जम्मूमध्ये भाजप एकट्याने निवडणूक लढवणार

0
9

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात काल रविवारी 18 ऑगस्ट रोजी भाजपने जम्मूमध्ये बैठक घेतली. केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी किशन रेड्डी, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते. जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यानी, जम्मूमध्ये पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काश्मीरमध्ये अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतो. कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजप उमेदवारांची पहिली यादी 21 ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात करू शकतो. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह निवडणूक रॅली घेणार आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री चौधरी जुल्फकार अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी शनिवारी (17 ऑगस्ट) चौधरी जुल्फकार अली यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. 2015 ते 2018 पर्यंत ते मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार असून विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे.