जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले

0
3

जवळपास सहा वर्षांनंतर स्थापन झालेल्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेत काल कलम 370 च्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली. कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी अपक्ष आमदार शेख खुर्शीद यांनी केली. हातात फलक घेऊन ते विधानसभेत आल्याने गदारोळ झाला. या फलकाला भाजप आमदारांनी आक्षेप घेतला. सभापतींसमोरील मोकळ्या जागेत शेख खुर्शीद आणि भाजपचे आमदार समोरासमोर आले, त्यावेळी एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रकारही घडला. मार्शल्सनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र तो असफल ठरला.

खासदार इंजिनिअर रशिद यांचे बंधू अपक्ष आमदार खुर्शीद शेख कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी फलक घेऊन सभापतींसमोरील मोकळ्या जागेत आले. खुर्शीद यांच्याकडून फलक काढून घेण्याच्या प्रयत्नात भाजप आमदारही तेथे आल्याने बाचाबाची झाली. सज्जाद लोन, वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या काही सदस्यांनीही खुर्शीद यांना समर्थन दिले. त्यामुळे भाजपचे आमदार इतर आमदारांबरोबर भिडले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांच्या निर्देशनानुसार तीन आमदारांना बाहेर काढण्यात आले. विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या ठरावावरून विधानसभेत बुधवारी देखील जोरदार खडाजंगी झाली होती.