भवू शकतात.
आपल्याकडे काही खास खाद्यपदार्थ उदा. मुगागाठी, मुगाचं कढण, मुगाच्या पुरणाचे शकुनउंडे (सुकरुंडे), सोजी, तांदळाची खीर, नाचणीचं सत्त्व, नाचणीच्या पीठाची आंबील, पेज, निवळ इ. केले जातात. उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ पचायला हलके, पौष्टिक आणि तरीही थंड म्हणून आहारात घेतले जातात. अशा पारंपरिक पाककृती आपण आवर्जून केल्या पाहिजेत.
असं हे भरपेट ‘खाणं’ झालं. आता ‘पिण्या’कडे बघू! कृत्रिम पेयांचे दुष्परिणाम आपणा सर्वांना पक्के माहीत आहेत. विविध विषारी घटक कृत्रिम पेयांमधून रक्तात मिसळतात. नैसर्गिक पेये, सरबते, ज्यूस, निरा हे त्यासाठी समर्थ पर्याय आहेत. आपली फक्त करण्याची इच्छा हवी व विश्‍वास हवा. खडीसाखर किंवा गुळाच्या खड्याबरोबर घेतलेलं मातीच्या मडक्यातील थंडगार पाणी हे सर्वश्रेष्ठ पेय आहे असं मला वाटतं. उन्हाळ्यात होणार्‍या विविध फळांची सरबतं ही पुढची पायरी. आंबे, फणस, आंब्याचं पन्हं, लिंबू, कोकम सरबत, काजू (निरा), जांभूळ, आवळा, करंवद यांची सरबतं, उसाचा रस, शहाळी, तसेच कलिंगड, मोसंबी, संत्री, डाळिंब, अननस, पपई, द्राक्षे, जांब, चिकू, केळी, सफरचंद, पेरू, काकडी इ. फळे व फळांचे ज्यूस आवर्जून घ्यायला हवेत. अगदीच वेळ नसेल तर फळांच्या फोडींवर मीठ, मिरीपूड, चाटमसाला टाकून तयार केलेली ‘फ्रूटडीश’ हा शॉर्टकटही मारता येतो. कसेही करून उन्हाळ्यात होणारी शरीराची, ऊर्जेची हानी टाळण्यासाठी वरील सर्व फळे यथेच्छ खाल्ली गेली पाहिजेत. दुधात फळ घालून केलेले फ्रूटसॅलड, मिल्कशेक हे पदार्थ मात्र टकाक्षाने टाळावे. आंबटगोड फळांनी दूध नासल्याप्रमाणे होऊन विषारी व विरुद्ध परिणाम घडवून आणून आरोग्याला प्रचंड अपायकारक ठरते. आईस्क्रीमही रात्री खाऊ नये. फ्रीजमधले चील्ड वॉटर न पिता साध्या पाण्यात थोडे मिक्स करून प्यावे. चहा, कॉफीचा अतिरेक नको. मद्यसेवन तर नकोच नको. या सुखवस्तू चैनींवर संपूर्ण स्व-नियंत्रण हवे; अन्यथा नुसता चंगळवाद आयुष्याचा एक-एक दिवस कमी करत राहील. आपल्याला खाण्यासाठी जगायचे नाही, जगण्यासाठी खायचे आहे, हे मनात पक्के असावे!
विहार
आपल्या आरोग्याच्या सवयी, योग्य-अयोग्य कृती, वागणूक, पथ्य-अपथ्य या गोष्टी आपले आरोग्य घडवतात किंवा बिघडवतात. आहारानंतर ‘विहार’ फार महत्त्वाचा आहे. चार दिवस थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन करून मिळणार नाही एवढी मनःशांती व गारवा स्वतःच्या घरात आनंदाने गप्पा मारण्यात मिळू शकतो. सुख-समाधान हे सापेक्ष आहे. त्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. पण तरीही या प्रचंड उन्हाळ्याच्या दिवसांत घाई-गडबड, वाद, त्रागा, मनस्ताप टाळणं, मनःस्थिती शांत-समाधानी ठेवणं हे प्रयत्नपूर्वक करावंच. प्रवास, जागणरं कमी करावी. लग्नकार्य- समारंभातला भपका, कृत्रिमता, धांगडधिंगा कमी करावा. कामाचं, वेळेचं नियोजन करून उन्हाआधी कामे आटोपावी, उन्हात फिरताना गॉगल, टोपी, स्कार्फ, सैलसर सुती कपडे वापरावे. उग्र रंग, उग्र गंध, फॅशन-फॅड म्हणून घातलेले तंग कपडे, केसांच्या स्टाईल्स, भडक मेकअप, हॉटेलिंग, पार्ट्या इ. गोष्टी उन्हाळ्यात अपायकारच ठरतात. टीव्ही, कम्प्युटर, व्हिडिओ गेम्स, चित्रपट इ. माध्यमांमधून निघणारी ‘प्रखर किरणे’ डोळे, मेंदू व शरीराला हानीच पोचवतात. या सर्वांचा वापर उन्हाळ्यात आवश्यक तेव्हाच व संयमाने करणे गरजेचे ठरते.
