जातिनिर्मूलन आणि बाबासाहेब

0
551

– विष्णू सुर्या वाघ

 

 

संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश असा आहे की जिथल्या समाजव्यवस्थेला जातिप्रथेच्या अजगराचा जबरदस्त विळखा गेल्या हजारो वर्षांपासून पडलेला आहे. अनंत संत-महंतांनी, विचारवंतांनी व समाजसुधारकांनी भगीरथ प्रयत्न करूनदेखील त्यांना या अजगराचा विळखा सैल करता आलेला नाही. आधुनिक जगात ज्ञानाची साधने वाढली, विचारांचे आदानप्रदान अधिक मुक्तपणे होऊ लागले तरीही जातिव्यवस्थेचा डोलारा भारतात अद्यापही कमकुवत झालेला नाही. उलट सरकारी नोकरीतील आरक्षण व त्या अनुषंगाने दिल्या जाणार्‍या सोयी-सवलती यांच्यामुळे जातीपातींची वीण अधिक घट्ट होत चालल्याचे जाणवते.
माणसा-माणसांत भेदभाव करणार्‍या जातीयतेचा अंत झाला पाहिजे ही बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्यासाठी त्यानी सक्रिय चळवळ चालवली. लेखणीद्वारे प्रबोधनाची बीजे पेरली आणि जातिमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात यावे म्हणून आपले आयुष्य खर्ची घातले. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे शतकोत्तर रजतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना बाबासाहेबांनी बघितलेल्या या स्वप्नाची आज संपूर्ण देशातच पूर्ण अवदशा झालेली आपण पाहतो आहोत.
भारतातील जातिव्यवस्था हा एक आंबेडकरांच्या मनाला सतत डसणारा विषय होता. जातिव्यवस्थेचे निर्मूलन करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात, वक्तृत्वात आणि त्यांनी राबवलेल्या कार्यक्रमात सारा भर हा जातिनिर्मूलनावरच देण्यात आला होता. त्यांच्या संशोधनपर लिखाणाचा प्रारंभच जातिव्यवस्थेवरील निबंधातून झाला आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पी.एचडी. पदवीसाठी संशोधन करीत असताना १९१६ सालच्या मे महिन्यात बाबासाहेबांनी मानववंशशास्त्रावरील एका चर्चासत्रासाठी ‘भारतातील जातिसंस्था ः उद्गम, घडण आणि कार्य’ या मथळ्याचा एक निबंध लिहिला. भारतीय जातिसंस्थेचा उदय कसा झाला ते शोधून काढण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी या लेखात केला आहे.
मानववंशशास्त्रज्ञांच्या मते आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शक अशा अनेक जमाती आदिवासी अवस्थेत जीवन कंठीत असताना प्राचीन काळी भारतात येऊन पोहोचल्या. येथील मूळच्या लोकांशी त्यांचा संघर्ष व संकर झाला आणि त्यांच्या संस्कृतींच्या मिश्रणातून एक नवी मिश्र संस्कृती उदयाला आली. ज्या निरनिराळ्या वंशांचे लोक येथे आले त्यांचे पूर्ण मिश्रण झाले असे म्हणता येणार नाही. उत्तर व दक्षिण भारतातील किंवा पूर्व व पश्‍चिम भारतातील माणसांचा चेहरा, आकार, रंग, भाषा इत्यादी बाबतीत भिन्नता आढळून येते खरी, तरीही भारतातील सर्व लोक बव्हंशी एकाच संस्कृतीच्या धाग्याने जोडलेले आढळतात. भारतातील लोकांत दिसून येणारे सांस्कृतिक साधर्म्य जगातील इतर कोणत्याही मोठ्या भूप्रदेशात दिसून येत नाही. पण प्रश्‍न असा येतो की, भारतासारखा देश सांस्कृतिकदृष्ट्या एक असतानाही येथे जातिप्रथा अस्तित्वात कशी आली?
