जि. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षांची घोषणा

0
2

उत्तरेतून रेश्मा बांदोडकर, दक्षिणेतून सिद्धार्थ गावस देसाई यांची निवड

भाजपने दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा संदीप बांदोडकर यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बाबल च्यारी यांची निवड झाली आहे. दक्षिण गोवा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावस देसाई व उपाध्यक्षपदी अंजली अर्जुन वेळीप यांच्या नावाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली.

गेल्या 20 डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतींसाठी मतदान होऊन 22 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. यावेळी भाजपला उत्तर गोव्यातून 25 पैकी 18 तर दक्षिण गोव्यातून 11 जागा मिळाल्या. युतीचा घटक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर काल उत्तर व दक्षिण जिल्हा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदांची घोषणा करण्यात आली. त्यात रेईशमागूशच्या रेश्मा बांदोडकर आणि होंडाचे नामदेव च्यारी यांची उत्तर गोव्यात अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून तर दक्षिण गोव्यातून शेल्डेचे सिद्धार्थ गावस देसाई आणि बार्सेच्या अंजली वेळीप यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मगोचा उमेदवारांना पाठिंबा

मगो पक्षाने जिल्हा पंचायत अध्यक्ष वा उपाध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रकारचा दावा केला नाही. मगोने भाजप उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पत्र सादर केल्याचे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.