जनसंघ आणि भाजपच्या संपूर्ण वाटचालीचा साक्षीदार

0
132

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

गौतम चिंतामणी लिखित ‘राजनीती’ हे राजनाथसिंग यांचे चरित्र तर आहेच, परंतु ते नुसते त्या व्यक्तीचे चरित्र नाही, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण वाटचालीचा हा इतिहास आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने तो या पुस्तकामध्ये मांडण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यातील दोन विधानांमुळे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. अण्वस्त्रांचा प्रथम वापर करायचा नाही ही भारताची आजची नीती आहे, परंतु भविष्यात काय करायचे हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल असे एक वाक्य ते बोलून गेले. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला चर्चा करायची असेल तर आता केवळ पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातच ती होईल असेही दुसर्‍या एका कार्यक्रमात ते उद्गारले. भारतीय संरक्षणमंत्र्यांच्या या दोन वाक्यांनी पाकिस्तान हादरून गेले आणि अवघ्या जगानेही कान टवकारले. कोण्या दुय्यम नेत्याच्या तोंडून ही वाक्ये आली असती तर एवढ्या गांभीर्याने घेतली गेली नसती, परंतु ज्या व्यक्तीच्या तोंडून ही वाक्ये आली तिचा आजवरचा इतिहास, वागण्या – बोलण्यातील तारतम्य, नीतिमान जगणे आणि ती व्यक्ती भूषवित असलेले पद या सार्‍या पार्श्वभूमीवर या दोन वाक्यांना अतोनात महत्त्व आले. आजवर कधी वाजपेयी – अडवाणी, तर कधी मोदी – शहा यांच्या छायेत वावरत आलेल्या आणि स्वतःकडे फारसे लक्ष वेधून न घेणार्‍या या नेत्याची खरी ताकद काय आहे हे यातून कळून आले.

राजनाथसिंग हे भाजपचे ज्येष्ठ नेते तर आहेतच, शिवाय पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष, दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे व नंतर लोकसभेचे खासदार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक व कृषीमंत्री, मोदींच्या पहिल्या पर्वात गृहमंत्री आणि दुसर्‍या पर्वात संरक्षणमंत्री अशी मोठमोठी पदे त्यांनी भूषविलेली आहेत. मात्र, उगाच चर्चेत राहण्याचा स्वभाव नसल्याने त्यांच्याविषयी भारतीय जनतेला फारच कमी माहिती आहे. हीच पोकळी भरून काढण्यासाठी गौतम चिंतामणी यांनी त्यांचे एक विस्तृत व अत्यंत अभ्यासपूर्ण इंग्रजी चरित्र लिहिले आहे, ज्याचे नाव आहे, ‘राजनीती.’

लवकरच प्रकाशित होणार असलेल्या या चरित्रातील एका महत्त्वाच्या प्रकरणाची एक एक्स्न्लुझिव्ह झलक सोमवारच्या अंकात आम्ही आपल्याला संपादकीय पानावर घडवली आहेच. या चरित्रातून उलगडणारे राजनाथसिंगांचे व्यक्तिमत्त्व आज मी आपल्यापुढे मांडणार आहे. गेली कैक दशके राजकारणामध्ये राहून जनसंघ आणि भाजपाचे उतार-चढाव जवळून पाहणार्‍या आणि त्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या राजनाथसिंगांची आणि त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीची ही लक्षवेधी कहाणी आहे.
२०१४ साली नरेंद्र मोदींचा भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये दमदार उदय झाला, तेव्हा त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेणारी पहिली व्यक्ती होती राजनाथसिंग. त्या निवडणुकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मोदींच्या विजयाचे तेही एक शिल्पकार होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व मित्रपक्षांमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाबाबत सहमती निर्माण करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनीच पार पाडली होती, समविचारी पक्षांना मोदींच्या पाठीशी उभे केले होते आणि मोदींच्या नावाला विरोध असणार्‍या मित्रपक्षांनाही कुशलतेने हाताळले होते.

एकेकाळी उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या कॉलेजमध्ये फिजिक्सचे लेक्चरर असलेले राजनाथसिंग सात भावंडांमधील शेंडेफळ. भाभौरा नावाच्या खेड्यात एका रजपुत ठाकूर कुटुंबामध्ये १० जुलै १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात पाय ठेवले ते त्याच वर्षी. नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडलेलेे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी एकत्र येऊन २३ मे १९५१ रोजी जनसंघाची जालंधरमध्ये स्थापना केली. पुढे जून ५१ मध्ये कलकत्त्यातील अधिवेशनात श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. रा. स्व. संघाने जनसंघाच्या कामात दैनंदिन ढवळाढवळ करायची नाही, परंतु आपला विचार त्या पक्षातून पुढे न्यायचा असे ठरले.
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन ही त्या काळातील एक सक्रिय विद्यार्थी संघटना. तिच्यात फूट पडली आणि एआयएसएफवर डाव्यांचा वरचष्मा राहिला, तर त्यातील कॉंग्रेसी विचारांच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंटस् कॉँग्रेस स्थापन केली होती. तेव्हा संघाचे अनेक स्वयंसेवक विद्यार्थी जीवनात या एआयएससीमधून वावरायचे. त्यामुळे आपलीही एक विद्यार्थी संघटना असावी असा विचार संघात पुढे आला आणि दिल्लीत संघविचारांचे हे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जन्म झाला. राजनाथसिंग संघ आणि अभाविपच्या कार्यात ओढले गेले.

राजनाथसिंगांच्या नेतृत्वगुणांची पहिली चमक दिसली ती ते विद्यार्थी असताना हॉस्टेलमधील निकृष्ट अन्नाच्या विरोधात त्यांनी केलेल्या आंदोलनातून. आपल्या मनोहर पर्रीकरांच्या बाबतीतही तेच झाले होते. राजनाथसिंगांनी ते आपले पहिले आंदोलन यशस्वी केले. मात्र, आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलाव्यात या विद्यार्थ्यांच्या मागणीशी त्यांचे नेते असूनही ते सहमत झाले नाहीत आणि ठरल्यावेळीच परीक्षा घेण्याचा आग्रह त्यांनी प्राचार्यांपाशी धरला. राजनाथसिंग यांच्या नीतिमान जीवनाचा अगदी सुरवातीच्या काळातील हा एक दाखला आहे.

त्यांची हीच तत्त्वनिष्ठा ‘राजनीती’ वाचताना पुढे अनेकवेळा दिसून येते. आणीबाणीत अटकेत असतानाच त्यांच्या आईला ब्रेन हॅमरेज झाल्याची वार्ता त्यांच्या कानी येते. सहकारी सल्ला देतात की माफीचा अर्ज देऊन तुरुंगातून सुटका करून घ्या, परंतु राजनाथ फर्लोचा अर्ज द्यायला स्पष्ट नकार देतात. त्यावरही वरताण करणारा एक प्रसंग पुढे आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात जनसंघ, भारतीय लोकदल, सोशलिस्ट पार्टी वगैरे पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन झाला, तेव्हा मिर्झापूरमध्ये जनसंघाने राजनाथसिंगांना उमेदवारी दिली. सिंग यांनी आपला प्रचारही धडाक्यात सुरू केला, परंतु ऐनवेळी त्यांच्याऐवजी फकीर अली अन्सारी यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे खवळलेल्या कार्यकर्त्यांनी राजनाथसिंगांना अपक्ष म्हणून उभे राहण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला, इतकेच नव्हे, तर आपली उमेदवारी मागे घ्यायला ते निवडणूक अधिकार्‍यांकडे गेले. मात्र, उशीर झाल्याने त्यांचा अर्ज मागे घेण्यास अधिकार्‍यांनी असमर्थता व्यक्त केली. तेव्हा राजनाथसिंगांनी आपल्या सर्व मतदारांना आग्रहाने आणि कसोशीने सांगितले की आपल्याला मत न देता पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मत द्यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा राजनाथ यांना एकही मत मिळालेले नव्हते. याचाच अर्थ त्यांनी स्वतः देखील स्वतःला मत दिलेले नव्हते! संपूर्ण आयुष्यभर ही नीतीमत्ता त्यांनी सांभाळली म्हणूनच त्यांना पक्षामध्ये एवढी मानाची पदे मिळत गेली आहेत.

