जागा अन्‌‍ एनओसीशिवाय सनबर्नला परवानगी नाहीच

0
3

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याकडून स्पष्ट; आयोजकांकडून अद्याप नवा प्रस्ताव नाही

सनबर्न संगीत महोत्सव आयोजकांना कार्यक्रम आयोजित करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही आणि त्यासाठी आवश्यक ना हरकत दाखले (एनओसी) मिळत नाही, तोपर्यंत पर्यटन खाते सनबर्नसाठी कोणतीही परवानगी देणार नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले.
सनबर्नला संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. दक्षिण गोव्यात सनबर्न संगीत महोत्सवासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याला जोरदार विरोध करण्यात आल्याने सनबर्न संगीत महोत्सवासाठी उत्तर गोव्यात जागेचा शोध सुरू झाला आहे. थिवी मतदारसंघात सनबर्न आयोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजकांनी पाच महिन्यांपूर्वी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु त्यांना जागेसाठी ना हरकत दाखला मिळाला नव्हता, असे खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन खात्याकडे आता नवीन प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. सनबर्न आयोजकांनी स्थळ शोधून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे मिळाली, तरच महोत्सवाला मान्यता दिली जाईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

‘क्लीन’ सनबर्नला पाठिंबा : लोबो
‘क्लीन’ सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी आपला पाठिंबा आहे. सर्व नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल सांगितले.
लोकांच्या इच्छेविरुद्ध दक्षिण गोव्यात हा महोत्सव आयोजित केला गेला, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे लोबो यांनी सांगितले.