टोनी रॉड्रीग्स यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
63

>> दया कारापूरकर, नागेश करिशेट्टीही कॉंग्रेसवासी

>> आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिले आव्हान

पणजी महापालिकेचे माजी महापौर व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे एकेकाळचे खंदे समर्थक टोनी रॉड्रिग्स यांनी काल पणजी महापालिकेचे माजी नगरसेवक दया कारापूरकर व नागेश करिशेट्टी यांच्यासह काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले अन्य एक नेते समीर वळवईकर यांनीही काल आपल्या समथकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, पक्षाचे अन्य एक ज्येष्ठ नेते रुदॉल्फ फर्नांडिस आदि नेत्यांच्या हजेरीत वरील नेत्यांनी काल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
मिकी बाणावलीतून निवडणूक लढवणार
हल्लीच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांनी काल, आपण चर्चिल आलेमाव यांच्या बाणावली मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक मी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर बाणावली मतदारसंघातून लढणार असल्याचे काल पाशेको म्हणाले. यावेळी त्यांनी, ज्याला युती झालेली हवी असेल, त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे असे आवाहन केले. तसेच भाजपसोबत सलगी करणार्‍या स्वार्थी नेत्यांना निवडणुका जवळ आल्या की कॉंग्रेसची आठवण येऊ लागते, अशी टीकाही केली.
मिकी पाशेको यांनी गेल्या १४ ऑगस्ट रोजी बिनशर्त कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीत जाऊन त्यांनी पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्या हजेरीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपण दक्षिण गोव्यातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते.

बाबूश मोन्सेरात यांचे आव्हान
कॉंग्रेसमध्ये कोण येतो आणि कोण जातो याने मला काही फरक पडणार नाही असे बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. काल टोनी रॉड्रिग्स यांच्यासह दया कारापूरकर व नागेश करिशेट्टी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्‍वभूमीवर बाबूश बोलत होते. कॉंग्रेसमध्ये गेलेल्यांनी मला निवडणुकीच्या रिंगणात मला भेटावे असे आव्हानही बाबूश यांनी दिले.


पी. चिदंबरम गोव्यात
कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांचे काल गोव्यात आगमन झाले. त्यांनी काल संध्याकाळी ताळगाव मतदारसंघातील कॉंग्रेस गटाची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मार्गदर्शन केले. आज १०.३० वा. ते पक्षाच्या निवडणूक विषयक समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची बैठक घेणार आहेत.

कॉंग्रेस पक्षाला युतीची गरज नाही ः मिकी

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला इतर पक्षांशी युती करण्याची गरज नाही. कॉंग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड या पक्षांना युती हवी आहे.

कॉंग्रेस युतीबद्दल बोलत नाही असे मिकी पाशेको यांनी काल सांगितले. आपण जरी बाणावली मतदारसंघातून निवढणूक लढवणार असलो तरी फातोर्डा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी झटेन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बाणावली मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. आपण तेथून दोनदा विजयी झालो आहे. गोव्यात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून आला होता. तेच आता आठ जागा मागत असून १५ सप्टेंबरपर्यंत युतीसाठी दबाव आणत आहेत. तर गोवा फॉरवर्ड १२ जागा मागत आहे. मग कॉंग्रेस कुठे गेली असा सवालही यावेळी मिकींनी केला.

कॉंग्रेस बळकट करण्यासाठी प्रवेश
आपण कॉंग्रेसमध्ये कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रवेश केल्याचे यावेळी मिकींनी स्पष्ट केले. ते कार्य आपण करणार आहे कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोणडकर हे निष्ठावंत कॉंग्रेसजन आहेत. त्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे असेही यावेळी मिकींनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सुमारे साडेपाच वर्षांनी गोव्यात आले तर बाणावलीच्या आमदारांना आज जाग आली आहे. तरीही ते युतीसाठी कॉंग्रेसला मुदत देतात हे हास्यास्पद असून कॉंग्रेसला इतर पक्षांशी युतीची गरज नाही असे मिकी पाशेको यांनी यावेळी सांगितले.