टी-२० मालिकेतही टीम इंडियाची सरशी!

0
161
  • सुधाकर रामचंद्र नाईक

ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी मालिका विजयापासून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची गाठत इंग्लंडवरील कसोटी मालिका विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या अंतिम ङ्गेरीत धडक दिलेली आहे.

कसोटी मालिकेपाठोपाठ (३-१) अखेरपर्यंत रंगलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत पाहुण्या इंग्लंडवर ३-२ असे पारडे उलटवीत भारतीय क्रिकेट संघाने आपले आधिपत्य जारी राखले आहे. कसोटी मालिकेतील अपयशानंतर इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश संघाने आयसीसी टी-२० मानांकन यादीतील आपल्या अग्रमानांकनाला साजेशी अशी कामगिरी बजावून १२ मार्चला झालेल्या पहिल्या टी-२० मुकाबल्यात यजमानांवर आठ गडी राखून सङ्गाईदार विजय मिळविला आणि ‘इन्स्टंट’ क्रिकेटमधील आपल्या शक्तिसामर्थ्याची चुणूक दर्शविली. तथापि, दुसर्‍या सामन्यात नाणेङ्गेकीच्या अनुकूल कौलानंतर कोहली आणि कंपनीने सात गडी राखून बाजी मारीत बरोबरी साधली. तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने परत एकदा आपले वर्चस्व सिद्ध करीत आठ गडी राखून बाजी मारली. चौथ्या सामन्यात मात्र यजमानांनी पाहुण्यांवर अंकुश राखीत आठ धावांच्या विजयासह मालिकेत बरोबरी साधली आणि अखेर पाचव्या व निर्णायक मुकाबल्यात ब्रिटिश संघावर ३६ धावांनी मात करीत सलग सहावा टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका विजय साजरा केला. उभय तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांत आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांतील भारताचा हा दहावा विजय होय.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ‘वीनाप्रेक्षक’ रंगलेल्या या ‘इन्स्टंट’ प्रतियोगितेतील निर्णायक अंतिम मुकाबला अपेक्षेप्रमाणे रंगला. के. एल. राहुल सलामीवीर म्हणून लय साधण्यात असङ्गल ठरल्याने टीम इंडियाच्या संघसूत्रधारांनी या महत्त्वपूर्ण मुकाबल्यात कर्णधार वीराट कोहलीला सलामीवीर रोहित शर्माच्या साथीने डावाचा प्रारंभ करण्यास उतरविण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत यशदायी ठरला. महत्त्वपूर्ण मुकाबल्यासाठी आपले सर्वोत्तम ‘ऍसेट’ समुच्चित करण्याची ही कल्पना खरोखरच समयोचित होती. कर्णधार-उपकर्णधाराने आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरविताना भारतीय डावाचा भक्कम पाया रचून ९४ धावांची धडाकेबाज सलामी दिली. विशेष म्हणजे उभयतांनी पहिल्या सहा षटकांत केलेली ६० धावांची भागी ही भारताची मालिकेतील ‘पॉवर-प्ले’मधील सर्वोत्तम सलामी होय. विशेष म्हणजे उभयतांनी एकमेकांना दिलेली साथही लक्षणीय ठरावी. रोहितने प्रारंभापासून आक्रमक ङ्गटकेबाजीकडे कल ठेवला, तर कर्णधार कोहलीने त्याला साथ देण्याची दुय्यम भूमिका बजावली. प्रारंभिक सामन्यातील विश्रांतीनंतर गेल्या दोन सामन्यांत विशेष ‘लय’ साधू न शकलेल्या रोहितने आपला ‘रो हीट ङ्गॉर्म’ साधीत केवळ ३४ चेंडूत ५ उत्तुंग षटकारांसह ६४ धावा चोपीत तो ‘गेम चेंजर ऑङ्ग दी मॅच’ ठरला. रोहितचे हे २२ वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक होय. नवव्या षटकात बेन स्टेकसच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. त्याच्याबरोबरील ९४ धावांच्या सलामीत केवळ २२ धावांचे योगदान असलेल्या कोहलीनेही नंतर आपले नियमित ‘वीराट’ दर्शन घडविताना ३६ चेंडूत २ चौकार आणि तेवढ्याच षटकारांसह २८ वे टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकविण्याच्या दिशेने मार्गाक्रमण करत नाबाद ८० धावा चोपल्या. कोहलीला सलामीस उतरण्याची तशी ही पहिली खेप नव्हे. आतापर्यंत त्याने सात वेळा भारतीय डावाची सुरुवात केलेली आहे. २०१२ मध्ये कोहलीने न्यूझिलंडविरुद्ध सलामीवीर म्हणून सर्वोच्च ७० धावा ङ्गटकावल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या