टीम इंडिया पुढील वर्षी करणार इंग्लंड दौरा

0
256

>> ईसीबीने केली पुष्टी; खेळणार पाच कसोटींची मालिका

टीम इंडिया पुढील वर्षी इंग्लंड दौर्‍यावर येणार असल्याची पुष्टी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मोर्डाने काल केली. या दौर्‍यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताच्या या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडिया यापूर्वी २०१८मध्ये इंग्लंड दौर्‍यावर गेली होती. त्यावेळी इंग्लंडने भारतीय संघाला ४-१ असे नमविले होते. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या वनडे मालिकेने या दौर्‍यास प्रारंभ होणार आहे. हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार असून लगेच इंग्लंडचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौर्‍यात ते भारताबरोबर ४ कसोटी, ४ वनडे आणि ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल.
त्यानंतर ऑगस्टमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे.

या दौर्‍यात इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटींची मालिका खेळली जाणार. हे सामने अनुक्रमे ट्रेंट ब्रिज, लॉर्ड्स, हेडिंगले, किआ ओव्हल आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळले जातील. ट्रेंट ब्रिजवर ४ ते ८ ऑगस्टपर्यंत होणार्‍या पहिल्या कसोटीने या मालिकेला प्रारंभ होणार आहे. तर ओल्ड ट्रॅफर्डवर १० ते १४ सप्टेंबरपर्यंत होणार्‍या शेवटच्या लढतीने या मालिकेची सांगता होणार आहे.

भारताच्या इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक : पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज (४-८ ऑगस्ट), दुसरी कसोटी, लॉर्ड्स (१२-१६ ऑगस्ट), तिसरी कसोटी, हेडिंगले (२५-२९ ऑगस्ट), चौथी कसोटी, किआ ओव्हल (२-६ सप्टेंबर), पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड (१०-१५ सप्टेंबर).