जास्त परताव्याच्या आमिषाने 1 कोटी रुपयांची फसवणूक

0
6

वाळपईतील व्यक्तीच्या तक्रारीनंतर बंगळुरुतील एकास अटक

स्टॉक्स गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने वाळपईतील एकाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने बंगळुरू येथील कुमार उत्लासर (50 वर्षे) याला अटक केली आहे.

वाळपई येथील एका व्यक्तीला स्टॉक्स गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1.03 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत 22 ऑक्टोबर 2024 रोजी सायबर गुन्हा विभागाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सॲप नंबर वापरून वाळपई येथील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. तक्रारदाराला ए-33 उच्च-गुणवत्तेचे स्टॉक्स एक्सचेंज ग्रुप नावाच्या गटात जोडण्यात आले आणि एका ॲपद्वारे अपर सर्किट (यूसी) आणि प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. भरीव परतावा देण्याच्या नावाखाली संशयितांनी तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये 1,03,28,000 रुपये जमा करण्यास प्रवृत्त केले.

सायबर गुन्हा विभागाने याबाबत तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषण केल्यानंतर संशयित बंगळुरू भागात असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने बंगळुरू येथे जाऊन कुमार उत्लासर याला 6 नोव्हेंबरला अटक केली.

पोलिसांनी अटक आरोपीचे बँक खाते भारतातील 9 वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेल्या सायबर फसवणुकीशी जोडलेले असून, खात्यामध्ये 2.3 कोटी रुपये विविध फसवणुकीच्या माध्यमातून जमा झाले आहेत, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.

संशयित आरोपी कुमार उत्लासर हा मेसर्स ऑरिंको डायनस्टेन आस्थापनाचा मालक आहे.

संशयिताने फसवणूक प्रकरणातील रक्कम थेट आपल्या आस्थापनाच्या बँक खात्यात जमा केली होते आणि नंतर काही रक्कम इतर खात्यांमध्ये वळवली.

शिवाय, संशयिताने 6 लाख रुपये त्याच्या वैयक्तिक खात्यात जमा केले आणि त्याचा वापर वैयक्तिक खर्चासाठी केला, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.