टेबलटेनिसपटू साथियानने रचला इतिहास

0
155

भारताच्या जी. साथियान याने आयटीटीएफ-एटीटीयू आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने जागतिक क्रमवारीत १५१व्या स्थानावर असलेल्या उत्तर कोरियाच्या एन जी सोंग याचा ११-७, ११-८, ११-६ असा पराभव केला. या प्रतिष्ठेच्या खंडीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा साथियान हा केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी १९७६ साली दिल्लीच्या सुधीर फडके यांनी ‘अंतिम ८’मध्ये प्रवेश केला होता. सोंग याला नमविण्यापूर्वी साथियान याने ‘अंतिम ३२’मध्ये इराणच्या अलमियान नौशाद याचा कडवा प्रतिकार ८-११, ११-७, ११-६, ११-५ असा पराभव करत आगेकूच केली होती. उपांत्यपूर्व फेरीत मात्र साथियान याला चीनच्या ली गाओयुआन याच्याकडून ७-११, ५-११, ११-८, ८-११ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले. अँथनी अमलराज याला अंतिम ३२मध्ये काल तैवानच्या चेन चिएन एन याने ११-६, ११-८, ११-८ असे हरवून बाहेरचा रस्ता दावविला. पुरुष दुहेरीत जी. साथियान व अचंथा शरथ कमल यांना पदक फेरीत स्थान मिळविता आले नाही. चीनच्या लियांग जिंगकून व लिन गाओयुआन यांनी भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत ११-६, १०-१२, ११-७, ८-११, ११-७ असा पराभव केला.