ट्रॅफिक सेंटीनलना ३७.८१ लाख रु. अदा

0
124

>> २१ लाख रुपये थकबाकी ः योजनेबाबत चर्चेअंती निर्णय ः मुख्यमंत्री

वाहतूक पोलिसांच्या ‘ट्रॅफिक सेंटिनेल’ योजनेबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कोणते आश्‍वासन दिले होते त्याची आपणाला कल्पना नसून ते जाणून घेतल्यानंतरच ह्या योजनेचे काय करायचे त्याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन गृहमंत्री ह्या नात्याने काल गोवा विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले. गेल्या विधानसभा अधिवेशनात विचारण्यात आलेला हा प्रश्‍न पुढे ढकलण्यात आला होता.

सांताक्रुझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यानी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. ‘ट्रॅफिक सेंटिनल’ ही योजना अजून चालू आहे काय, असा प्रश्‍न काल त्यानी प्रश्‍नोत्तराच्या तासाला विचारला होता. ह्या योजनेखाली किती जणांनी सेंटिनल म्हणून नाव नोंदणी केली आहे, असेही त्यानी यावेळी विचारले.

यावर उत्तर देताना प्रमोद सावंत यांनी सदर योजना अजूनही चालू असल्याचे सांगितले. ह्या योजनेखाली ७३८७ लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत १६५ ट्रॅफिक सेंटिनल्सना वाहतूक पोलिसांकडून ३७ लाख ८१ हजार रुपये मिळाले असून अजून २१ लाख रुपये सेंटीनलना देणे बाकी असल्याचे सावंत यांनी सांगितले.

फेरआढाव्याचे आश्‍वासन माजी मुख्यमंत्र्यांनी दिले होते
यावेळी आमदार ढवळीकर म्हणाले की, विरोधी आमदारांनी ह्या योजनेला हरकत घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आश्‍वासन दिले होते, असे सभागृहाच्या नजरेत आणून दिले.
त्यावर आपणाला त्याची कल्पना नसून आपण माजी मुख्यमंत्र्यांनी नक्की कोणते आश्‍वासन दिले होते ते जाणून घेऊन नंतर काय करायचे ते बघतो, असे सावंत यांनी सांगितले.

काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यानी यावेळी कोणत्या ट्रॅफिक सेंटिनेलला ह्या योजनेखाली सर्वांत जास्त पैसे मिळाले आहेत, असे विचारले. मात्र, त्यावर सावंत यांनी ट्रॅफिक सेंटिनेल्सची नावे उघड करता येणार नसल्याचे सांगितले. ट्रॅफिक सेंटिनेल्सची नावे उघड करता येणार नाहीत, अशी त्या योजनेतच अट असल्याचे सावंत म्हणाले.
योजना बंद करावी ः चर्चिल
ह्या वेळी हस्तक्षेप करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमांव यानी सदर योजना बंद करावी, अशी मागणी केली. सरकारकडे निधीची चणचण असताना सरकार ह्या योजनेवर लाखो रुपये का खर्च करीत आहे, असा प्रश्‍नही आलेमंव यानी यावेळी केला.