जिल्हा पंचायतींसाठी ६६.४३ % मतदान

0
143
• चांदर येथे मतदानासाठी जाताना वयोवृद्ध महिला. • मतदान केल्यानंतर खूण दाखवताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. • कोलवा येथे मतदान करताना युवती. • डिचोली मतदारसंघातील एका केंद्रावर झालेली गर्दी. (छाया : गणादीप/विशांत वझे)

गेल्या निवडणुकीपेक्षा मतदानात १२ टक्क्यांनी वाढ; १९२ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद
काल राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६६.४३ टक्के एवढे मतदान झाले. २०१० साली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीपेक्षा ही टक्केवारी १२ टक्क्यांनी जास्त असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त एम्. मुदस्सिर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. एकूण ५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ५० मतदारसंघांतील १९२ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले आहे.उत्तर गोव्यात ६८.६४ टक्के एवढे मतदान झाले तर दक्षिण गोव्यात ६४.२३ टक्के एवढे मतदान झाले. उत्तर गोव्यात महिला मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ६८.९१३ टक्के तर पुरुष मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ६८.३६५ टक्के एवढी आहे तर दक्षिण गोव्यात पुरुषांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ६१.६४ टक्के तर महिला मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी ६६.७६८ टक्के एवढी आहे.
सर्वाधिक मतदान लाटंबार्से मतदारसंघात झाले. त्याची टक्केवारी ८५.२९ एवढी आहे तर सर्वांत कमी मतदान नावेली मतदारसंघ (दक्षिण गोवा) येथे झाले असून ते ५१.११७ टक्के एवढे आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा १२ टक्क्यांनी वाढलेल्या मतदान टक्केवारीविषयी निवडणूक आयुक्त मुदस्सिर यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
काही किरकोळ बाबी सोडल्यास एकूण मतदान शांततेत पार पडल्याचे मुस्स्सिर म्हणाले.
रिवण येथे ४ जणांना अटक
रिवण, सांगे येथे जीए – ०५ बी – ९७३३ या मोटारगाडीतून मतदारांना देण्यासाठी ४५ हजार रु. रोख घेऊन फिरणार्‍या चार जणांना अटक करून त्यांच्यावर एफ्‌आय्‌आर नोंद करण्यात आले. त्यांची नावे प्रसाद गावकर, गजानन रोहिदास रायकर, रवींद्र वेळीप व सुशांत गजानन गावकर अशी असल्याचे मुदस्सिर यांनी सांगितले.
तिसवाडीत ६५.०६३, पेडण्यात ६३.३०३ टक्के, डिचोलीत ७५.५१८ टक्के, सत्तरीत ७७.३८५ टक्के, बार्देश ६३.८५८ टक्के, फोंडा ६५.४४८ टक्के, मुरगाव ६२.३०५ टक्के, सांगे ७४.००७ टक्के, धारबांदोडा ७०.४८३ टक्के, केपे ७४.३७ टक्के, सासष्टी ५९.२२२ टक्के तर काणकोण तालुक्यात ६८.८४९ टक्के एवढे मतदान झाले.
सासष्टीत ५९% मतदान
मडगाव (न. प्र.)ः दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी सासष्टी तालुक्यातील २ मतदारसंघात ५९.२९ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांबाहेर तुरळक वाद वगळता सर्वत्र शांततेने मतदान झाले. कोठेच अनुचित प्रकार घडला नसल्याचे निर्वाचन अधिकार्‍यांनी सांगितले. सासष्टीच्या ९ मतदारसंघांत भाजपा, मगो व गोवा विकास पार्टीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यात दवर्ली व गिरदोळी येथे भाजपा, कोलवा, नुवे, राय व कुडतरी येथे गोवा विकास पार्टी तर बाणावली येथे आमदार कायतान सिल्वा यांनी पक्षाचा आदेश धुडकावून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
सासष्टीत वेळ्ळी येथे ५४.४० टक्के, राय ५२.८३ टक्के, नुवे ६९.२२, कोलवा ५५.५ टक्के, दवर्ली येथे ६५.३० टक्के, गिरदोली ६७.३६ टक्के, कुडतरी ६२.५५ टक्के, नावेली ५१.१५ टक्के व बाणावलीत ५६.४० टक्के मतदान झाले. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. कोलवा मतदारसंघात नेली रॉड्रिग्ज यांचा मतदान केंद्रात प्रचार चालल्याची तक्रार विरोधकांनी केली, तर बाणावलीचे आमदार कायतान डिसिल्वा यांनी विरोधकांनी रात्री पैशाचा वापर केल्याची तक्रार केली.
पारांपई-करंजाळीतील ४०० मतदारांचा बहिष्कार
फोंडा तालुक्यातील वेलिंग-प्रियोळ मतदारसंघात येणार्‍या पारांपई – करंजाळी – मडकई या गावच्या दहाजण लोकांनी अगोदर जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा पंचायतीसाठी झालेल्या मतदानावर बहिष्कार घातला. जवळ जवळ ४०० पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले नाही. करंजाळी येथे शेतीत खारे पाणी साठवून बेकायदा मत्स्य व्यवसाय केला जात असून त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होत असल्याने नागरिकांनी निवडणुकीपूर्वी मोर्चा काढून कारवाईची मागणी केली होती. नपेक्षा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
पंचवाडी येथे २ तास मतदान प्रक्रिया रोखली
शिरोडा मतदारसंघातील मुडास – पंचवाडी येथील ७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात दोन तास मतदान प्रक्रिया बंद करण्यास मतदारांनी भाग पाडले. या मतदान केंद्रावर सकाळी ८.१५ वाजता सिस्टर क्लोटिल्डा व सिस्टर अनिफा या मतदान करण्यासाठी गेल्या असता तेथील सरकारी कर्मचारी मतपत्रिकेवरील क्रमांक जाहीर करून तो टिपून घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी त्यांनी केंद्रावरील अधिकार्‍यांकडे निषेध व्यक्त करून ही गोष्ट केंद्राबाहेर इतरांना सांगितली असता उमेदवारांनीही आक्षेप घेतल्याने तणाव निर्माण झाला. मतदारांनीही या गोष्टीला हरकत घेऊन मतदान करण्यास नकार दिला. शेवटी दोन तासानंतर साहाय्यक निर्वाचन अधिकारी रोशल फर्नांडिस यांनी या हरकतीवर स्पष्टीकरण केल्याने या केंद्रावरील मतदान सुरू झाले.