मे १९८० साली भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. अटलबिहारी वाजपेयी त्याचे पहिले अध्यक्ष बनले. वाजपेयींनी जनसंघाव्यतिरिक्त मंडळींनाही त्यात सामावून घेतले होते. सरचिटणीसपदी तर सिकंदर बख्तसारख्या एका मुसलमान व्यक्तीला आणून सर्वसमावेशकतेचा आपला दृष्टिकोन वाजपेयींनी दाखवून दिला होता. डिसेंबर ८० मध्ये मुंबईत भाजपचे पहिले अधिवेशन झाले, तोवर पक्षाचे पंचवीस लाख सदस्य बनलेले होते. राजनाथसिंग यांच्याकडे पक्षाचे उत्तर प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली गेली. त्याच बरोबर उत्तर प्रदेश भाजयुमो अध्यक्षपदी त्यांच्याकडे दिले गेले. उत्तर प्रदेश हे आजही भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राज्य आहे. भाजपने रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतला तेव्हापासून पक्षाच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेशला महत्त्व आले. अशा या महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजप रुजवण्यात राजनाथसिंगांचेही मोठे योगदान राहिले. प्रमोद महाजनांनंतर भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजनाथसिंगांची निवड महाजनांनी केली. त्याच दिवशी उत्तर प्रदेश विधान परिषदेवर त्यांना घेण्यात आले. तेव्हा राजनाथ यांचे वय होते अवघे ३७.

९१ साली उत्तर प्रदेशात भाजपचे पहिलेवहिले सरकार कल्याणसिंगांच्या नेतृत्वाखाली आले, त्यात राजनाथसिंग शिक्षणमंत्री बनले. या कार्यकालातील एक घटना चरित्रकारांनी सांगितली आहे ती आजच्या राजकारण्यांनी शिकण्यासारखी आहे. परीक्षेत कॉपी करणे हा राजनाथसिंगांनी शिक्षणमंत्री या नात्याने दखलपात्र गुन्हा ठरवला व कॉपी करणार्‍यांच्या अटकेची कायद्यात तरतूद केली. परिणाम असा झाला की कॉपीला पायबंद बसला, परंतु उत्तर प्रदेश बोर्डाचा निकाल आधल्या वर्षीच्या ५७ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांवर घसरला. परीक्षेतील गैरगोष्टींना पायबंद बसल्याचा हा थेट परिणाम होता, परंतु राजनाथसिंग यांची राजकीय कारकीर्दच त्यामुळे धोक्यात आली, कारण राजकारण्यांना नेहमी ‘लोकप्रिय’ निर्णय घेण्याची सवय असते. खरे लोकहित कशात आहे हे पाहून निर्णय घेणे आपल्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नसेल तर त्या फंदात पडायचे नाही असेच आजकालचे राजकारणी ठरवत असतात, परंतु राजनाथसिंग त्याला अपवाद होते. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
९२ मध्ये सहा डिसेंबरला बाबरी पडली आणि केंद्र सरकारने कल्याणसिंगांचे ते सरकार बरखास्त केले. एक वर्ष उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट राहिली. मग लालकृष्ण अडवाणींनी ती सुप्रसिद्ध जनादेश यात्रा काढली. राजनाथसिंगांचा राष्ट्रीय क्षितिजावर त्या काळात उदय होत गेला. ९४ साली त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. ९६ साली शुचिता, सुरक्षा, स्वदेशी, समरसता आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बिगुल वाजवत पक्ष प्रचारात उतरला. ९९ साली भाजपचे पहिले स्थिर सरकार आले. राजनाथसिंगांना त्यात भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय दिले गेले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, वाजपेयींची महत्त्वाकांक्षी सुवर्णचतुष्कोण योजना आदींच्या कार्यवाहीत राजनाथसिंगांनी सक्रिय योगदान दिले.

पक्षाने २००२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असताना राजनाथसिंगांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाठवले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. शेतकर्‍यांसाठी खरेदी धोरण निश्‍चित केले. किसान पंचायती स्थापल्या. दीनदयाळ उपाध्यायांच्या एकात्म मानवतावादाची कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गुजरातमध्ये दंगली झाल्या आणि भाजपची प्रतिमा मलीन झाली. उत्तर प्रदेशात भाजपला पराभव पत्करावा लागला. मायावती मुख्यमंत्री बनल्या. राजनाथसिंगांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले गेले. जून २००५ मध्ये अडवाणी पाकिस्तान दौर्‍यावर गेले असता जिना सेक्युलर असल्याचे मत त्यांनी तेथे मांडले आणि भारतात गदारोळ उठला. अडवाणींना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजनाथसिंग यांचे नाव पुढे आले. मुंबई अधिवेशनात तसा निर्णय झाला आणि डिसेंबर २००६ मध्ये लखनौ अधिवेशनात वाजपेयींच्या उपस्थितीत राजनाथसिंगांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. विशेष महत्त्वाची बाब चरित्रकार अधोरेखित करतो ती म्हणजे राजनाथ यांच्या नावाला पक्षातील जुन्या जाणत्यांचा जसा पाठिंबा होता, तसाच सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारख्या तरुण तुर्कांचाही त्यांना पाठिंबा लाभला होता.

