जेवणावळी

0
263
  • गौरी भालचंद्र

पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असते. सुग्रास भोजनाचा आस्वाद गप्पाटप्पा मारूनच अनुभवावा. एका एका पदार्थाचा घमघमाट सुटलेला. चहुबाजूला या सुग्रास भोजनाचा खमंग वास पसरलेला. फारच छान वाटत असतं मनाला. प्रसन्नतेचा एक आगळावेगळा अविष्कार म्हणजे पंगत असे मला वाटते.

पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असते. सुग्रास भोजनाचा आस्वाद गप्पाटप्पा मारूनच अनुभवावा. एका एका पदार्थाचा घमघमाट सुटलेला. चहुबाजूला या सुग्रास भोजनाचा खमंग वास पसरलेला. फारच छान वाटत असतं मनाला. प्रसन्नतेचा एक आगळावेगळा अविष्कार म्हणजे पंगत असे मला वाटते.

पूर्वीच्या काळी लग्नकार्य असले की बच्चे कंपनी पहिल्या पंगतीला बसायची. तशी पहिली पंगत पाहुणे-रावळ्यांसाठी असायची, पण बच्चे कंपनी त्या पहिल्या पंगतीत घुसखोरी करायची. जेवणाची पहिली पंगत दुपारच्या सुमारास बसायची. दुपारच्या जेवणावळीत मंडप जर छोटा असला तर सावलीत जागा मिळावी म्हणून लहान मुलं सर्वात पहिली जागा पकडायची. पाहुण्यांना जर जागा उरली नसेल तर जेवण वाढणारे वाढपी लोक मुलांना दाटीवाटीने मंडपाच्या कोपर्‍यात बसायला सांगायचे.

एकदा पंगत बसली की बिना फाटलेली पत्रावळ मिळविण्यासाठी बच्चे कंपनीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागायची. पत्रावळ समोर ठेवली की मग ती वार्‍याने उडू नये म्हणून त्यावर पाण्याचा ग्लास ठेवावा लागे.

नंतर मीठ वाढणारा पंगतीत मीठ-मीठ म्हणत पळत असे. त्याला थांबवून मीठ पत्रावळीवर इथेच टाक असं सांगावं लागे… नंतर भात वाढणारा येई… वरणासाठी भाताचे आळे लहान मुलांना जमत नसे. तेव्हा शेजारी बसलेल्या बुजुर्ग माणसाकडून वरणासाठी भाताचे आळे बनवून घ्यावे लागे. चुकून आळं फुटलं तर वरण पात्रावळीच्या खाली वाहून जायचे.

वरण, भात, पुरी, भाजी वाढल्यानंतर रस्सा-भाजी यायची. तिखट लागेल म्हणून लहान मुलांना ते वाढपी नावापुरतीच भाजी वाढायचे. एक गम्मत म्हणजे वरणावर तूप वाढायला माणूस यायचा. तो तोंड बघून तूप वाढायचा. पाहुणा किंवा प्रतिष्ठित माणूस दिसला की तुपाची धार मोठी व्हायची. लहान मुलांना मात्र तुपाची बारीक धार वरणावर टाकायचे. पंगत शिरा-पुरी तसेच श्रीखंड-पुरीची असली तर लहान मुलांना श्रीखंड वाढणार्‍या माणसाला ओरडून ओरडून श्रीखंड आणि शिर्‍यासाठी आवाज द्यावा लागायचा. गरमगरम पुरीसाठी हाक द्यावी लागायची. शेजारी कोणी ओळखीचा मित्र बसला असेल तर त्याच्या पत्रावळीत बळजबरीने उरलेली पुरी टाकली जायची. असं सगळं चालायचं. पाणी वाढणारा येताना दिसला की पाणी पिऊन परत ग्लास भरून घ्यायला बच्चे कंपनी पुढेपुढे ग्लास करायची. लहानपणीच्या बैठ्या पंगतीत जी मजा होती ती आताच्या पंचपक्वान्नं असलेल्या बुफेत नाही… आजही खेड्यातील लोकांना लग्नकार्यात बैठ्या पंगतीतच जेवायला आवडते.

सणा-समारंभाच्या ठिकाणी काही मोठ्या लोकांच्या जेवणाच्या पंगतीची गडबड उडत असे. बसायला लाकडी नक्षीदार पाट, मागे टेकायला पाट व समोर चौरंग. चौरंगांवर चांदीची ताटे, वाट्या, तांब्या अशी भांडी मांडली जात. ताटाभोवती सुरेख महिरपींची रांगोळी रेखली जायची. मुख्य पाहुण्याच्या ताटाभोवती फुलापानांची सजावट असे. सुवासिक उदबत्त्यांचा गंध दरवळू लागायचा. सनईवर संगीत सुरू व्हायचे… समईंचा मंद प्रकाश वातावरण उजळून टाकत असे.

ताटात डावीकडे मीठ, लिंबू, चटण्या, कोशिंबिरी, त्याखाली भजी, पापड, खीर तर उजवीकडे बटाट्याची पिवळी धमक भाजी, डाळिंब्यांची उसळ, मध्यभागी पांढर्‍या भाताची मूद, त्यावर घट्ट साधे वरण व तूप, त्याच्या थोडे वरच्या बाजूला मसालेभाताची मूद असे. त्याच्या वरच्या बाजूला मऊ-लुसलुशीत पुरणपोळी व त्यावर साजूकतुपाची धार असे. श्रीखंड, गुलाबजाम यांसारखे पदार्थ वाट्यांमध्ये घालून बाजूलाच ठेवले जात. मग खड्या सुरात श्लोक म्हणत जेवणाला सुरुवात व्हायची. नऊवारी साड्या नेसलेल्या गृहिणी नथी सावरत वाढायला यायच्या. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होत असे…

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट… हवं तेवढं जेवण… पंगत म्हणजे श्लोक म्हणायची चढाओढ… एका रेषेत वाढलेली ताटे… ताटाला लावून काढलेली रांगोळी… आणि त्यातून मिळणारी तृप्तीची पावती… पण शहरी भागात जमिनीवर बसून पंगत आता क्वचितच दिसून येते. जमिनीवर बसून पंगतीत जेवण्याची जी मजा होती ती काही औरच होती असं आमचे आजोबा नेहमी सांगतात आम्हाला.