जीसीईटीऐवजी जेईई-मेन परीक्षेद्वारे अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश

0
10

>> तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट; २०२४-२५ वर्षापासून जीसीईटी बंद होणार

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) घेतली जाणार नसून, अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीचा प्रवेश ‘जेईई-मेन’ परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येणार असल्याचे तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या मध्यवर्ती प्रवेश विभागाने काल स्पष्ट केले.

आतापर्यंत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीचे प्रवेश हे गोवा समान प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे होत असत; परंतु आता राष्ट्रीय पातळीवरील जेईई-मेन परीक्षेत मिळणार्‍या गुणांच्या आधारावर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल.

२०२४ सालापासून राज्यात जीसीईटी घेतली जाणार नाही, असे काल तंत्रशिक्षण संचालनालयाने एका नोटिसीद्वारे स्पष्ट केले. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी जेईई-मेन २०२४ मधील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यात पाच अभियांत्रिकी महाविद्यालये असून, त्यात जवळपास १५०० जागा आहेत.

फार्मसी अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश हा नीट अथवा जेईई-मेन परीक्षेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील गुणांच्या आधारे दिला जाणार आहे. राज्यात दोन फार्मसी महाविद्यालये असून, या अभ्यासक्रमासाठी १२० जागा आहेत.

तसेच एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस (होमियोपॅथी) बीएएमएस (आयुर्वेद), अन्य आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम (पॅरा मेडिकल), बीएससी नर्सिंग व बीव्हीएससी व एएच अभ्यासक्रम (२०२४-२५) यासाठी प्रवेश मिळवण्यास नीट यूजी २०२४ (नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजीबिलीटी टेस्ट) ही परीक्षा द्यावी लागेल. वास्तूस्थापत्यशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश हा ‘नाटा’ म्हणजेच नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरमधील गुण व बारावी इयत्तेतील गुण याच्या आधारावर दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांना जेईई-मेनची तयारी करावी लागणार
येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये जीसीईटी लागू असेल. आणि त्याद्वारेच अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेल. मात्र सध्या जे विद्यार्थी इयत्ता अकरावीत शिकत आहेत, त्यांना जेईई-मेन परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.