जुलैमध्ये विक्रमी 78 इंच पाऊस

0
9

राज्यात जुलै महिन्यात एकूण 78 इंच अशा विक्रमी पावसाची नोंद झाली असून, राज्यातील मोसमी पावसाचे प्रमाण 50.6 टक्के जास्त आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 116.24 इंच पावसाची नोंद झाली असून, एकूण 13 विभागापैकी 12 विभागात मोसमी पावसाने इंचांचे शतक ओलांडले आहे. वाळपई येथे सर्वाधिक 144.64 इंच आणि दाबोळी येथे सर्वात कमी 89.51 इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात जून महिन्यात 38 इंच पावसाची नोंद झाली होती. राज्यात चोवीस तासात आणखी 2.96 इंच पावसाची नोंद झाली. सांगे, केपे, वाळपई, साखळी, फोंडा, पेडणे आणि मडगाव या भागात जोरदार पावसाची नोंद झाली. पेडणे येथे सर्वाधिक 5.64 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे 5.25 इंच, मडगाव येथे 3.74 इंच, सांगे येथे 4.51 इंच, केपे येथे 3.95 इंच, साखळी येथे 4.14 इंच, फोंडा येथे 4.52 इंच, म्हापसा येथे 2.19 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत उत्तर गोव्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात 121.20 इंच, तर दक्षिण गोव्यात 111.87 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे शेती, बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाल्याने कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.