जनतेच्या प्रेमातून उतराई होणे कठीण : पर्रीकर

0
105
लोकोत्सव २०१५ चे उद्घाटन करताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर.(छाया : अनुजित)

आदर्श युवा संघाच्या लोकोत्सवाला थाटात प्रारंभ
संपूर्ण जगात मंदीची लाट असताना गोव्यासारखे लहान राज्य जनतेला दिलेल्या सर्व आश्‍वासनांची पूर्ती करीत आहे. भारत सरकारने १९ डिसेंबर १९६१ साली गोव्यात भारतीय सेना पाठवून गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले. त्याचे उत्तरदायित्व म्हणून संरक्षणमंत्री या नात्याने आपण कर्तव्य बजावित आहे. गोव्याच्या बहुतेक समस्या हातावेगळ्या करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगून गोव्यातील जनतेने आपल्याला जे भरभरून प्रेम दिले त्यातून उतराई होणे कठीण असल्याचे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले.येथील आदर्श युवा संघाने बलराम ग्राम विकास संस्था व कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने आमोणे येथील आदर्श ग्रामात आयोजित केलेल्या १५ व्या लोकोत्सवाचे पारंपरिक समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला आणि सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर, आमदार डॉ. प्रमोद सावंत, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, नगराध्यक्ष सायमन रिबेलो, जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षक गोपाळ उर्फ पंढरी प्रभुगावकर यांच्या हस्ते संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानपत्रांचे वाचन कमलाकर म्हाळशी, संजय कोमरपंत व अर्जुन गावकर यांनी केले. गोवा सरकारची आर्थिक स्थिती भक्कम असून चिंता करण्याची अजिबात गरज नाही. जनतेची काळजी घ्यायला हे सरकार समर्थ असून जी टीका केली जात आहे तो विरोधकांचा पोटशूळ असल्याचे सांगून आदर्श युवा संघ करीत असलेल्या संस्कृती जतन आणि संवर्धन कार्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुक्त कंठाने गौरव केला. कला आणि संस्कृती खाते नेहमीच कलाकारांचे हित जपत आहे. यापुढे कला सन्मान त्याचप्रमाणे राज्य कला पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार सांस्कृतिक मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केला. संस्कृती खात्याने संगीत शिक्षकांना न्याय मिळवून दिला हे नमूद करतानाच गोव्यात विविध ठिकाणी मिळून ३६५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असून सर्व कार्यक्रमांना कला आणि संस्कृती खाते सहकार्य करीत असल्याचे मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. लोकोत्सव म्हणजे आदर्श समाजाचे स्रोत असून कार्यकर्त्यांचे बलस्थान असल्याचे मत क्रीडामंत्री तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष रमेश तवडकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रूपा च्यारी यांनी केले. लोकोत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे विमोचन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संरक्षण मंत्री आणि अन्य मान्यवरांनी लोकोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी, विज्ञान, पारंपरिक कला, खाद्य पदार्थ त्याचप्रमाणे अन्य दालनांना भेट दिली. आमोणे येथील बलराम निवासी शाळेतील मुलांनी काश्मीर मदत निधीसाठी जमविलेला निधी मुख्याध्यापिका सविता तवडकर यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे सुपूर्द केला. आज ११ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शालेय स्तरावर विविध स्पर्धा होणार आहेत.