जातिव्यवस्था मनूने निर्माण केली असे म्हटले जाते. पण ते खरे नाही. मनूला तसे करणे शक्य नव्हते. मनूच्या पूर्वी कित्येक वर्षे जातिव्यवस्था अस्तित्वात होती. मनूने तिला स्मृतीच्या रूपाने तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.
समाज हा माणसांचा बनलेला असतो असे आपण मानतो. भारतासारख्या देशात समाज हा प्रामुख्याने माणसांचा नव्हे तर वर्गांचा बनलेला आहे. हे वर्ग आर्थिक, सामाजिक किंवा बौद्धिक पायावर आधारलेले असतात. वर्ग बंदिस्त झाला की त्याची जात बनते.
भारतीय समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा मिळून बनला आहे. हे वर्ण प्राचीन काळी बंदिस्त नव्हते. एका वर्गातील माणसाला दुसर्‍या वर्गात प्रवेश घेण्याची मुभा होती. इतिहासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर ब्राह्मणांनी इतरांना आपल्या जातीत प्रवेश नाकारून स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करून घेतले. समाजातील श्रमविभागणी जशी वाढत चालली तसे वैश्य व शूद्र या वर्णातही अनेक छोटेमोठे गट पडत गेले. क्षत्रियांमध्येही अधिकारी व सैनिक यांच्यातली दरी वाढत गेली. प्रत्येक समूहाचा एक वेगळा गट बनला. या गटांचे दरवाजे इतरांसाठी बंद झाल्यावर प्रत्येक गटाची वेगळी जात बनली. काहींनी आपली प्रवेशद्वारे स्वतःच बंद केली तर काहीजणांसाठी इतरांचे दरवाजे बंदच झाले. ब्राह्मण हा समाजातील सर्वात प्रतिष्ठित वर्ग होता. तेव्हा इतरांनी त्याचे अनुकरण करणे स्वाभाविक होते. बेटीव्यवहारावर प्रथम ब्राह्मणांनी बंदी आणली. सती, बालविवाह इत्यादी चालीही ब्राह्मणांना जवळ असलेल्या जातींनी सोयिस्करपणे उचलल्या. काहींनी आपल्यातील प्रवेशावर बंदी घातल्यानंतर इतर जाती आपोआपच बंदिस्त झाल्या.
जातींच्या या बंदिस्तपणातून प्रत्येक जातीत अनेक उपजाती निर्माण झाल्या. या जाती तशा परंपरेने रूढ धर्माशीच बांधल्या गेल्या होत्या. रूढ धर्म, नीती किंवा चालीरीती यांच्या विरोधातील मत किंवा वर्तणूक या जातसमूहाला पसंत नसायची. मग तशी वर्तणूक एखाद्याने केलीच तर त्याला जातीमधून बहिष्कृत करायची पद्धत रूढ झाली. अशा लोकांना दुसर्‍या जातीत प्रवेश नसल्याने बहिष्कृत केलेल्यांची एक स्वतंत्र जात झाली. काही वेळा प्रचलित प्रथा-परंपरांपासून फारकत घेऊन नवे मत मांडणारे गुरू-पीठाधीश तयार झाले व त्यांच्या अनुयायांचीच एक वेगळी जात बनली.
प्राचीन भारतीय समाजात प्रथम वर्ण होते. पुढे त्यांच्यामधून जातींची उत्पत्ती झाली. या जातिभेदाचा वणभेदाशी फारसा संबंध नाही. ब्राह्मणांनी प्रथम इतर वर्णांना बाहेर ठेवून आपली जात बंदिस्त बनवली. इतरांनी त्यांचे अनुकरण केले. वैश्य व शुद्र वर्णांत श्रमविभागणीवरून जाती पडल्या आणि कालांतराने नागर संस्कृतीशी संबंध आलेल्या आदिवासी जमाती जातीच्या रूपात समाजव्यवस्थेत सामील झाल्या.
