जिथे सागरा…

0
141
  • राधा भावे

‘‘हो गं, अशा ठिकाणी अन् अशा कातरवेळी जुनं-जुनं खूप काही आठवून जातं.’’ तिच्या डोळ्यांत व्याकुळता भरून आली होती. तिला काहीतरी सांगायचं होतं का मला? मनाच्या सांदीकोपर्‍यात दडलेलं, कदाचित सलणारं…. किंवा एखादं दुखरं सुख?

समुद्रकिनार्‍यावर आल्यापासून ती हरखून गेली होती. वार्‍याने उडणारे केस, दुपट्टा, भिजू नये म्हणून दुमडून घेतलेला चुडीदार सावरत, येणार्‍या प्रत्येक लाटेशी खेळत होती. परतीच्या पाण्यात पायाखालची वाळू सरकू लागली की हेलपाटत होती. माझा हात घट्ट पकडत होती. ‘आता पडणारच वाटतं मी’- म्हणत हसत होती. मला तिच्या या हरखण्याची खूप गंमत वाटली. थोड्यावेळानं मी तिला तिच्या मनाविरुद्ध ओढतच किनार्‍यावर आणलं. म्हटलं, ‘‘चल, बसू थोडावेळ वाळूत. गप्पा मारू…’’
वाळूत धप्‌दिशी बसत ती म्हणाली, ‘‘किती जवळ आहे हा किनारा तुझ्या घरापासून, तू नेहमी येत असशील ना इथे?’’
मी म्हटलं, ‘‘जवळ आहे हे खरं, परंतु तुझ्यासारखे कुणी पाहुणे आले तरच येते.’’
‘‘काय सांगतेस?’’ ती ओरडलीच जवळ-जवळ.
‘‘हो गं, नाही जमत. दिवस उजाडतो कधी नि मावळतो कधी तेच कळत नाही बघ,’’ मी बोलले.

मला माझ्या कामांचा, व्यापांचा, वेळ न मिळण्याचा, थकव्याचा पाढा वाचायचा नव्हता. परंतु मी अगदीच ‘अरसिक’ आहे, असा गैरसमजही होऊ द्यायचा नव्हता. परंतु तिला माझ्या अशा कधीतरी समुद्रावर येण्याचं नवल वाटतंय, माझी कींव येतेय हे लक्षात आल्यावर मी नादच सोडला.

एखादी गोष्ट सहज उपलब्ध असली, खूप परिचयाची अथवा आपल्या आवाक्यातली झाली की हळूहळू आपलं तिच्यातलं स्वारस्य संपतं असं काहीतरी तिला म्हणावंसं वाटलं. परंतु मग हेही तेवढं खरं नाही असं वाटून गेलं. कारण फार पूर्वी आमच्या घरामागच्या डोंगरावर संध्याकाळी नियमित फिरायला जायचे. तिथं एका ठराविक कातळावर, झुळझुळता वारा अंगावर घेत बसून राहायचे, हे आठवलं. समोर दिसणार्‍या डोंगराच्या रांगा, त्यांवर उमटलेली- नभ वितळून खाली आल्याचा भास निर्माण करणारी निळसर झाक पांघरून ध्यानस्थ, गूढ वाटणारा तो परिसर बघत बसायचे. हे रोजचंच चित्र पाहायला अतीव ओढीने जायचे. थोडीशी उघडीप मिळाली तर पावसाळ्यातसुद्धा…. कधी-कधी भिजायचेसुद्धा.
निसर्गरम्य भवताल, तिथली रम्य शांतता… हवंहवंसं वाटणारं एकटेपण… या सार्‍याची मोहिनी होती मनावर. कदाचित मन अधिक तरुण, मोकळं, अननुभवी, निरागस होतं. मोठं होता-होता किती गोष्टी साठत गेल्या, किती अनुभवांच्या आठवणी बनल्या, भरून गेलं मन… ओझ्याखाली दबून गेलं. आपल्याला काय आवडतं, काय हवं आहे हेही कळेनासं झालं. हाकेच्या अंतरावर असणार्‍या लोभस गोष्टी आणि माणसांसाठीसुद्धा वेळ आणि उत्कट ओढ शिल्लकच राहिली नाही. हे सगळंच हिला सांगू का? कळेल का तिला? मला प्रश्‍न पडला.
माणसांचे प्राधान्यक्रम बदलत जातात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ‘प्रायोरिटी’च्या नावाखाली आपण नकळत एक तरंगतं आयुष्य स्वीकारतो आणि मूळ मातीपासून तुटत जातो. मनभर शुष्कता पसरून राहते. हे आपल्या लक्षात आलं की भयावह वाटतं. एरव्ही लक्षातही येत नाही.

