ज्योत सावित्रीची..!

0
698
  • भाग्यश्री केदार कुलकर्णी 
    (पर्वरी)

समाजातील या विकृत उंबरठ्यावर …
एक सखी काय अपेक्षा करते..
सावित्रीची ज्योत जागृत रहावी ही इच्छा व्यक्त करते..!

स्त्री हे विसरलीय की, तिच्यातच उत्पत्ती व संहार करण्याची क्षमता उपजतंच आहे फक्त तिला त्याची जाणीव नाही. ज्याप्रमाणे, ज्ञानाने सावित्रीबाईंनी प्रत्येक प्रसंगाला न घाबरता तोंड दिले तसेच आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा उपयोग स्वसंरक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने केला तर आजही ती ज्योत अखंड तेवत राहू शकेल!!
.

सावित्री या शब्दाचा अर्थ सूर्याशी निगडित आहे. सूर्याची मुलगी सवित्र म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत आणि निर्माणकर्ता ब्रम्ह देवाच्या पत्नीचे नावही सावित्री म्हणजे उत्पत्तीचा स्त्रोत… आणि एक सावित्री अशीही होती की जिच्या भक्तिनें यमालाही माघार घ्यावी लागली.

या तिन्ही गुणांनी युक्त असलेल्या अशा सावित्रीबाई ज्योतिबा फुले… जीने शिक्षणाच्या उत्क्रांतीचा पाया रचला व सूर्याच्या ऊर्जेसारखी खंबीरपणे पाय रोवून उभी राहिली आणि इतिहासात अमर झाली. तिला प्रथम विनम्र अभिवादन!! कारण आज त्यांच्यामुळेच आपण लिहितो-वाचतो आहोत.
जसे विवेकानंदांना एक युगपुरुष संबोधले जाते तसेच सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची क्रांति घडवणारी एक ज्योत जीने स्त्री जन्माचे जीवनच प्रकाशाने उजळून टाकले अशी ‘क्रांतीज्योति’ संबोधले जाते.

एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्यावेळी भारतासारख्या रुढीवादी परंपरा असणार्‍या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल’ एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ज्योतिबांनी इ.सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने ज्योतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटच्या मुलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केले. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया नरकात जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाईंजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.

संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्यासारखीच वाटत. ही सर्व कृत्ये त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे. एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून … मुलींना आणि खालच्या जातीच्या लोकांना शिकवणे तू बंद कर, नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही… अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.

सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.
त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे अशी रीत होती. विधवा स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे. हे स्त्रियांचे दुःख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दुष्ट प्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची सभा बोलावली. आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव त्या सर्वांना करून दिली.

ज्योतिरावांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केलेली आहे. स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे, मी सदा अर्पाया न भी किमपिही सर्वस्व माझे कदा… अशी वराला मंगलाष्टकामधून प्रतिज्ञा वदवायला लावणारी सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून त्यात ३५ स्त्रियांची बाळंतपणे पोटच्या मुलीच्या मायेने त्यांनी केली. त्या अर्धशतकापर्यंत ज्ञानार्जन, अध्यापन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करीत राहिल्या. फेब्रुवारी – मार्च १८९७ च्या प्लेगच्या भयंकर साथीत रुग्णांना मदत करण्यासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी औषधोपचार केले.

शिक्षणासाठी त्यांना करावा लागलेला एवढा मोठा संघर्ष पाहता आज सगळी साधनसामग्री सहज उपलब्ध असूनही देणारा व घेणारा यांच्या भावनांमधे प्रचंड व्यवहारिक दृष्टीकोन दिसतो. कुठेही देण्याची तळमळ नाही ना कुठेही घेण्याची जिज्ञासा!

आजची शिक्षणपद्धती प्रचंड स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलीला इंजीनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जात असावी बहुतेक) एमबीए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून मुलांना आत्तापासून त्या भयंकर ‘रॅट रेस’ मध्ये अक्षरश: ढकललं जातंय. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या ऍडमिशन्स अवलंबून आहेत.

ज्ञानार्जन म्हणजे सगळ्यात मोठे कार्य आणि त्याचा संपूर्ण र्‍हास होतांना दिसतोय. कारण ‘साक्षर होणे’ ही मूलभूत गरजंच हरवलीय. शिक्षणातील नवे स्तर आणि त्यांच्यातील भेद यांचीच चर्चा आहे व त्यातून मूळ संकल्पनाच जीर्ण व लोप पावलेली दिसते. याउलट, खंडीभर शुल्क की जे सर्वसामान्य व्यक्तीला अजिबातंच परवडणार नाही! अशा भरपूर शुल्क घेणार्‍या शाळा, ज्यादाचे कोचिंग क्लासेस, इंग्रजी माध्यमातून शिक्षण नाही घेतले तर मुले मागे पडतील असे न्यूनगंड अशा अनेक अडचणींतून जात आहे आजची शिक्षण पद्धती… त्यात शिक्षक, पाल्य आणि पालक यांच्या काय भूमिका आहेत हे कोणीच सांगू शकत नाही. फक्त या गोंधळात सगळेच जण भरडले जाताहेत ऐवढे नक्की..!!!!

सावित्रीबाईसारख्या कमालीच्या धडाडी असणार्‍या स्त्रीचा आजच्या काळातील सावित्रीला पाहतांना मात्र नक्कीच ऊर भरून आला असता. इतके मिळालेले स्वातंत्र्य, इतकी हुशार, स्वावलंबी, ध्येयवादी आजची सावित्री प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवून तटस्थ उभी आहे हे पाहून अभिमानाचे अश्रू नक्की तरळले असते. पण एक खंत प्रकर्षाने जाणवली असती ती म्हणजे, समाजात वाढलेले हे स्त्रीभ्रूणहत्या व बलात्कारासारखे विकृत रोग..!! यांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व स्वसंरक्षणाचा अभाव.

स्त्री हे विसरलीय की, तिच्यातच उत्पत्ती व संहार करण्याची क्षमता उपजतंच आहे फक्त तिला त्याची जाणीव नाही. ज्याप्रमाणे, ज्ञानाने सावित्रीबाईंनी प्रत्येक प्रसंगाला न घाबरता तोंड दिले तसेच आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा उपयोग स्वसंरक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने केला तर आजही ती ज्योत अखंड तेवत राहू शकेल. चला तर मग आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ आपण स्वसंरक्षणाची गुढी उभारण्याचा निश्चय करूयात आणि स्वसंरक्षणाची राखी आपल्यामधील सावित्रीला स्वतःच बांधूयात.

म्हणत नाही मी की, सगळेच सारखे असतात….
पण एखादी संकटात सापडली की…
सगळेच भांबावलेले दिसतात…

म्हणत नाही मी की, सगळीच चूक त्यांची असते…
पण काहीतरी मिळविण्याच्या हेतुंमधे….
संस्कारांची कमी नक्कीच असते…

समाजातील या विकृत उंबरठ्यावर …
एक सखी काय अपेक्षा करते..
सावित्रीची ज्योत जागृत रहावी ही इच्छा व्यक्त करते..

कोणीही मदतीला येणार नाही..
ही खूणगाठ मनाशी बांधावी….
बाहेर निघतांना स्वसंरक्षणाची राखी घट्ट बांधावी…

म्हणूनंच म्हणते, सखये…
तुझी माझी शक्ती एकवटूया..
संरक्षणाची, अस्तित्वाची नवी गुढी उभारूया….