राजनाथसिंगांनंतर नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले, परंतु दुसर्‍या वेळी गडकरींनाच ते पद पुन्हा मिळणार असतानाच पूर्ती घोटाळ्याबाबत रान उठले आणि गडकरींच्या जागी पुन्हा एकदा राजनाथसिंगांना आणले गेले. जानेवारी २०१३ मध्ये राजनाथसिंग दुसर्‍यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि पुढे नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय क्षितिजावर आणण्यामध्ये त्यांनी कसे योगदान दिले हे सर्वज्ञात आहेच. गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळात मोदींची निवड राजनाथसिंगांनीच घोषित केली. निवडणूक प्रचारप्रमुखपदाची धुराही त्यांच्याकडे सोपवली. पुढे तर पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा झाली.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून व आता संरक्षणमंत्री म्हणून राजनाथसिंगांची कामगिरी सर्वांपुढे आहेच. गृहमंत्री असताना नक्षलवाद, देशांतर्गत सुरक्षा, काश्मीर आदी विषयांमध्ये त्यांच्या ठाम, खंबीर भूमिकेचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दहशतवाद्यांना जरब बसली. आता संरक्षणमंत्री या नात्याने त्यांची विधाने पाहता पाकिस्तानलाही जरब बसवण्याच्या मार्गाने ते निघाले असल्याचे दिसते आहे.

राजनाथसिंगांना दोन पुत्र आणि एक कन्या आहे. त्यांचा मुलगा पंकजसिंग गेल्या निवडणुकीत नोयडातून पक्षाचा खासदार झाला आहे, परंतु त्याचा राजकीय प्रवास पित्याच्या मदतीने झालेला नाही, उलट पित्यामुळे त्याचे राजकीय नुकसानच झाले आहे. पूर्वी पक्षाने पंकजला निवडणुकीत उतरवायचे ठरवले तेव्हा वेळोवेळी राजनाथसिंगांनी त्याला विरोध केला होता. कल्याणसिंगांच्या सूचनेवरून वाजपेयींनी पंकजला उमेदवारी दिली तेव्हा राजनाथ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आपल्यामुळे त्याला उमेदवारी मिळाली असे होऊ नये म्हणून या नाराज पित्याने मुलाला वाजपेयींकडे जाऊन पित्याचा विरोध असताना आपण ही उमेदवारी स्वीकारू शकत नाही म्हणून माफी मागायला लावली होती. गडकरी पक्षाध्यक्ष असतानाही पंकजला उमेदवारी स्वीकारण्यापासून राजनाथसिंगांनी रोखले होते. मात्र २०१७ मध्ये अमित शहांनी पंकजला नोयडातून उमेदवारी दिली आणि त्याने ती जागा स्वकर्तृत्वावर जिंकली. राजकारणात असे पितापुत्र आजच्या काळात विरळा.

राजनाथसिंग यांच्यासारख्या अत्यंत कठोर दिसणार्‍या नेत्याचा हळवा चेहराही चरित्रकार गौतम चिंतामणी यांनी या चरित्रातून दाखवला आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या शवपेटीला खांदा देताना भावूक झालेल्या राजनाथसिंगांचे छायाचित्र मलपृष्ठावर आहे. गौतम चिंतामणी लिखित ‘राजनीती’ हे राजनाथसिंग यांचे चरित्र तर आहेच, परंतु ते नुसते त्या व्यक्तीचे चरित्र नाही, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण वाटचालीचा हा इतिहास आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने तो या पुस्तकामध्ये मांडण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय अभ्यासकाच्या, भाजप नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या संग्रही असायलाच हवे असे हे पुस्तक आहे.