जवानाने गोळ्या झाडून ५ सहकार्‍यांना केले ठार

0
127

>> छत्तीसगडमधील आयटीबीपी छावणीतील घटना

>> स्वतःलाही संपवले

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या एका जवानाने काल बेछूट गोळीबार करीत आपल्या ५ सहकार्‍यांना ठार केले व स्वतःलाही संपवले. त्याच्या गोळीबारात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत.
रायपूर येथून ३५० कि. मी. अंतरावरील कडेनार या खेड्यातील आयटीबीपीच्या एका छावणीत सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी ही माहिती दिली.

हे कृत्य करणार्‍या कॉंस्टेबलचे नाव मसुदूल रहमान असे असल्याचे सांगण्यात आले. सदर छावणीत अन्य सहकार्‍यांशी झालेल्या वादानंतर त्याने स्वतःजवळील पिस्तुल काढून सहकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. त्यात चौघेजण जागीच ठार झाले. तर एक जवान नंतर मरण पावला असे सुंदरराज यांनी सांगितले.

दरम्यान आयटीबीपीचे प्रवक्ते विवेककुमार पांडे यांनी नवी दिल्ली येथून या वृत्ताला दुजोरा दिला. पांडे यांनी सांगितले की, रहमान याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. सहकार्‍यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या नाही, असे पांडे यांनी स्पष्ट केले. दोन जखमी जवानांना विमानाने रायपूर येथील खाजगी इस्पितळात नेण्यात आले अस पांडे यांनी सांगितले.

या हल्ल्यात ठार झालेल्यांची नावे महेंद्र सिंग, दलजित सिंग (हेड कॉंस्टेबल), सूरजीत सरकार, विश्‍वरुप महातो व बिजिश (कॉंस्टेबल) अशी आहेत. तर जखमी जवानांची नावे कॉंस्टेबल एस. बी. उल्हास व सीताराम डून अशी आहेत. ते सर्वजण आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनमधील आहेत.