फॅन, कूलर्स, ए.सी. यांचा सदोदित वापर करून शरीरातून निघणारा घाम बंद होण्याची ‘व्यवस्था’ करू नये. शक्य असेल तेव्हा मोकळी हवा, वार्‍याची झुळूक, झाडाची सावली, कौलारू छप्पराचा गारवा, दगडी व मातीच्या बांधकामाची थंडाई, रानात- भाटात- शेतात- डोंगरावर भटकणं, व्हाळात-नदीत पोहणं, समुद्रस्नान करणं ही सगळी सगळी ‘गीमा’तलीच मजा आहे. खरा गारवा तिथेच आहे. सकाळी व्यायाम, प्राणायाम, सायंफेरी, बागेतले काम, झाडांना पाणी घालून निगा राखणे, पूजा, सायंप्रार्थना, रात्री शतपावली, तसेच संगीत, चित्रकला इ. कलांची आवडीप्रमाणे जोपासना हाही मनाचा गारवा आहे. शरीराच्या गारव्याबरोबरच मानसिक शीतलतेचाही विचार उन्हाळ्यात करायला हवाच.
औषध/व्याधी
इतकं सगळं करूनही किंवा न करूनही उन्हाळा शरीरात व्याधीरूप धारण करतोच. डोळ्यांचे, त्वचेचे विकार, घामोळे, फोड, पुळ्या, विविध व्हायरल आजार, वेगवेगळे ताप, कोरडा खोकला, आम्लपित्त, पितांब, कावीळ, मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, मूत्रविकार, पायांना भेगा, हाडांची दुखणी, कमालीचा अशक्तपणा इ. छोटे-मोठे आजार उन्हाळ्यात उद्भवतात. कृत्रिम उपचार टाळून साध्या साध्या नैसर्गिक औषधपाण्यातून व वैद्याच्या सल्ल्याने आपण यावर उपचार करू शकतो. काही औषधं घरगुती वापरातून आपल्याला मिळू शकतात. उदा. वाळा, चंदन, दूर्वा, ब्राह्मी, जाई-जुई, मोगरा, चाफा, गुलाब इ. सुगंधी फुलं, उंबराची पाने, तुळस इ. पाण्यात टाकून ते पाणी किंवा धने-जिर्‍याचे पाणी प्यावे. दिवसभर उन्हात ठेवून तापवलेल्या पाण्याने संध्याकाळी आंघोळ करावी. आंघोळीला साबण न वापरता उटणे उपरावे. हाता-पायांना तेल, तूप, डोक्यावर तेल, डोळ्यांत काजळ, डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या घालाव्या. शंखजीरक, चंदन, गुलाबकळी, वाळा अशी पावडर अंगाला लावायला वापरावी. कैलासजीवन, अमृत मलम, शतधौत घृताचा मलम म्हणून वापर करावा. असे घरगुती उपचार करता येतात. आपल्याकडे ब्राह्मीची (कारिवणा) पाने, काकडीच्या बिया, खसखस, धने, गूळ व एखादं मिरी असं सगळं वाटून त्याचा रस काढून ती ‘शेळ’ म्हणून मुलांना देण्याची पारंपरिक प्रथा आहे. थंडाईसाठी ती खूपच गुणकारी ठरते. चवीलाही खूप सुंदर लागते. उन्हाळ्यात अधूनमधून सर्वांनीच ही ‘शेळ’ आवर्जून घ्यावी.
निसर्गाच्या ऋतुचक्राबरोबर फिरायचं तर निसर्गाच्याच जवळ जवळ जावं लागतं. त्याच्यापासून फारकत घेतली तर स्वास्थ्य व आरोग्य शरीरापासून दूर दूर जात राहातं, एवढी साधी-सोपी गोष्ट लक्षात ठेवली तर पावसात खूप पाऊस म्हणून आपण बेजार होणार नाही, थंडीत थंडी नाही म्हणून अस्वस्थ होणार नाही आणि उन्हाळा कडाडला म्हणून संत्रस्तही होणार नाही. जिभेवर व मनावर थोडंसं नियंत्रण, स्वयंशिस्त, सकारात्मक दृष्टी व सुख-दुःख समानपणे पेलण्याची संतोषीवृत्ती असेल तर हा कडक उन्हाळाच काय, संघर्षाचा कोणताही काळ सहज निभावून नेता येईल. ऊन, पाऊस, वादळ, वारा, थंडी काहीही आनंदाने सोसता येईल. ‘ठंठा ठंडा कूल कूऽऽल’ म्हणत ‘उन्हाचं घर’सुद्धा पावसात बांधता येईल…!