झिंबाब्वेचा अफगाणवर ऐतिहासिक विजय

0
118

कर्णधार हॅमिल्ट्‌न मासाकाद्झा याने आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चोपलेल्या ७१ धावांच्या जोरावर झिंबाब्वेने काल शुक्रवारी अफगाणिस्तानचा ७ गडी व ३ चेंडू राखून पराभव केला. या कामगिरीसह झिंबाब्वेने अफगाणिस्तान संघाची टी-ट्‌ेंटीमधील सलग १२ विजयांची मालिका खंडित केली. झिंबाब्वेने क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारात अफगाण संघावर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेले १५६ धावांचे माफक लक्ष्य झिंबाब्वेने १९.३ षटकांत ३ गडी गमावून गाठले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज रहमनुल्ला गुरबाज व हझरतुल्ला झाझाय यांनी संघाला तुफानी सलामी दिली. या द्वयीने केवळ ९.३ षटकांत ८३ धावा जोडल्या. आपला केवळ तिसरा आंतरराष्ट्रीय टी-ट्‌ंेंटी सामना खेळणार्‍या १७ वर्षीय गुरबाजने केवळ ४७ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावा कुटल्या. दुसर्‍या टोकाने झाझाय याने ३१ धावांची उपयुक्त खेळी केली. लेगस्पिनर मुतोंबोद्झी याने झाझायला बाद करत ही धोकादायक जोडी फोडली. गुरबाजने यानंतर शफिकुल्ला (१६) याच्या मदतीने संघाचे शतक फलकावर लावले. तेराव्या षटकात शफिकुल्ला बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव कोसळला. वेगवान गोलंदाज ख्रिस पोफू याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करताना केवळ ३० धावांत ४ बळी घेतले. मुतोंबोद्झीने दोन बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. त्यामुळे १८० धावा दृष्टिपथात असताना त्यांना केवळ १५५ धावांवर समाधान मानावे लागले. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना झिंबाब्वेला यावेळी चांगली सुरुवात मिळाली.

ब्रेंडन टेलरने डावातील व त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार व दुसर्‍यावर षटकार ठोकून टेलरने त्याला बॅकफूटवर ढकलले. परंतु, मुजीबनेच त्याला काटा काढत अफगाण संघाला पहिले यश मिळवून दिले. रेजिस चाकाब्‌वा याने यानंतर मासाकाद्झा याची चांगली साथ दिली. ३२ चेंडूंत ३९ धावा जमवताना त्याने मासाकाद्झाला अधिक ‘स्ट्राईक’ मिळेल याची दक्षता घेतली. मासाकाद्झा यानेदेखील मिळालेल्य संधींचा पुरेपूर लाभ घेत ४२ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७१ धावांची दमदार खेळी केली. शॉन विल्यम्स (२१) व तिनोतेंदा मुतोंबोद्झी (१) यांनी अधिक पडझड होऊ न देता संघाला विजयी केले. यजमान बांगलादेशचा समावेश असलेल्या या तिरंगी टी-ट्वेंटी मालिकेतून झिंबाब्वेचे आव्हान या सामन्यापूर्वीच आटोपले होते. परंतु, आपल्या कर्णधाराला विजयी निरोप देण्यासाठी त्यांनी शानदार खेळ दाखवला.