टॉयलेट ः एक अटळ गरज

0
63
  • पौर्णिमा केरकर

जीवनात स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे, याची ओळख आपल्याला कोरोनाने पुन्हा नव्याने करून दिलेली आहे. तरीही आम्ही त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. हे कशाचे प्रतीक आहे? झपाट्याने लोकसंख्या वाढणार्‍या आपल्या मोठ्या देशासमोर आज केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जन यांच्या व्यवस्थापनाअभावी रोगराईचे प्रस्थ वाढलेले दिसते.

मानवी जीवनात स्वच्छता आणि आरोग्य यांना महत्त्वाचे मानले गेले आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे आपल्या संस्कृतीत ब्रीदवाक्य मानले जाते. असे असले तरी वाढत्या बेपर्वाईमुळे बर्‍याच ठिकाणी गलिच्छता, केरकचरा, मलमूत्र विसर्जनाची समस्या वाढीस लागली आहे. जिथे स्वच्छता नांदते तिथेच निरोगी आरोग्याची प्राप्ती होते. महामारीच्या संकटाला अखिल विश्व आज सामोरे जात आहे. जिवंत राहण्यासाठीची धडपड, अगतिकता आम्ही जवळून अनुभवली आहे. जीवनात स्वच्छतेला महत्त्वाचे स्थान आहे, याची ओळख आपल्याला कोरोनाने पुन्हा नव्याने करून दिलेली आहे. तरीही आम्ही त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. हे कशाचे प्रतीक आहे? झपाट्याने लोकसंख्या वाढणार्‍या आपल्या मोठ्या देशासमोर आज केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जन यांच्या व्यवस्थापनाअभावी रोगराईचे प्रस्थ वाढलेले दिसते. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना गलिच्छपणामुळे आपण निमंत्रण देत आहोत.

सर्वसामान्य लोकमानसाचे जीवन आज विविध व्याधींनी ग्रस्त आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात सत्याग्रह चळवळीबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. मलमूत्र विसर्जन उघड्यावर झाले तर त्यामुळे अनेक रोगांचा फैलाव होतो. त्यामुळेच लोकवस्तीला ओंगळवाणे स्वरूप येते. त्यासाठी त्यांनी गावोगावी स्वच्छतेच्या अभियानाचा प्रचार केला होता. दिल्लीसारख्या महानगरातल्या भंगी कॉलनीत गांधीजींनी स्वतः शौचालयांची साफसफाई करून आपणासमवेत कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना नवा मार्ग दाखविला होता. ‘गोपाला गोपाला… देवकीनंदन गोपाला’ असे म्हणणारे आधुनिक संत गाडगेबाबा, हाती झाडू घेऊन त्यांनी झाडलोटीला आपल्या जीवनात प्राधान्य दिले होते. भजन गात हाती झाडू घेऊन त्यांनी तत्कालीन लोकमनाला स्वच्छतेचे धडे कृतीतून दिले होते. परंतु आपलं दुर्दैव असं की गाडगेबाबांची जयंती, पुण्यतिथीला- त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांना तिलांजली देत- सत्यनारायणाची पूजा घालून केरकचरा करून साजरी केली जाते. गेल्या पावशतकापासून केंद्र आणि राज्य सरकारने गावोगावी, शहरोशहरी उघड्यावर होणार्‍या मलमूत्र विसर्जनावर निर्बंध घालण्यासाठी कायदे-कानूनांबरोबरच शौचालये उभारणीसाठी साहाय्यभूत ठरणार्‍या योजना राबविल्या. असे असताना उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या कृतीवर नियंत्रण लोकसहभागाअभावी अशक्य ठरलेले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कृषिप्रधान गावे ओस पडत चालली असून नव्या उदरनिर्वाहाच्या स्रोतासाठी कुटुंबे शहरांत स्थलांतर करीत आहेत. शहरे, महानगरांमध्ये स्थलांतरितांचे लोंढे अस्ताव्यस्तरीत्या स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी निर्माण झालेली आहे. अशा जागांवर संडास, मुतारी, न्हाणीघर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कमी पडतेच, शिवाय पराकोटीचे दारिद्य्र, अज्ञान, तसेच स्वच्छतेच्या बाबतीत साक्षरतेचा अभाव यांमुळे सांडपाणी, मलमूत्र विसर्जनाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तेथील गैरव्यस्थापनेमुळे असे परिसर रोगराईचे माहेरघर ठरलेले आहेत. शौचालयांची आपल्या समाजमनाला किती मोठी गरज आहे हे कोरोनाने
दाखवून दिलेले आहे, तरीही आपण शहाणे होत नाही.
झोपडपट्टीत राहणार्‍यांनी अशा जगण्याची सवय हतबलतेमुळे लावून घेतलेली आहे. परंतु जो समाज स्वतःला सुशिक्षित, आधुनिक समजतो, त्यांची विचारसरणीसुद्धा याबाबतीत मागासलेलीच दिसते. गोव्यासारखा आपला छोटा प्रदेश- ज्याला नंदनवन संबोधले जाते, ते खरोखरच स्वच्छतेच्या बाबतीत नंदनवन आहे का? याचा अंतर्मुख होऊन प्रत्येक गोवेकराने विचार करायला हवा. अस्वच्छतेच्या बाबतीत- खास करून शौचालये, मग ती खाजगी असो वा सार्वजनिक- मी अनुभवलेली काही निरीक्षणे नोंदविताना खंत वाटत आहे. तरीही हे वास्तव आहे.

