जम्मू-काश्मीरात ९०० जण ताब्यात

0
38

>> हत्यासत्राच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई

>> एनआयएचे १६ ठिकाणी छापे

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हत्यासत्राच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. काल श्रीनगरमधून सुमारे ७० तरुणांना ताब्यात घेतले आहे. काश्मीरमधून सुमारे ५७० आणि जम्मू काश्मीरमधून सुमारे ९०० दिवसांत ताब्यात घेतले आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील १६ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

काश्मीर खोर्‍यात एका आठवड्यात सात नागरिकांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या सात दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांचा बळी घेतल्याने काश्मीरमध्ये दहशतीचे सावट गडद झाले आहे.

याच पार्श्वभूमिवर सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांना आणि इतर अनेक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांविरोधातील कारवायांबद्दल समन्वय साधण्यासाठी केंद्राने गुप्तचर विभागाच्या एका उच्च अधिकार्‍याला श्रीनगरला पाठवले आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादाशी संबंधित कारवायांविरोधात कारवाई करत जम्मू-काश्मीरमधील १६ ठिकाणी आतापर्यंत छापे टाकले आहेत.

गेल्या पाच दिवसांत मृत्यू झालेल्या सहा नागरिकांपैकी श्रीनगर येथील चारजण अल्पसंख्य समाजातील होते. तर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात सुपिंदर कौर आणि दीपक चांद या दोन शिक्षकांचा मृत्यू झाला.

हे दोघेही श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत होते. शाळेत कुणीही विद्यार्थी नव्हते. मात्र, हे शिक्षक ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या बेतात असतानाच सकाळी दहशतवाद्यांनी या दोघांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याशिवाय काश्मीरी पंडित व श्रीनगरच्या प्रसिद्ध औषधालयाचे मालक माखनलाल बिंदू यांची मंगळवारी त्यांच्या दुकानात जाऊन दहशतवाद्यांनी हत्या केली. यामुळे खोर्‍यात भीतीदायक वातावरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जीवाची भीती असल्याने काश्मीरमधील अनेक नागरिक आणि अधिकारी जम्मूसह सुरक्षित ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

१६ ठिकाणी छापे
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल रविवारी १६ ठिकाणी छापे टाकले. दहशतवादविरोधी एजन्सीने केंद्रीय राखीव पोलीस दल व जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने विविध जिल्ह्यांत एकाचवेळी शोध घेतला. तसेच एनआयएने कर्नाटकातील भटकळ येथेही दोन ठिकाणांवर छापे टाकले. याप्रकरणी एनआयएने भारतात आयएसआयएसच्या विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांनी ऑनलाइन नेटवर्क तयार केले आहे. ज्यात सदस्यांची भरती केली जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी ११ जुलै रोजीही एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये तीन आरोपींना अटक केली होती.

दिल्लीत हाय अलर्ट
राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवर लक्ष ठेवले जात आहे. भाडेकरूंच्या पडताळणीवरही भर दिला जात आहे. नवरात्रोत्सवाने सणासुदीला सुरवात झाली आहे. यावेळी स्थानिक बाजारपेठ आणि मंदिरांमध्ये गर्दी कमी आहे. सणांमुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.