इतकं जवळ असूनही समुद्रकिनारी न येण्यामागे माझीही काही कारणं, नाईलाज आहे. परंतु स्वतः आधीच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचलेली माणसं दुसर्‍याचं काही ऐकण्याच्या मनःस्थितीतच नसतात.
समुद्र तर मलाही आवडतो. त्याची अथांगता, त्याची खोली, त्याचा निळसर रुपेरी रंग… त्याच्या लाटा, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात त्याला चढणारा उन्हाचा वर्ख… चांदण्यातलं त्याचं अनोखं रूप… कोणाला नाही आवडणार? किनार्‍यावरच्या अफाट गर्दीतसुद्धा तो आपला एकट्याचा असतो. आपण त्याच्याशी बोलू शकतो मनातलं. त्याला सगळं समजतं. तो आपली समजूत घालतोय असा विश्‍वास वाटतो आपल्याला त्याच्याबद्दल.

पाण्याची वळकटी बांधत, लांबून येणारी लाट किती आश्‍वासक वाटते! तिचा आवेग, तिच्या माथ्यावरचं शुभ्र हसू…. तिच्यात सामावलेला प्रचंड आत्मविश्‍वास…. जिद्द…. किती गुणवैशिष्ट्यं दडलीत या जलसाठ्यात!
सागराची अथांगता, त्याचे गांभीर्य, त्याची मर्यादा, त्याच्या आत दडून असलेली जीववैविध्यता- यातलं एक-एक वैशिष्ट्य आयुष्यभरासाठी अभ्यासाचा विषय बनू शकते. शिवाय झटकताच दूर होणार्‍या वाळूची अलिप्त, निर्मम वृृत्ती हा तर अलौकिक गुण जन्मभर साधना केली तरी अंगिकारता येईल की नाही, हाच प्रश्‍न आहे.
ती वाळूचा छोटासा डोंगर रचण्यात गुंग झाली होती. समुद्राकडे पाहून तिला नक्की काय वाटत असेल? का तो नसलेल्या प्रदेशातून आल्यामुळे हे एक वेडं आकर्षण?
मी तरी कुठं एवढा विचार करायचे? शाळेच्या सहलीच्या निमित्ताने गोव्यातील विविध समुद्रकिनार्‍यांवर फिरणं झालं… मनःपटलावर अनेक चित्रं आहेत… फेसाळत्या लाटांची, ओल्या वाळूची, पाण्यात भिजल्याची, भिजवल्याची, वाळूचे किल्ले बांधल्याची… परंतु झपाटल्यासारखं शंख-शिंपले गोळा केल्याची, एखाद्या ऐवजासारखे ते जपून ठेवल्याची आठवण फार गोड वाटते. पुढे त्यातले काही हॉस्टेलवर दिल्लीहून आलेल्या मुलींना भेट म्हणून दिल्यामुळे त्यांना किती आनंद झाला होता ते आठवलं की अजूनच छान वाटतं.

वाळूवर रेघोट्या ओढता-ओढता तिनं माझ्याकडं प्रश्‍नार्थक नजरेनं पाहिलं. मी हसून म्हटलं, ‘‘काही नाही गं, बालपणातल्या गोष्टी आठवल्या!’’
एव्हाना सूर्याचा लालभडक गोळा समुद्ररेषेशी पोचून कुठल्याही क्षणी ‘डुबूक’ होण्याच्या बेतात होता. ती काहीशा हळव्या स्वरात बोलली, ‘‘हो गं, अशा ठिकाणी अन् अशा कातरवेळी जुनं-जुनं खूप काही आठवून जातं.’’ तिच्या डोळ्यांत व्याकुळता भरून आली होती. तिला काहीतरी सांगायचं होतं का मला? मनाच्या सांदीकोपर्‍यात दडलेलं, कदाचित सलणारं…. किंवा एखादं दुखरं सुख?
समुद्राच्या दिशेनं दूर कुठेतरी पाहत, स्वतःतच हरवून गेलेल्या तिला पाहताना माझ्या मनात ‘जिथे सागरा…’ या गाण्याची धून वाजत होती. तिनं काही सांगावं अशी माझी मुळीच अपेक्षा नव्हती. तिच्या समोरच्या अन् तिच्या मनातल्या समुद्राचा एकमेकाशी संवाद सुरू आहे हे मी ओळखलं होतं… मनःपूर्वक बोलून घेऊ दे म्हणत मी सूर्यास्तानंतरच्या रंगाची उधळण बघत बसून राहिले मूकपणे!