जम्मू काश्मीरातील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
196

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच बडगामध्ये झालेल्या चकमकीत जम्मू काश्मीरचे एसपीओ शहीद झाले. शोपियानमध्ये काल सकाळी दहशतवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली. या परिसरात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यावरून शोधमोहीम सुरू करण्यात आली यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हे लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.

दरम्यान, बडगाम जिल्ह्यामध्येही दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू असून यात जम्मू काश्मीरचे पोलीस एसपीओ शहीद झाले. तसेच एक जवान जखमी झाला असून या परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे.

जवानांवर दहशतवादी हल्ला
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बारजुल्ला भागात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशवताद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळाच्या आसपासचा परिसर जवानांनी सील केला असून, शोधमोहीम सुरू केली.