  • आज गोव्यात स्थलांतरितांचे लोंढे वाढलेले आहेत. गावांचे शहरीकरण होत आहे. सीमेवरील तालुके, गाव तसेच शहरांवरती स्थलांतरितांचा ताण आहे. गावातीलच एक चित्र… शेजारील दुसर्‍या राज्यातील कुटुंबे नोकरी आणि शिक्षण दोन्हीसाठी आपला गाव सोडतात. सीमा ओलांडून येतात. मग इथले लोक त्यांना स्वतःचे घर भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. नवीन खोल्या बांधतात. भरमसाठ भाडे घेतात. परंतु प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र न्हाणीघर आणि शौचालय सोडाच, तिथे सार्वजनिक शौचालयाचीसुद्धा सोय केलेली नसते.
  • अशा काही जागा आहेत जिथे प्रवासासाठी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तसेच कामगारवर्गाची ये-जा सुरू असते. तिथेही अंतर्गत कलह व इतर कारणांमुळे सुलभ शौचालयासारखी सुंदर, आरोग्यदायी योजना राबविली जात नाही.
  • पंधरा-वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आपल्या राज्यातील बसस्थानकांची अवस्था लक्षात घेतली तर तिथे असलेल्या शौचालयांची स्थिती किळसवाणी, तसेच अंगावर शहरे उठविणारी असते. ज्या तातडीने पैशांची मागणी केली जाते, त्याच तत्परतेने त्यांची स्वच्छता ठेवायला हवी याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होते आहे. या ओंगळवाण्या परिस्थितीचा पुरुषांपेक्षा जास्त महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या वास्तवाची दाहकता कोणाच्याच लक्षात येत नाही का?
  • शेजारी शौचालयांची सोय असली तरीही सर्वांसमक्ष भिंतीवर, रस्त्याच्या कडेकुशीला, बसस्थानकाच्या शेजारी, पार्किंगच्या जागी, भर लोकवस्तीच्या ठिकाणी गाड्या थांबवून मूत्रविसर्जन करणारे तथाकथित सुशिक्षित तर आपल्याला येता-जाता बघावे लागतात. आपण काहीतरी मर्दुमकीचे काम करीत आहोत असाच चेहर्‍यावरील अविर्भाव असतो. इथे थोडेतरी एक नागरिक या नात्याने सामाजिक भान, संवेदनशीलता याचा विचार करायला नको का?
    विविध दुकाने, आस्थापने, बाजारपेठा, संस्था, सरकारी कार्यालये, छोटी बसस्थानके, ग्रामपंचायत परिसर आदी ठिकाणी शौचालये किती गरजेची आहेत याची किंचितही जाणीव त्या-त्या भागाचे नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांना नाहीच, पण निदान गावातील तरुण-तरुणींना… ज्यांना समज आहे त्यांनी तरी पुढाकार घेऊन शौचालयांची निर्मिती करण्यासाठी सामंजस्याने नाहीतर दबावतंत्र अवलंबून एकत्रित प्रयत्न करायला नकोत का?
    गोव्यात अशीही काही गावे आहेत जिथे आजही सकाळी काजींच्या डोंगरात तर संध्याकाळी रस्त्याच्या कडेला अंधारात हातात तांब्या, बाटल्या पाण्याने भरून घेऊन शौचास बसतात.

इतकी वर्षे राज्य करूनही या महत्त्वाच्या मूलभूत समस्येबाबत लोकनेत्यांची किती अनास्था आहे याचा विचार करताना आपण कोणत्या दिशेने जातो आहोत, हेच कळत नाही. आजच्या घडीला आपल्याला निरोगी, निकोप माणूस हवा, की सर्वसामान्य माणसाला अज्ञानात ठेवून पैसा आणि अधिकारच गाजवायचा आहे? मध्यंतरी फोंडा येथील रसवंतिगृहातील एका कामगाराने गिर्‍हाईकांना उसाचा रस देण्याच्या भांड्याचा मुतारी म्हणून वापर केला होता. मोठी खळबळ उडाली होती. संपूर्ण दिवसभर राबवून घेताना त्यांना क्षणाची उसंत नाही, मुतारीची व्यवस्था नाही तर त्यांनी करायचे तरी काय? ही परिस्थिती फक्त याच ठिकाणची नाही. मोठमोठ्या इमारती बांधल्या जातात, त्यांत शौचालय बांधतानाही नियोजनाचा अभाव जाणवतो.