जातिप्रथा आणि वर्णव्यवस्था यामुळे हिंदू धर्माला जी अवकळा आली आणि तिचे पर्यवसान अखेर स्पृश्य-अस्पृश्य विभागणीमध्ये झाले आणि सामाजिक समतेच्या तत्त्वालाच सुरुंग लागला. जातिव्यवस्थेची उतरंड कशी निर्माण झाली याचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे सखोल अध्ययन व संशोधन केले. या विषयावर ‘शूद्र कोण होते?’, ‘अस्पृश्य कोण होते?’ आणि ‘प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती’ अशी तीन पुस्तके त्यांनी लिहिली. शिवाय जातीविरोधी चळवळीचा भाग म्हणून शेकडो ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. भारतातील नव्वद टक्के लोक ज्यांत गणले जातात ते वर्ण कसे निर्माण झाले हे जाणून घेण्याची त्यांना उत्कंठा होती. हिंदू धर्मग्रंथ हे ईश्‍वरनिर्मित व शाश्‍वत असल्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करणे हाच धर्म होय अशी बहुसंख्य लोकांची श्रद्धा होती. या धर्मग्रंथातील वचनांची शास्त्रशुद्ध पद्धतीने चिकित्सा करून हिंदू समाजाच्या अधोगतीस ते कसे कारणीभूत झाले आहेत ते लोकांना दाखवून देणे हा एक दुसरा हेतू या साहित्याच्या निर्मितीमागे होता. केवळ सत्यशोधनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून, पुराव्यांची छाननी करण्याचे जे नियम सामाजिक विज्ञानाने मान्य केले आहेत, त्यांना अनुसरूनच या ग्रंथांची चिकित्सा करणे योग्य होईल अशी बाबासाहेबांची भूमिका होती.
‘शूद्र कोण होते?’ या ग्रंथातून बाबासाहेबांनी शूद्रांची उपपत्ती कशी झाली याविषयीचा आपला सिद्धांत मांडला आहे. त्यासाठी त्याना सर्वात पहिला आघात करावा लागला तो ऋग्वेदामध्ये अंतर्भूत असलेल्या पुरुषसूक्तावर. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामधले हे पुरुषसूक्त चार वर्णांची निर्मिती कशी झाली ते सांगते. या सूत्रानुसार प्रजापतीच्या मुखापासून ब्राह्मण झाले. बाहूपासून क्षत्रिय तर मांड्यांपासून वैश्यांची उत्पत्ती झाली. शूद्र मात्र पायांपासून जन्मले. इथेच चारही वर्णांची सामाजिक श्रेष्ठता व उच्च-नीच्चता अधोरेखित झाली. चारही वर्णांच्या सामाजिक दर्जावर खुद्द प्रजापतीनेच शिक्कामोर्तब केले या समजुतीला पुरुषसूक्त पुष्टी देते. पुढे आपस्तंब व वसिष्ठ या धर्मसूत्रांनी पुरुषसूक्ताचीच री ओढली. मनूने तर वेद हे अपौरुषेय असून हिंदू धर्माचे प्रमाणग्रंथ असल्याचा दावा केला. त्यामुळे प्रत्यक्षात मानवनिर्मित असलेली चातुर्वण्यव्यवस्था ही ‘ईश्‍वरप्रणित, सनातन व अपरिवर्तनीय’ आहे असे मानले जाऊ लागले. या व्यवस्थेला मनूच्या दुजोर्‍यामुळे पूर्वी कधीही नसलेले धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.
