झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अवैध खाणकामप्रकरणी नोटीस

0
11

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात नोटीस बजावली आहे. आज गुरूवारी मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

पंकज मिश्रा बरहैटचे आमदार आहेत. त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवैध खाणकाम प्रकरणात तपास यंत्रणेने देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या साहिबगंज आणि आसपासच्या परिसरात तब्बल १ हजार कोटींचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अवैध उत्खननातून त्यांनी मोठी संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.