  • आजकाल छोटे कुटुंब असले तरी घरे मोठी बांधली जातात. परंतु तिथेही शौचालयाची उभारणी करताना एकतर मागच्या बाजूला एखाद्या अडगळीच्या जागी, नाहीतर अगदीच छोटी जागा व्यापेल एवढेच त्याला प्राधान्य दिले जाते. आरोग्याशी निगडित असलेल्या या गोष्टीला अग्रक्रम द्यावा असे अजूनही सुशिक्षित समाजाला वाटत नाही, हा विचारांचा संकुचितपणा आहे.

प्रवास करताना तर ही समस्या स्त्रियांना- मुलींना भेडसावत असते. याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. काही वर्षांपूर्वी आपल्याच राज्यातील एका महिलेने मोठे धाडस दाखवून शौचालये नसल्याने महिलांना कसा त्रास होतो त्याचा निषेध म्हणून बसस्थानकातच लोकांच्या समोर मुतारी केली. अनेकांनी त्यावेळी त्यांना दूषणे दिली होती. त्यांत महिलांचा अग्रक्रम होताच. पण त्या डगमगल्या नाहीत.

  • गोव्याच्या महानगरांतील झोपडपट्टीच्या परिसरात एखादं शौचालय असले तर असले; त्यात तीस रुपये देऊन वापर करावा लागतो. त्यातही महिला गेल्यावर तिथं पुरुष घोटाळतात. मग सरळ समुद्रकिनार्‍यावरच विधी आटोपून येणं होतं. ही अशी कित्येक उदाहरणे आहेत. ती खूपच धक्कादायक असून कल्पनाही करवत नाही असे चित्र नजरेसमोर येते.
    प्रवासाच्या निमित्ताने फिरणे होते. त्यातील अनेक प्रसिद्ध जागांवरही असेच अनुभव येतात. यामधून धार्मिक स्थळेही सुटलेली नाहीत.

गौतमीपुत्र सातकर्णीच्या कालखंडात गोदावरी नदीकिनारी वसलेले ‘पैठण’ राजधानीच्या लौकिकास पात्र ठरले होते. देशात पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आणि परिसरातील गावे कशी ओंगळवाणी झालेली आहेत हे पैठणला गेल्यावर अनुभवता त्यातील गांभीर्य कळले. इथे संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा झाडीत उघड्यावर शौचास जाणार्‍या स्त्रियांची धडपड पाहताना अंगावर शहारे येतात. ज्या महाराष्ट्रात अण्णा हजारेंच्या प्रेरणेने राळेगंजसिद्धीचा कायापालट झाला, पोपटराव पवारांच्या नेतृत्वाखाली हिवरेबाजार आदर्श ठरला, त्याच राज्यात आशिया खंडातील धारावीसारख्या झोपडपट्टीची परिस्थिती मनाला अस्वस्थ करते. रेल्वेमार्गावर सकाळी सकाळी शौचास जाणार्‍यांची धडपड केविलवाणी वाटते.

कर्नाटकातील ऐहोळे हा गाव प्राचीन दगडी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे दाटीवाटीने हजारोंच्या संख्येने छोटी-मोठी मंदिरे आहेत. स्थापत्त्यकलेचा एक मनोरम आविष्कार इथे इतिहास-संस्कृतीच्या अभ्यासक, संशोधकांना नेहमीच खुणावत असतो. परंतु या परिसरात सर्वत्र शौच आणि मुतारीचे साम्राज्य असून पाय घालायलाही जागा नाही अशी विदारक परिस्थिती आहे.
स्वच्छता जीवनात किती महत्त्वाची आहे, उघड्यावरील शौच हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, याचा दुरान्वयेही संबंध हा परिसर बघितल्यावर येत नाही. कपडे, घरे, पैसे, दागिने, संपत्ती याकडे जसे जाणीवपूर्वक लक्ष देतो तसे शौचालय ही महत्त्वाची गरज आहे आणि बाकीच्या भौतिक सुखांच्या गरजेपेक्षा शौचालयांची गरज मोठी आहे हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. ही जाणीव होणे गरजेचे आहे.