नाबाद ८० ही त्याची सलामीवीर म्हणून सर्वोत्तम कामगिरी होय. याआधी २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध त्याने सलामीवीर म्हणून शेवटची भूमिका बाजवली होती. भारताच्या या टी-२० मालिका विजयात प्रमुख योगदान देताना तीन अर्धशतकांसह २३१ धावा चोपीत वीराट मालिकावीर पुरस्काराचा सार्थ मानकरी ठरला! कोहलीचा हा सहावा मालिकावीर किताब होय! वीराटने या कामगिरीसह २०२० मधील न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेतील के. एल. राहुलने नोंदलेला २२४ धावांचा विक्रम मोडला. २०१८ मध्ये कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजविरुद्ध २२३ धावा नोंदल्या होत्या.
रोहित शर्मा बाद झाल्यावर कोहलीच्या साथीला आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा धडाका दुसर्‍याही सामन्यात जारी राखताना केवळ १७ चेंडूत ३२ धावा चोपल्या. पदार्पणात अर्धशतक झळकविण्याची किमया साधलेल्या यादवने आपला तुङ्गानी धडाका जारी राखताना रशिदच्या गोलंदाजीवर सलग दोन छक्के आणि १२ व्या षटकात ख्रिस जॉर्डनच्या एका षटकात चार चौके लगावले. चौथ्या क्रमावर बढती दिलेल्या हार्दिक पांड्यानेही आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत १७ चेंडूत नाबाद ३९ धावा तडकावल्या. रोहित-वीराट-सूर्या-हार्दिक यांच्या धडाक्यात भारताने निर्धारित २० षटकांत २ बाद २२४ धावांचा मजबूत पल्ला गाठला. मालिकेत प्रथमच दोनशेचा टप्पा ओलांडला गेला. २२५ धावांच्या अवघड लक्ष्याच्या पाठलागातील इंग्लंडला प्रारंभिक जबर धक्का देताना अनुभवी द्रुतगती भूवनेश्‍वर कुमारने पहिल्या षटकात सुरेख ‘इनस्विंगर’वर बहरातील सलामीवीर जेसन रॉयची यष्टी उखडली. तथापि, जोस बटलर (३४ चेंडूत ५२) आणि डेविड मलान (४६ चेंडूत ६८) यांनी दुसर्‍या यष्टीसाठी १३० धावांची भागी नोंदवीत भारतीय गोलंदाजांना घाम आणला. तथापि, दुखापतीतून पूर्णतया सावरल्याचे दर्शविताना अनुभवी भूवनेश्‍वरने ही धोकादायक ठरू पाहणारी जोडी ङ्गोडताना बटलरला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असतानाही इंग्लिश ङ्गलंदाजांवर नियंत्रण राखलेल्या भूवनेश्‍वरने आपल्या चार षटकांच्या कोट्यात तब्बल १७ चेंडू निर्धाव टाकीत केवळ १५ धावांत दोन बळी घेतले आणि अखेर तो ‘सामनावीर’ ठरला.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून ‘ङ्गॉर्मा’त आलेल्या शार्दुल ठाकूरनेही (३-४५) इंग्लंडला आपला हिसका दाखवताना पंधराव्या षटकात डेविड मलान आणि जॉनी बैयरस्टॉ या खंद्या ङ्गलंदाजांना तंबूत पाठवीत भारताच्या यशाचा मार्ग खुला केला. हार्दिक पांड्याने इंग्लिश ङ्गलंदाजीतील हवा काढताना कर्णधार इऑन मॉर्गनचा अडथळाही दूर केला आणि २० षटकांत ८ बाद १८८ धावापर्यंतच मजल गाठता आलेल्या पाहुण्यांना निर्णायक मुकाबल्यातील ३६ धावांच्या पराभवासह मालिकाही (२-३) गमवावी लागली.
कोविड-१९ ने जगभरात माजविलेल्या भयावह आंतकानंतर ‘अत्यल्प किंवा वीना प्रेक्षक’ का होईना, क्रिकेटादी लोकप्रिय खेळ सुरू झालेले आहेत. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी मालिका विजयापासून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची गाठत इंग्लंडवरील कसोटी मालिका विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या अंतिम ङ्गेरीत धडक दिलेली आहे. आणि आता इंग्लंडविरुद्धची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्वदेशी होणार्‍या टी-२० विश्‍वचषकासाठी सज्ज असल्याचेही दर्शविले आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सीराज, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा आदी उमद्या क्रिकेटपटूंनी आपले नाणे खणखणीत असल्याचे सप्रमाण दर्शविलेले असून बुधवारी पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय मुकाबल्यात ६६ धावांनी बाजी मारलेला भारतीय संघ मालिका विजयांची हॅट्‌ट्रिक नोंदवील अशी अपेक्षा बाळगणे अनाठायी न ठरो!