जिल्हा पंचायत निवडणूकः शोध आणि बोध

0
162

– शंभू भाऊ बांदेकर, माजी उपसभापती
उत्तर आणि दक्षिण गोवा अशा एकूण ५० जिल्हा पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत उत्तरेत २५ व दक्षिणेत २५ अशा मतदारसंघामध्ये ३९ नवे व ११ जुने चेहरे निवडून आले आहेत.
पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत स्तरावर गोव्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणता पक्ष कुठे आहे याचा शोध प्रत्येक पक्षाला घ्यावा लागणार आहे. पक्ष पातळीवर निवडणूक लढविण्यास कॉंग्रेस पक्षाने सुरुवातीपासून विरोध केला होता. त्या पक्षाने हे प्रकरण न्यायालयापर्यंत नेले आहे. जे अपक्ष उमेदवार होते किंवा ज्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दिली गेली, त्यात कॉंग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. तर ‘महायुती’ केलेल्या भाजपा-मगो-गोविपांना दोन्ही जिल्ह्यात आपले जिल्हाध्यक्ष निवडून आणण्यासारखी परिस्थिती असली, तरी त्या पक्षामध्येही बरीच पडझड झाल्याचे दिसते. उदाहरणार्थ: मुख्यमंत्री, सभापतींसह ६ मंत्री आणि ४ सत्ताधारी आमदारांना निवडणूक निकालाने धक्का दिला आहे.
हे असे का घडले याचा शोध त्यांना घ्यावा लागणार आहे. ‘महायुतीत’ सामील होण्यासाठी मगोने सुरुवातीला १९ जागांची मागणी केली होती. त्यांना ९ जागा देण्यात आल्या. त्यातील ५ जागा जिंकत त्यांनी ‘सिंहा’ला उभारी आणण्याचे काम केले आहे.
मिकी पाशेकोांचा ‘गोविपा’ गोत्यात आला असून त्यांनी अपयशाचे खापर आमदार कायतू सिल्वावर फोडले आहे. अपक्ष आमदार रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी भाजपाला धक्का देत अप्रत्यक्ष कॉंग्रेसची मदत घेत आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. कॉंग्रेस आमदार पांडूरंग मडकईकर यांनी आपली पत्नी व बंधूला निवडून आणले, तर दुसरे कॉंग्रेस आमदार बाबू कवळेकर यांनीही खोल (शाणू वेळीप), गिरदोली (मिनाक्षी गावकर) आणि बार्से (खुशाली वेळीप) यांना जिंकून आणून आपले पारडे आताही जड आहे, हे दाखवून दिले आहे.
बाबूश मोन्सेरात यांनी भाजपा-मगोच्या उमेदवारांना पराभूत करीत आपण व्यक्तीशः पैशांच्या जोरावर कसे राजकारण करू शकतो, हे पुनश्‍च दाखवून दिले आहे.
राज्यात पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी घोषणा करून ती प्रत्यक्षात आणणार्‍या भाजपाला मात्र हवे तसे यश मिळालेले नाही. तथाकथित ‘महायुती’ला काठावर पास होण्यातच समाधान मानावे लागले आहे. याबाबत भाजपाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. त्यांचे म्हणणे असे की, मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेले. त्याचा फटका या निवडणुकीत दिसून आला. भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर आज येथे असते, तर निकाल निश्‍चितच वेगळा लागला असता. कदाचित बाबुशचे हे म्हणणे खरे असेलही, पण जे संरक्षणमंत्री धारगळ आणि काणकोणमध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेले, तेथील भाजपा उमेदवारांना आपटी खावी लागली, हेही या संदर्भात लक्षात घ्यावे लागेल, तसेच राजकीय पक्षाचे चिन्ह नसतानाही त्या पक्षांच्या पाठिंब्यावर (विशेषतः कॉंग्रेस) उमेदवार जिंकून आले व महायुतीच्या उमेदवारांच्या नाकी नऊ आणले, हे चित्रही दृष्टीआड करून चालणार नाही. म्हणूनच या निवडणुकीच्या धक्कादायक निकालाचा शोध घेता घेता त्यातून काही बोध घेता येईल का, याचाही विचार भाजपा-मगो आणि गोविपानेही केला पाहिजे.
या निवडणुकीतून बोध घेताना विशेषतः शोध घेतला पाहिजे तो मुख्यमंत्री पार्सेकर, सभापती आर्लेकर व पर्यटनमंत्री परुळेकर, क्रीडामंत्री तवडकर आणि उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी- हे सर्वजण आपण मतदारांची नाडी ओळखली असून त्यांना काय हवे, काय नको याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे, असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सांगत होते. त्यांना त्यांच्या मतदारसंघात मतदारांनी दणका दिला आहे. यातून योग्य तो बोध घेऊन वास्तवतेचा शोध त्यांनी लावला नाही, तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचे काही खरे नाही, हे खरे की खोटे याचा शोध घ्यायला त्यांनी आतापासूनच सुरुवात केली पाहिजे, हे मात्र निश्‍चित.
एक मात्र खरे की, काही ठिकाणी आपले प्रमुख उमेदवार गमाविण्याची पाळी ‘महायुती’ वर आली, तरी दोन्ही जिल्हा पंचायती स्थापन करण्याची संधी मात्र महायुतीला प्राप्त झाली आहे. हा निकाल महायुतीला उत्साहजनक नसला तरी गुढी पाडव्याला गुढी उभारण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यात जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष होण्यासाठी जे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे केले आहेत, त्यांच्या बाबतीत ही युती काय निर्णय घेते, यावरच पुढचे भवितव्य अवलंबून आहे. शिवाय पक्षीय पातळीवर निवडणुका जिंकल्या, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन हवा तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी प्रचारादरम्यान घोषणा करणारे मुख्यमंत्री महोदय आता कोणती भूमिका घेतात, हेही पहावे लागेल.
एकूण काय, तर राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारला अनेक ठिकाणी अनपेक्षित धक्के सहन करावे लागले आहेत. तरीही दोन्ही जिल्हा पंचायतींवर मगो आणि गोविपाच्या सहकार्याने भाजप आपले झेंडे फडकविणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जेथे भाजपा-पीडीपीमध्ये विळ्या-भोपळ्याचे ऐक्य असूनही जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा सत्तारूढ होतो, तेथे मगो-गोविपा महायुतीत त्यांच्या हाती आयती आलेली सत्ता धुडकावण्याचा प्रश्‍नच नाही.
फक्त या निवडणुकांपासून प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय पक्षांपासून अपक्षांपर्यंत सगळ्यांनीच आपल्या कर्तुमकर्तृत्वाचा शोध आणि बोध घेणे हे त्यांच्या भविष्यकाळासाठी आवश्यक आहे. जिल्हा पंचायती, सत्तारूढ झाल्यानंतर कोण, कसा, का कोलांट्या उड्या मारतो, हे लवकरच कळेल.