आज पर्यटन व्यवसायासाठी नावारूपास आलेले आपले गोवा राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. शेती-बागायती खाण व्यवसायामुळे ओस पडली. उपजीविकेसाठी लोकांनी शहरांत स्थलांतर केले. देशभरातून उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरितांचे लोंढे गोव्यात स्थायिक झाले आहेत. अशा बर्‍याच ठिकाणी संडास, मुतारी, न्हाणीघर यांची सुविधा, त्याचप्रमाणे केरकचरा, मलमूत्र विसर्जन आणि सांडपाणी यांच्या समर्थ विल्हेवाटीच्या पर्यायाअभावी अशा वस्ती रोगराईला निमंत्रण देणार्‍या ठरलेल्या आहेत.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी समाजाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरी मलमूत्र, केरकचरा, सांडपाणी यांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने येथील स्थिती नियंत्रणात आणणे कठीण आहे. महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाई आणि जलमार्ग यांच्या सुविधांमुळे मुरूम दगडांनी युक्त मुरगाव बेशिस्तीने वास्को महानगरात रुपांतरित झालेले आहे. राजधानी पणजी शेजारी असलेल्या चिंबलच्या इंदिरानगरमध्ये सांडपाणी, केर, मलमूत्र विसर्जन यांची विल्हेवाट लावणारी यंत्रणा दिसत नाही.
आजपासून तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत आमच्याकडे गटार योजना, सार्वजनिक न्हाणीघर, शौचालये यांची सोय होती. आरोग्यासाठी प्राधान्य दिले जायचे. स्वातंत्र्यानंतर मात्र मोठमोठे प्रकल्प हाती घेतले. मोठी धरणे, महामार्ग यासाठी कामगारवर्ग विविध राज्यांतून आला. वर्षोनुवर्षे हे प्रकल्प सुरू राहिले. ते पूर्ण झाल्यावर कामगारांचे स्थलांतर व्हायला हवे होते ते झाले नाही. ते तेथेच राहिले. त्यांच्या मतांचा वापर झाला. पण त्यांना अजूनही शौचालय, पाणी, वीज यांसारख्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत. काहींनी शौचालये स्वखर्चाने बांधली तर स्थानिक नेतृत्व त्यांची अडवणूक करीत आहे. हे भयानक आणि चीड आणणारे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण मंडळाने वाळवंटी नदीच्या पाण्याचे नमुने घेतले होते. ते प्रदूषित आढळले. त्यामुळे या परिसरातील स्थानिक पंचायतींवर नदीपात्रात मलमूत्र केले जाणार नाही, कचरा फेकला जाणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी गोवा मानव हक्क आयोगाने कानपिचक्या दिल्या होत्या. पण कृती शून्य. उलट जे करतात त्यांची मात्र अडवणूक होते आहे. निर्मल भारत योजना, सुलभ शौचालय यांसारख्या योजना प्रामाणिक इच्छाशक्तीच्या बळावर राबविता आल्या असत्या तर आपले छोटे राज्य खरंच नंदनवन झाले असते. पण असे होत नाही, हीच खंत आहे. आपापल्या प्रतिनिधींना याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. कर्नाटकातील दिघी गाव गोव्याच्या सांगे तालुक्याच्या शेजारी आहे. काळी नदीचे उगमस्थान इथे आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक घराला शौचालय ही योजना राबविली. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज हे आर्थिकदृष्ट्या गरीब गाव आरोग्याची आणि विचारांच्या श्रीमंतीची लेणी लेवून निसर्गाच्या कुशीत वावरत आहे.

चांदगडचे ढोलगरवाडी गाव सर्पासाठी प्रसिद्ध. या गावातील लोक आपली मुलगी सासरी पाठविताना तिथे शौचालय आहे की नाही याची चौकशी करूनच मुलगी देतात. ‘टॉयलेट- एक अमर प्रेमकथा’ या चित्रपटातही वास्तव समस्या मांडली गेली आहे. परंतु चित्रपट फक्त मनोरंजनासाठी असतात ही मानसिकता धारण करून चित्रपटाकडे वळणार्‍या समाजात म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. याबाबत आपल्याला डोळसपणे विचार करायला हवा. त्यासाठी कृतिशील व्हावेच लागेल. सरकार पातळीवर योजना आहेत पण त्यांची माहिती सर्वसामान्यांना दिली जात नाही. त्यासाठीचा पाठपुरावा केला जात नाही. अंतर्गत राजकीय चहाड्या- चुगल्यांतून नाती बिघडतात, मनं कलुषित होतात. त्यामुळे निकोप विकास खुंटतो. गाव नितळ आणि माणसे विचाराने, शरीराने आरोग्यदायी व्हावीत म्हणून आपल्याला शहाणे व्हायचे आहे.