जी-20 बैठकांच्या तयारीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

0
6

राज्यातील 8 बैठकांच्या अनुषंगाने पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

गोव्यातील जी-20 शिखर परिषदेच्या बैठकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी राज्यात दाखल झाले असून, मंगळवारपर्यंत सदर पथक शिखर परिषदेच्या बैठकांच्या तयारीचा आढावा घेणार आहे. काल पर्वरी येथे या केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन एप्रिल महिन्यात नियोजित जी-20 बैठकांच्या तयारीचा आढावा घेत चर्चा केली.

भारताच्या जी-20 शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग आणि इतर अधिकारी यांचा समावेश असलेले केंद्रीय पथक 21 मार्चपर्यंत शिखर परिषदेच्या बैठकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात जी-20 शिखर परिषदेच्या 8 बैठकांचे आयोजन होत आहे. जी-20 शिखर परिषदेच्या आरोग्य आणि पर्यटन मंत्रालयाच्या मंत्री स्तरावरील बैठका होणार आहेत. त्यातील पहिली बैठक येत्या 17 ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे. त्यानंतर मे, जून व जुलै महिन्यातही महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. राज्यात आवश्यक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थेचे काम जोरात सुरू आहे. जी-20 शिखर परिषदेच्या बैठकांवेळी गोव्याची कला व संस्कृती, स्वयंपूर्ण गोवा, व्होकल फॉर लोकल, मिलेट्स यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यपालांसोबत बैठक
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली काल राजभवन येथे जी-20 शिखर परिषदेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. जी-20 शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, एल. रमेश बाबू, कर्नल विवेक आर्य, अशोक कुमार शर्मा, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग, जसविंदर सिंग, राधा कात्याल नारंग, डी. वेंकटेशन, आर. के. धवन, धीरज वागळे, राज्यपालांचे सचिव एम.आर.एम. राव आदींची उपस्थिती होती. या बैठकीत नोडल अधिकारी जी 20 गोवा राज्य संजित रॉड्रिग्स यांनी गोव्यात होणाऱ्या जी-20च्या बैठकांची माहिती दिली.