ऋग्वेदात अन्यत्रही भारतीय आर्यांचा उदय कसा झाला त्याविषयीच्या कथा आहेत. काही ठिकाणी मनू हा आर्यांचा आदिपुरुष मानलेला आहे. ऐतरेय ब्राह्मण, विष्णुपुराण, मत्स्यपुराण यातही मनूला प्रथम आर्य मानले आहे. ऋग्वेदात आणखी एके ठिकाणी आर्य समाज हा यदु, तुर्वसु; द्रह्यु, अनु आणि पुरु या पाच जमातींचा मिळून बनला असे म्हटले आहे. पुरुषसूक्तांत मात्र मनूला आद्यपुरुष मानलेले नाही. प्रजापतीच्या मुखातून कोण आला? तर ब्राह्मण! म्हणजे मानव नव्हे, वर्ण! बाहूपासून कोण निपजला? तर क्षत्रिय! म्हणजे थेट दुसरा वर्ण! वैश्य आला मांड्यांतून आणि शूद्र मात्र पायांतून! म्हणजे ज्या कुणी पुरुषसूक्त रचले त्याने सर्व व्यावसायिकांची कायमच्या व अपरिवर्तनीय अशा गटांत विभागणी केली. जी समाजव्यवस्था त्या काळी प्रचलित होती तीच आदर्श आहे असे त्याने ठरवून टाकले व जे आदर्श आहे तेच आपण प्रत्यक्षात आणीत आहोत असा आभास निर्माण केला. एका वर्गाला अनैतिक व असमर्थनीय असे अधिकार बहाल करून त्याने इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरवले आणि सर्वात खालच्या (शूद्र) समूहाला तिन्ही वर्णांची सेवा करण्यासाठी जन्माला आलेला ‘सेवेकरी’ ठरवले.
वास्तविक पाहता ऋग्वेदात इतरत्र कुठेही शूद्र वर्णाचा उल्लेख नाही. तैतिरीय ब्राह्मण व शतपथ ब्राह्मणांमध्येही आर्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य असे तीनच वर्ण असल्याचे गृहित धरले आहे. यावरून ‘पुरुषसूक्त’ हे मूळ ऋग्वेदात नव्हते, मागाहून कुणीतरी त्यात ते घुसडले असावे असे विवेचन बाबासाहेबांनी केले आहे.
आर्यांचे मूळ स्थान कोणते याबद्दल संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील प्रदेश, पश्‍चिम व मध्य जर्मनी ही आर्यांची वसतीस्थाने असावीत व तिथून ते पश्‍चिमेस युरोप व पूर्वेस आशिया खंडात भारतापर्यंत पसरलेले असावेत असे मत काही पाश्‍चात्त्य संशोधकांनी मांडले आहे. लोकमान्य टिळकांनी उत्तर ध्रुवाच्या भोवतालचा आर्क्टिक प्रदेश हेच आर्यांचे मूळ वसतीस्थान होते असा सिद्धांत मांडला आहे.
या आर्यांनीच प्राचीन काळी भारतावर स्वारी केली. येथील मूळचे रहिवासी दास आणि दस्यू याना युद्धात जिंकून त्यानी त्यांच्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आर्य हे गौरवर्णीय, उंच सडसडीत व देखणे होते. उलट अनार्य काळे व बुटके होते. आर्यांना त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटला. या जिंकलेल्या लोकांना ते ‘शूद्र’ म्हणू लागले. आर्यांपासून त्यांना दूर राखण्यासाठी अनेक निर्बंध त्यांच्यावर लादण्यात आले, अशी भूमिका या पाश्‍चात्त्य विद्वानांनी मांडली आहे.
महात्मा फुले यांनीदेखील वंशभेदाचा हा सिद्धांत स्वीकारला आहे. मात्र त्यांचे निष्कर्ष वेगळे आहेत. फुल्यांच्या मते दास/दस्यू हे भारतातील मूळचे क्षेत्रपती होते. त्यांच्या राज्यात सुबत्ता व संपन्नता होती. राजा बळी हा त्यातलाच एक. या क्षेत्रपतींचे राज्य आर्यांनी कपटाने जिंकून घेतले व मूळ रहिवाशांवर गुलामगिरी लादून अनेक निर्बंध त्यांच्यावर घातले.

(क्रमशः)