गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान राज्यात पर्यटकांच्या संख्येत 6.23 टक्के एवढी वाढ झाल्याचे काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यंदा वरील काळात राज्यात 72.96 लाख एवढे देशी पर्यटक आले. 2024 साली जानेवारी ते सप्टेंबर या काळात राज्यात 69.24 लाख एवढे देशी पर्यटक आले होते. ही वाढ 5.36 टक्के एवढी असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले. याच काळात यंदा गोव्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही 3.36 लाख एवढी आहे. गेल्या वर्षी याच काळात गोव्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही 2.59 लाख एवढी होती. वरील काळात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही 2.33 टक्के एवढी जास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा एका ऑक्टोबर महिन्यातच राज्यात 34 चार्टर विमाने आली. यंदा ‘मॅन्चेस्टर’ व ‘गॅटविक’ येथून टीयूआय ही कंपनी थेट चार्टर विमाने सुरू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकल देशांतर्गत उत्पादनात पर्यटन उद्योगाचा हिस्सा हा 16.43 टक्के एवढा आहे आणि हा उद्योग प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राज्यातील 43 टक्के लोकांना रोजगार प्राप्त करून देत असल्याचे खंवटे म्हणाले.
केंद्राकडून मिळाले 472 कोटी
केंद्र सरकारकडून गोव्याला विविध प्रकल्पांसाठी एकूण 472 कोटी रुपये एवढा निधी मिळाला असल्याची माहिती खंवटे यांनी यावेळी दिली.
ॲपआधारित टॅक्सीची गरज
टॅक्सी व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा यासाठी राज्यात ॲपआधारित टॅक्सी व्यवसायाची गरज असल्याचे सांगून काही ठराविक टॅक्सीचालक त्याला विरोध करीत असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. अशा लोकांना वेगळ्या प्रकारे शिकवावे लागणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. तसेच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलचा श्रेणी दर्जा आपल्या इच्छेनुसार हवा तसा बदलू नये, असे मतही खंवटे यांनी व्यक्त केले.
ओशनमॅन स्पर्धेला ‘आएपीएस’ जबाबदार
हल्लीच करंजाळे येथे होऊ घातलेल्या ओशनमेन या स्पर्धेचा जो फज्जा उडाला त्याला राज्यातील आयपीएस अधिकारी जबाबदार असल्याचे रोहन खंवटे म्हणाले. कोणतीही परवानगी न घेता ही स्पर्धा तेथे आयोजित केली होती, असे सांगून या आयपीएस अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती व स्थानिक लोकांच्या भावना जाणून घेण्याची गरज असल्याचे खेवटे म्हणाले.

